Friday, August 17, 2018

विरक्ती

  जे अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं ।
सोऽहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ।। 53।। अध्याय 1 ला


ओवीचा अर्थ - वैराग्यशील पुरुष ज्याची इच्छा करतात, संत जें नेहमी अनुभवितात व सोऽहम्‌ भावनेनें पार पावलेले जेथें रममाण होतात.

विरक्ती यायला हवी म्हणजे नेमके काय? अध्यात्मात प्रगतीसाठी विरक्ती आवश्‍यक आहे. पण नेमके विरक्ती म्हणजे काय? मन विरक्त व्हायला हवे म्हणजे नेमके काय व्हायला हवे? अशा प्रश्‍न अनेक साधकांना पडतो. साधना करतो. म्हणजे नेमके काय करतो हा प्रश्‍न स्वतःला विचारला तर विरक्तीच्या प्रश्‍नाचे उत्तर निश्‍चित मिळेल. सद्‌गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करतो. एकाजागी निवांत बसून जप करतो. डोळे मिटून जप करतो. जप सुरू असतो पण मन मात्र जपावर नसते. दिवसभरातील घडामोडीवर ते भटकत असते. जप सुरू असतो. जपाची गणती सुरू असते. पाच माळा, दहा माळा असे ठरलेल्या माळा झाल्या की साधना पूर्ण होते. ही साधना आहे का? मनात सोऽहम नसतो. सोऽहम मात्र सुरू असतो. तुम्ही साधना करत नसला तरीही सोऽहमचा नाद सुरू असतो. मग आपण साधनेत नेमके काय करतो. नुसत्या जपाच्या माळा ओढत असतो. गणती करत असतो. आज एक हजार आठ वेळा जप केला. उद्या दहा हजार करायचा. ही गणती करून साधना सुरू असते. ही गणती नाही केली तरीही सोऽहम सुरूच असतो ना? मग गणती कसली केली जाते. जय जय राम कृष्ण हरी...जय जय राम कृष्ण हरी...हे काम करतानाही म्हणता येते. पण हा जप सुरू असताना मन मात्र इतरत्र भटकत असते. मनाचे हे भटकने थांबायला हवे. मन रिकामे व्हायला हवे. म्हणजेच विरक्त व्हायला हवे. मनात जपा व्यतिरिक्त इतर कोणताही विचार येता कामा नये. असे झाले तरच विरक्ती आली असे म्हणता येईल. मन विरक्त झाले असे म्हणता येईल. यासाठी प्रयत्न करायला हवा. मन भटकत म्हणून साधना सोडायची नाही. जपाची गणती सोडायची नाही. ती सुरूच ठेवायची पण मन त्यावर कसे केंद्रित करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. अवधान ढळता कामा नये. कधी पाच शब्दावर केंद्रित होईल. कधी एका माळेवर होईल पण ते केंद्रित व्हायला हवे. सोऽहमचा स्वर स्वतःच्या कानांनी ऐकण्याचा प्रयत्न केला तर मन निश्‍चितच भरकटण्याचे थांबते. तसा प्रयत्न सुरू ठेवायला हवा. मन सोऽहमच्या नादामध्ये रंगायला हवे. त्यात आपण गुंग व्हायला हवे. बाकीचे स्वर आपोआप बंद होतात. साधनेला एक आध्यात्मिक उंची येते. आत्मज्ञान प्राप्तीचे दरवाजे खुले होतात. फक्त मन विरक्त व्हायला हवे. मनामध्ये सोऽहम व्यतिरिक्त अन्य कोणताही विचार येता कामा नये. सद्‌गुरूंनी दिलेला मंत्रच स्वतःच्या कानांनी ऐकायला हवा. अशी अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा असा साधक आत्मज्ञान प्राप्तीस योग्य होतो. अशी अवस्था सद्‌गुरूंच्या कृपेनेच प्राप्ती होते. ही कृपा व्हायला हवी. या कृपेसाठी प्रयत्न करायला हवेत.


No comments:

Post a Comment