Monday, December 21, 2009

भुईमूग बीजोत्पादनातील "बाजीराव'

भुईमूग बीजोत्पादनातील "बाजीराव'
---
सातारा जिल्ह्यातील उंडाळे (ता. उंडाळे) येथील बाजीराव पाटील यांनी उन्हाळी भुईमूग बीजोत्पादनात सातत्याने उच्चांकी उत्पादन घेतले आहे. "इक्रिसॅट' पद्धतीच्या लागवड तंत्राची त्यांनी यशस्वी अंमलबजावणी केली असून, अन्य शेतकऱ्यांसाठी ती मार्गदर्शक ठरली आहे...
---
स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब उंडाळकरांचा त्यागाचा वारसा असणारा उंडाळे हे गाव कऱ्हाडपासून जवळपास 20 किलोमीटरवर आहे. या गावातील बाजीराव पाटील शेतीमध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग करण्यात गुंतलेले असतात. उंडाळे गावाचे ते उपसरपंचही आहेत. गावातील रयत कृषी विज्ञान मंडळाचे व नाबार्ड पुरस्कृत रयत शेतकरी मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. सामाजिक व राजकीय कार्यात असले तरी शेती ही त्यांच्या अजेंड्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शेतीतील आवडीमुळेच त्यांनी मुलीला जिद्दीने कृषी पदवीधर केले आहे.
बाजीराव पाटील यांनी मुंबई विद्यापीठातून कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1993 पासून घरच्या शेतीची जबाबदारी स्वतःकडे घेतली. शेतीमध्ये लक्ष घातल्यावर त्यांना पीक व्यवस्थापनातील खाचाखोचा लक्षात येण्यास सुरवात झाली. याबाबत ते सांगतात, की आजकाल उसाची शेती परवडण्याजोगी राहिली नाही. उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक, उत्पादनाला म्हणावा तसा दर मिळत नाही. बिले वेळेवर मिळत नाहीत. यामुळे शेतीमध्ये उसाव्यतिरिक्त इतर पिकांकडे मी वळलो. टोमॅटो, कोथिंबीर, वांगी, पपई, गोड मका, भुईमूग, केळी या पिकांच्या लागवडीत प्रयोग केले. सुधारित तंत्र आणि योग्य वेळ साधून पिकांचे नियोजन केले तर चांगला नफा मिळतो असे मला दिसले आहे. पिकांचे गणित लक्षात आल्यावर मी शेतकऱ्यांशी चर्चा केली. कृषी विभागाकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तसेच स्वतःच्या पाहणीतून किती क्षेत्रावर कोणत्या पिकाची लागवड केली आहे. याचा अभ्यास केला व पिकांची निवड करून चांगला फायदा मिळवला. आवड असेल तर कोणतीही गोष्ट सहज साध्य करता येणे शक्‍य आहे, असा माझा अनुभव आहे.
- गुंडे यांनी दिली दिशा...
बदलत्या शेतीची माहिती सांगताना श्री. पाटील म्हणाले, की शेतीमध्ये विविध प्रयोग करताना त्यांनी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांची आवर्जून मदत घेतली. नवनवे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना भेटलो. कृषी विभागाच्या शेतकरी सहलीतून कर्नाटक, केरळ, आंध्रातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतींना भेटी दिल्या. त्यांनी केलेल्या प्रयोगांतून दरवेळी नवीन गोष्टी मिळत गेल्या. या दरम्यान भुईमुगाची आधुनिक पद्धतीने शेती करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीचे प्रयोगशील शेतकरी जयकुमार गुंडे यांची भेट झाली. त्यांनी केलेला प्रयोग विशेष वाटला. या भेटीतून प्रेरणा घेऊन नव्या तंत्राने भुईमुगाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. गुंडे यांच्याकडून लागवडीचे तंत्र समजून घेतले. त्याचबरोबरीने ट्रॉम्बे येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातील भुईमूग तज्ज्ञ डी. एम. काळे यांनी टीजी 37 ए आणि टीपीजी-41 या जातीच्या बियाण्यांचे प्लॉट घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यातूनच उन्हाळी भुईमुगाची "इक्रिसॅट' पद्धतीने गादी वाफ्यावर लागवड करण्याचे मी ठरविले. यासाठी मला तत्कालीन मंडल कृषी अधिकारी भरत अर्जुगडे आणि कृषी अधिकारी उदय देशमुख, तालुका कृषी अधिकारी विजयेंद्र धुमाळ यांनी मार्गदर्शन केले. तसेच कालवडे येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे सतत मार्गदर्शन मिळत आहे.
