Monday, August 13, 2018

स्वप्न


जैसे स्वप्नामाजी देखिजे । तें स्वप्नीचि साच आपजे ।
चेऊनिया पाहिजे । तंव कांहीं नाहीं ।। 139 ।। अध्याय दुसरा


स्वप्नात राहू नकोस वास्तवात ये असे सद्‌गुरू दादा माधवनाथ महाराज सांगवडेकर नेहमी मला सांगत. मला स्वप्ने पाहायची सवय आहे. नुसती स्वप्ने पाहाणे जीवनात दुःखद ठरू शकतात. यासाठी वास्तवाशी सामना करण्याचे सामर्थ्य सद्‌गुरुंच्या उपदेशातून वारंवार मिळते. यामुळे ही माझी सवय आता कमी झाली आहे. मी यावर उपाय सुचवला. स्वप्न पडले की साधना अधिक करायची. स्वप्नात राहायचे नाही. आता त्याचा मला अनुभव येऊ लागला आहे. दादांच्या सहवासात असताना सुरवातीस श्री ज्ञानेश्‍वरी काहीच समजत नव्हती. नुसती अक्षरे वाचली जायची. आता ती अक्षरे माझ्याशी बोलू लागली आहेत. ही बोलणारी अक्षरे आता मी पुस्तक रूपाने इतरांनाही सांगण्याचा संकल्प केला. त्यातून तीन पुस्तकांची निर्मिती झाली. मी फक्त स्वप्नच पाहात बसलो असतो तर हे शक्‍य नव्हते. आपणास आलेली अनुभूती इतरांना सांगू नये असे बरेच भक्तगण सांगत असत. पण दादांच्या इथेतर उत्सवाच्या शेवटच्या दिवशी भक्त स्वतः अनुभव सांगत त्यावर दादा आशीर्वचनही देत. मग अनुभूती, स्वतःला आलेले अनुभव का सांगू नयेत. परमपूज्य दादांच्या सर्वांना मुक्त व्यासपीठ आहे. अनुभवांच्या स्वप्नात राहिलो असतो तर पुस्तके झाली नसती. या पुस्तकातूनच आता आध्यात्मिक प्रगतीच्या वाटा सुकर होत आहेत. यासाठी स्वप्नातून वास्तवात येण्याचा सल्ला दादा नेहमी मला का द्यायचे याचा अनुभव आज मला येत आहे. आता हेच ठरवले आहे. स्वप्नात राहायचे नाही. वास्तवाचा सामना करायचा. स्वप्नात स्वर्गही जिंकता येतो. पण आता वास्तवात हा स्वर्ग नाही. यासाठी आत्मसंतुलनाची गरज आहे. ते आता मिळवायचे आहे. वास्तव हेच आहे. स्वप्न जरूर पाहावे पण स्वप्नात राहू नये. जागे होण्याची गरज आहे. आत्मज्ञानाचे स्वप्न पाहणे काही वाईट नाही. पण हे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. आज हे करू, उद्या ते करू. आज हे स्वप्न पाहिले, उद्या ते पाहिले. अशाने नुसत्या स्वप्नातच राहणारा मी, सद्‌गुरुंच्या आशीर्वादाने यातून बाहेर पडू लागलो आहे. वास्तवाशी सामना करण्याचे सामर्थ्य आता सद्‌गुरुकृपेने मला मिळाले आहे. सद्‌गुरुंच्या कृपेने ही स्वप्ने आता सत्यात, वास्तवात साकारत आहेत. ही त्यांनीच करून घेतलेली सेवा आहे. अशी कृपा त्यांची राहावी, हीच सद्‌गुरुचरणी प्रार्थना.

No comments:

Post a Comment