Sunday, August 26, 2018

समर्पण


म्हणोनि उचित । कर्मे ती आघवीं । मज समर्पावी । आचरोनि ।।311।।
स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

प्रत्येक धार्मिक ग्रंथाच्या शेवटी ते पुस्तक सद्‌गुरुंना अर्पण केल्याचा उल्लेख असतो. तशी ही परंपरा आहे. प्रत्येक कर्म हे सद्‌गुरुंना अर्पण करावे, असा नियमच आहे. म्हणूनच तसे कसे केले जाते. पुस्तक लिहिले गेले, विचार मांडले गेले ते सद्‌गुरुंच्या कृपेमुळे सुचले. नव्हेतर ते सद्‌गुरुंनीच सुचविले असा भाव त्यामध्ये असतो. सद्‌गुरुंच्या भावातून जे प्रगटले. ते स्वतःचे आहे असे कसे म्हणता येईल. ते सद्‌गुरुंचेच आहे. सद्‌गुरुंना समक्ष भेटून जरी ते अर्पण करता आले नाही, तरी तो भाव मनात कायम असणे म्हणजे ते सद्‌गुरुंना समर्पित करण्यासारखेच आहे. समर्पण म्हणजे शरणांगती. शत्रू समोर पत्करलेली शरणांगती आणि सद्‌गुरूंच्या समोरील शरणांगती यामध्ये फरक आहे. याची गल्लत करु नये. शरण जाणे म्हणजे सर्वस्व घालविणे अशी मनाची दुर्बलता करून घेणे चुकीचे आहे. सद्‌गुरूंना शरण जाणे म्हणजे मन दुबळे होते. विचार दुबळे होतात असा अर्थ लावणे चुकीचे आहे. तसा विचार करणेही चुकीचे आहे. अध्यात्मात तसा त्याचा अर्थ नाही हे समजून घ्यायला हवे. सद्‌गुरु हे शत्रू नाहीत. मित्र आहेत. सहकारी आहेत. अशा थोर व्यक्तीच्या चरणी शरण जाणे हे सहजरित्या घडत नाही. याला काहीतरी अनुभव यावा लागतो. तरच हे घडते. देवाची आठवण ही कठीण प्रसंगी चटकण होते. इतर वेळी ही आठवण होईलच असे नाही. शरण जाणे आणि पराभूत होणे यामध्ये फरक आहे. शरण जाणे हा पराभव नाही. सद्‌गुरूंच्या अनुभवामुळे ही शरणांगती येते. जे पुस्तक आपण लिहीले ते विचार त्यांचे होते हा अनुभव जेव्हा येईल. तेव्हा ते पुस्तक त्यांचे आहे. त्यांनाच समर्पित करायला हवे. असा भाव सहजच मनात प्रगट होते. म्हणूनच धार्मिक पुस्तके ही सद्‌गुरुंना, भगवंताना अर्पण केलेली असतात. संशोधनाचे प्रबंध हे गुरुंना समर्पित करावेत. कारण ते गुरुंच्या कृपेमुळे त्यांच्या सहकार्यामुळेच ते पूर्ण झाले असतात. त्यांनीच तर ते शिकविले आहे. अशा गुरुंना तो प्रबंध समर्पित करायला हवा. अध्यात्म गुरु आणि प्रत्यक्ष शिक्षण देणारे गुरु यामध्ये फरक आहे. पण शेवटी ते गुरुच आहेत. गुरूंचा मान हा राखायलाच हवा. गुरु हे ज्ञानाचे सागर असतात. त्यांच्यातून प्रकट होणाऱ्या ज्ञानातुनच तर शिष्याचा विकास होत असतो. यासाठी सद्‌गुरुंना समर्पण करण्याचा भाव सदैव मनामध्ये असावा. हा भाव कायम राहीला तर मीपणाची भावनाच राहणार नाही. अशा भावामुळेच आत्मज्ञानी होण्याचा मार्ग सुकर होईल.

No comments:

Post a Comment