- तंत्र भुईमूग लागवडीचे
गेल्या 10 ते 12 वर्षांपासून पाटील यांच्याकडे भुईमुगाची लागवड असतेच. उपलब्ध जमिनीचा विचार करून त्यांनी ऊस, केळी, भाजीपाला आणि भुईमुगाच्या लागवडीचे नियोजन केले आहे. बीजोत्पादनासाठी लागवड असल्याने साधारणपणे जमिनीची उपलब्धता पाहून फेरपालटीसाठी 20 गुंठे ते दीड एकर भुईमुगाचे क्षेत्र दरवर्षी असतेच.
भुईमूग लागवडीबाबत श्री. पाटील सांगतात, की माझी जमीन मध्यम काळी, सुपीक उत्तम निचऱ्याची आहे. उन्हाळ्यात पाणी पुरवण्यासाठी कूपनलिकाही घेतली आहे, त्यामुळे उन्हाळी भुईमुगाला पुरेसे पाणी देता येते. 1999 मध्ये मला दर्जेदार उत्पादन मिळाले, त्यानंतर मी उत्पादनात सातत्य ठेवले आहे. त्या वर्षी मी श्री. काळे यांनी सुचविल्याप्रमाणे उन्हाळी हंगामासाठी टीएजी- 24 जातीच्या लागवडीचे गादीवाफा पद्धतीने नियोजन केले होते. त्यानंतर मी गेल्या आठ वर्षांत तज्ज्ञांच्या सल्ल्याने जेएल 286, जेएल 501, टीएजी 24, टीजी 37 ए, टीपीजी 41 या जातींची लागवड करत आलो आहे. खरीप आणि उन्हाळी हंगामानुसार जातींची निवड केली जाते. यंदाच्या उन्हाळी हंगामात मी जेएल 286 आणि जेएल 501 या जातींची लागवड केलेली आहे.
उन्हाळी भुईमुगाची लागवड साधारणतः 15 जानेवारीपर्यंत केली जाते. थंडी असल्यास पेरणीचा कालावधी पुढे जातो. लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट, दोन वेळा कुळवण करून 20 गुंठ्याला एक ट्रॉली शेणखत मिसळून देतो. या मशागतीनंतर 120 सें.मी. (चार फूट) अंतराने सरी पाडून घेतो. म्हणजे मधल्या पट्ट्यात गादीवाफा तयार करता येतो. हा गादीवाफा 90 सें.मी रुंदी आणि 15 सें.मी उंचीचा तयार होतो. पाण्याच्या पाटाची रुंदी 30 सें.मी. राहते. गादीवाफा तयार करतानाच लागवडीपूर्वी 100 किलो जिप्सम आणि 50 किलो 18-46-0 मिसळतो. तसेच 100 किलो गांडूळ खतात दोन किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक योग्य पद्धतीने वाफ्यातील मातीत मिसळून देतो. त्यानंतर तुषार संच चालू करून वाफे भिजवून घेतो. वाफसा आल्यानंतर गादीवाफ्यावर हलक्‍या हाताने फळी मारून माती मऊ करून घेतो, त्यामुळे मल्चिंग कागद अंथरताना अडथळा येत नाही. त्यानंतर 13 मि.लि. ऑक्‍सिफ्लोरफेन हे तणनाशक प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून गादीवाफ्यावर फवारून घेतो. त्यामुळे पुढे तणांचा प्रादुर्भाव होत नाही.
