Tuesday, December 22, 2009

पाणी प्रदूषणाची वाढती समस्या

पाणी प्रदूषणाची वाढती समस्या

लोकसंख्येच्या विस्फोटामुळे सर्वत्र झपाट्याने शहरीकरण होताना दिसत आहे. शहरांतील दुर्गंधीयुक्त सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जाते, यामुळे नद्यांतील पाणी दूषित होत आहे. औद्योगीकरणातील सांडपाण्यामुळेही नदीचे पाणी दूषित होत आहे. निकेल आणि झिंक यांसारखी विषारी मूलद्रव्ये या सांडपाण्यात असतात. शेतकरी शेतामध्ये खते, कीटकनाशके आदींचा वापर करतो; पण या रासायनिक द्रव्यांचा निचरा पाण्यावाटे होऊन हे पाणी शेवटी नदीतच मिसळते. कोळशाच्या तसेच इतर खनिजांच्या खाणीच्या सांडपाण्यातूनही पाण्याचे प्रदूषण होत आहे. असे हे दूषित पाणी नदीतच सोडण्यात येत असल्याने नदीच्या पाण्याचे प्रदूषण सध्या वाढत आहे, याकडे आज लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
भूगर्भातील पाण्यातही काही विषारी मूलद्रव्ये आढळतात. हे पाणी पिकांना दिल्यास यातून ही मूलद्रव्ये पिकांमध्ये प्रवेश करतात. बांगलादेश, अमेरिका तसेच भारतातील गंगा नदीकाठच्या भातामध्ये प्रमाणापेक्षा अधिक अर्सेनिक आढळले आहे. बांगलादेशात करण्यात आलेल्या एका पाहणीत भाताच्या मुळात 2.4 मिलिग्रॅम प्रति किलो, खोड आणि पानांमध्ये 0.73 मिलिग्रॅम प्रति किलो व तांदळामध्ये 0.14 मिलिग्रॅम प्रति किलो अर्सेनिक आढळले आहे. बांगलादेशातील भाताच्या विविध 13 जातींमध्ये 0.058 ते 1.835 मिलिग्रॅम प्रति किलो अर्सेनिक आढळले आहे, तर अमेरिकेत 0.2 ते 0.46 मिलिग्रॅम व तैवानमध्ये 0.063 ते 0.2 मिलिग्रॅम प्रति किलो अर्सेनिक आढळले आहे. नदीतील प्रदूषित पाणी पिकांना दिल्यास पिकामध्ये हे रासायनिक घटक प्रवेश करतात, तेच घटक माणसाच्या आणि जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. काही भागांत यामुळे विविध विकारही झालेले आढळले आहेत.
तुंगभद्रेचे पाणी हिरवे झाल्याने बेल्लारी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. पाण्यात रासायनिक प्राणवायू (सीओडी) 1125 मिलिग्रॅम, जैविक प्राणवायू (बीओडी) 200 मिलिग्रॅम, सेंद्रिय भार 500 मिलिग्रॅम, फॉस्फेट 1.5 मिलिग्रॅम असे प्रमाण आढळले. यामुळे या पाण्यावर प्रक्रिया करूनच याचा वापर करणे अत्यंत गरजेचे होते. अशी समस्या देशातील अनेक नद्यांमध्ये पाहायला मिळते. कोल्हापुरात साखर कारखान्यांची मळी पंचगंगा नदीत सोडण्यात आल्याने पाणी हिरवे झाल्याचे आढळले आहे. शहरांच्या सांडपाण्यासह विविध औद्योगिक आस्थापनांतून सोडल्या जाणाऱ्या प्रक्रियाविरहित पाण्यामुळे पंचगंगा प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाली आहे, यातून मासे मेल्याच्याही घटना अनेकदा घडल्या आहेत. डेहराडून येथील एका संस्थेच्या पाहणी अहवालानुसार गंगा नदीमध्ये हरिद्वार येथे दररोज 14 दशलक्ष लिटर सांडपाणी सोडले जाते. यामध्ये 20 टन सेंद्रिय पदार्थ, जवळपास 37.5 टन जड पदार्थ दररोज सोडले गेल्याचे आढळते. पाण्यात प्राणवायूची कमतरता भासल्याने लखनौमध्ये मेलेले मासे पाण्यावर तरंगताना दिसतात. ही समस्या देशातील अनेक भागांत पाहायला मिळते. सध्या देशात जवळपास 220 जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती आहे. अशातच पाण्याचे प्रदूषण वाढल्यास उन्हाळ्यात पिण्यासाठी चांगले पाणीच शिल्लक राहणार नाही. यामुळे रोगराईची समस्याही ग्रामीण भागात वाढू शकते, याचा धोका विचारात घ्यायला हवा.
प्रदूषणामुळे हिराकूड धरणातील माशांच्या संख्येत घट होत आहे. यावर जवळपास पाच हजार मच्छीमारांचे जीवन अवलंबून आहे. 74 हजार 592 हेक्‍टरवर पसरलेल्या हिराकूड धरणात गेल्या सहा दशकांपासून 140 जातीचे मासे होते; पण सध्या ही संख्या 43 वर आली आहे. यातील 18 जातीचे मासेच फक्त खाण्यासाठी वापरले जातात, उरलेले पुन्हा धरणात सोडण्यात येतात. फिश फार्मर डेव्हलपमेंट एजन्सीच्या अध्यक्षांच्या मते माशांच्या जाती नष्ट होण्यामागे पाण्याचे प्रदूषण हे मुख्य कारण आहे. छत्तीसगड औद्योगिक क्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या गरम पाण्यामुळे माशांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
बिहारमधील पटना आणि भागलपूर जिल्ह्यात डॉल्फिनचे मृत्यू झाल्याचे आढळले आहे. याचा अर्थ असा समजला जात आहे, की गंगेचे पाणी अद्यापही अशुद्ध आहे. डॉल्फिनच्या संख्येत वाढ हे गंगा नदी स्वच्छ होण्याचे प्रमुख चिन्ह मानले जात आहे. यासाठी जनतेमध्ये नदी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. नदीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्याची नितांत गरज आहे. यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारायला हवेत. यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने देशाच्या निम्म्या भागात दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आहे ते पाणी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी आत्तापासूनच योग्य पावले उचलण्याची गरज आहे, तरच भविष्यात उद्‌भवणारी पाणीटंचाई व प्रदूषित पाण्यामुळे वाढणारी रोगराई रोखता येणे शक्‍य होणार आहे. भूगर्भातील पाण्याचेही प्रदूषण होणार नाही याची काळजीही यंदा घेणे आवश्‍यक आहे.

- राजेंद्र घोरपडे

No comments:

Post a Comment