Monday, December 23, 2019

तैसें स्वामीचिया मनोभाव । न चुकिजे हेचि परमसेवा ।


अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्‍यक असणारी साधना केली पाहिजे. हीच खरी भक्ती आहे. हीच खरी सेवा आहे.
- राजेंद्र घोरपडे

तैसें स्वामीचिया मनोभाव । न चुकिजे हेचि परमसेवा ।
येर तें गा पांडवा । वाणिज्य करणें ।। 913 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - त्याप्रमाणें मालकाच्या इच्छेप्रमाणें करण्यास न चुकणें हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय. त्यावांचून दुसरें कांही करणें, म्हणजे अर्जुना, तो केवळ व्यापार होय.

सद्‌गुरू मनकवडे असतात. ते भक्ताच्या मनातील भाव ओळखतात. आत्मज्ञानी संत त्यानुसार भक्ताला मार्गदर्शन करतात. आधार देतात. भक्ताची आध्यात्मिक प्रगती करतात, पण अशा आत्मज्ञानी सद्‌गुरूंचा मनोभाव ओळखणार कसा? सद्‌गुरूंच्या मनातील भाव ओळखून त्यानुसार त्यांची सेवा करणे, हीच खरी परमसेवा आहे. खरा शिष्य सद्‌गुरूंच्या मनातील भाव ओळखू शकतो. त्यानुसार त्यांची सेवा करतो. आत्मज्ञानी संतांना शिष्याकडून फक्त पान, फूल, फळ याचीच अपेक्षा असते. स्वच्छ अंतःकरणाने दिले तरच ते त्याचा स्वीकार करतात; पण हल्ली संतांना आणि देवस्थानांना देणग्या देण्याची चढाओढ प्रचंड सुरू आहे. काही समाजात तर पूजेचे मान मिळविण्यासाठी लिलावही आयोजित केले जातात. विशेष म्हणजे लाखो, कोटी रुपये खर्चून ही सेवा केली जाते. देवाला जर फक्त पान, फूल, फळ हेच लागते तर ही जडजवाहिरे, धनसंपत्ती दान का केली जाते? दान दिल्या जाणाऱ्या संपत्तीमध्ये काळ्या पैशाचे प्रमाण अधिक आहे. मुळात ही संपत्ती गैरमार्गाने कमविली जाते आणि ती पचनी पडण्यासाठी देवाला दान दिले जाते. हे कसले दान? खरे दान, खरी सेवा ही यामध्ये नाहीच. अशा प्रकारामुळेच अध्यात्माची चौकट बदनाम होत आहे. या अपप्रचारामुळेच धर्मावर शिंतोडे ओढले जात आहेत. खरे तर धर्मामध्ये याला सेवा म्हटलेले नाही. हा तर व्यापार आहे. यासाठी सेवेचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे.अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्‍यक असणारी साधना केली पाहिजे. हीच खरी भक्ती आहे. हीच खरी सेवा आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


No comments:

Post a Comment