अशा पद्धतीने लागवडीची तयारी झाल्यानंतर सात मायक्रॉन जाडीचा मल्चिंग कागद अंथरला जातो. अंथरण्यापूर्वी लागवडीच्यादृष्टीने या कागदावर 8 × 8 इंचावर झिगझॅग पद्धतीने छिद्रे पाडली जातात. त्यामुळे एका गादीवाफ्यावर चार ओळी बसतात. तो या गादीवाफ्यावर अंथरल्यानंतर त्यावरील छिद्रांमध्ये बियाण्याची टोकण केली जाते. एका छिद्रात दोन बी टोकले जातात. साधारणपणे 20 गुंठ्याला 20 किलो बियाणे लागते. टोकणी अगोदर बीजप्रक्रिया केली जाते. एक किलो बियाणास अडीच ग्रॅम कार्बेन्डॅझीमची बीजप्रक्रिया करून सर्व बियाणे 20 ते 25 मिनिटे सावलीत वाळवून त्यानंतर अडीच ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करतो. हे बियाणे सावलीत वाळवितो. पेरणीपूर्वी एक ते दोन तास अगोदर ही सर्व बीजप्रक्रिया केली. बीजप्रक्रिया करताना शेंगदाण्याचे नाजूक टरफल निघणार नाही किंवा खराब होणारी नाही याची विशेष काळजी घेतली जाते.
टोकण झाल्यानंतर लगेचच पहिल्यांदा पाट पाणी देतो. 15 दिवसांत भुईमूग उगवून आल्यानंतर तुषार सिंचनाने पाणी दिले जाते. यापुढील पाळ्या पिकाच्या गरजेनुसार दिल्या जातात. या पाण्याच्या पाळ्या लांबवण्याचे कारण म्हणजे मातीत मुळे खोल जातात. फुलोऱ्याच्यावेळीही पाण्याची पाळी लांबवितात. टीएजी - 24 या जातीच्या जाळीचा विस्तार कमी असतो. तो वाढण्यासाठी उगवणीनंतर 35 दिवसांनी 100 ग्रॅम युरिया प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतो. पीक फुलोऱ्यात असताना 70 ग्रॅम 19ः19ः19 हे विद्राव्य खत प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी घेतो. याचबरोबरीने पीक पिवळसर पडू नये म्हणून फुलकळी आल्यावर 50 ग्रॅम झिंक आणि 75 ग्रॅम फेरस सल्फेट प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी घेतली जाते.
या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसतो. या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 25 मि.लि. एन्डोसल्फान किंवा 15 मि.लि. डायमेथोएट प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी घेतो. टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 25 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक फवारणी केली जाते. साधारणपणे 120 दिवसांत म्हणजेच 15 मेच्या दरम्यान पीक काढणीला येते. गादीवाफा आणि मल्चिंगमुळे पीक दहा दिवस आधी काढणीला येते. गादीवाफ्यामुळे जाळी उपसायला सोपी जातात. शेंगा तुटत नाहीत. तण होत नसल्याने भांगलणीचा खर्च नाही. पाणी बचत होते.
---
चौकट ः 1
1999 मध्ये बीजोत्पादनासाठी टीएजी-24 जातीच्या 20 गुंठे लागवडीसाठी मशागतीपासून ते काढणीपर्यंत आलेला खर्च ः
नांगरणी 700 रुपये
कुळवाच्या दोन पाळ्या 400 रुपये
शेणखत (वाहतुकीसह) 2000 रुपये
गांडूळ खत 400 रुपये
जिप्सम (दोन पोती) 100 रुपये
बियाणे 1400 रुपये
रायझोबियम कल्चर 25 रुपये
स्फुरद विरघळवणारे जिवाणू 80 रुपये
कार्बेन्डॅझीम 80 रुपये
मल्चिंगचा खर्च 2500 रुपये
टोकणीसाठी मजुरी 750 रुपये
गादीवाफ्याची मजुरी 200 रुपये
पाणी खर्च (चार महिन्यांचा) 800 रुपये
पाण्यासाठीची मजुरी (चार महिने) 600 रुपये
कीडनाशके 45 रुपये
फवारणीसाठीची मजुरी 200 रुपये
मॅन्कोझेब 80 रुपये
19-19-19 विद्राव्य खत (एक किलो) 110 रुपये
काढणीची मजुरी 700 रुपये
शेंगा वाळविण्यासाठी मजुरी 200 रुपये
---
एकूण खर्च 11,370 रुपये
---
चौकट ः 2
टीएजी - 24 जातीचे 20 गुंठ्यांमध्ये मिळालेले उत्पादन ः 14 क्विंटल
विक्रीसाठी योग्य बियाण्यांच्या शेंगांचे उत्पादन ः 12 क्विंटल
शेंगांना मिळालेला दर ः 40 रुपये प्रति किलो
एकूण मिळालेले उत्पन्न ः 48,000 रुपये
खर्च वजा जाता मिळालेले उत्पन्न ः 36,630 रुपये
---
कृषी खात्याने तालुका पातळीवर घेतलेल्या स्पर्धेत उत्पादनाचे परीक्षण एक गुंठ्यातील क्षेत्रावर केले. सुरवातीला त्यांनी जाळ्यांसह शेंगांचे वजन केले. नंतर शेंगा स्वतंत्र करून शेंगा व मोकळ्या जाळ्यांचे वेगवेगळे वजन कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी काढले. एक गुंठा क्षेत्रावर केलेल्या या परीक्षणामध्ये वाळवलेल्या शेंगांचे वजन 70 किलो भरले.

- बीजोत्पादनात संधी...
बाजीराव पाटील यांनी बियाणे प्लॉट घेतल्याने विक्री करताना प्रति किलो 40 ते 45 रुपयांपर्यंत दर मिळाला. या कालावधीत भुईमुगाचा दर 16 ते 18 रुपये प्रति किलो इतका होता. श्री. पाटील यांनी 20 गुंठ्यांत भुईमुगाचे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची लागवड करण्यास सुरवात केली आहे. जवळपास 90 ते 100 एकरांवर उन्हाळी भुईमुगाची लागवड मल्चिंग पद्धतीने करण्यात येत आहे. रेठरे परिसरातही 50 ते 60 एकरावर गादीवाफ्यावर मल्चिंग पेपरचा वापर करून पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

आतापर्यंतच्या जातींच्या निवडीबाबत श्री. पाटील सांगतात, की जेएल 24 या जातीच्या बरोबरीने जेएल 286, जेएल 501, टीएजी 24, टीजी 37 ए, टीपीजी 41 या जातींची लागवड मी केली आहे. सध्या जेएल 286 व जेएल 501 या जाती तेलासाठी चांगल्या असल्याने त्यांना चांगली मागणी आहे. भुईमुगामध्ये पिकांची फेरपालट करणे खूप गरजेचे आहे. फेरपालट न केल्यास शेंगा व शेंगदाण्यावर काळे डाग पडतात. शेंगदाणा किडका होतो.

- मल्चिंग पेपरसाठी शासनाचे प्रयत्न हवेत...
यंदाच्या वर्षी त्यांना मल्चिंग पेपर वेळेवर मिळाला नाही, पण 20 गुंठे क्षेत्रावर त्यांनी जेएल 501 आणि जेएल 286 या जातींचे बीजोत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांना जर मल्चिंग पेपरची उपलब्धता होत नसेल तर सामान्य शेतकऱ्यांची काय स्थिती असेल याचा विचार कृषी विभागाने केला पाहिजे. कृषी विभागाने मल्चिंग पेपर खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाबरोबर हा पेपर शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध होईल याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. ग्रामीण भागात मल्चिंग पेपर उपलब्धच होत नाही. यासाठीही ग्रामपंचायती किंवा कृषी विभागामार्फत वितरणाची सोय कृषी विभागाने केली पाहिजे. याचबरोबरीने शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्धतेसाठी कृषी विभागाने मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादनाचे कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

भुईमुगातील उत्पादन वाढ ही श्री. पाटील यांची प्रयोगशील वृत्ती, पीक नियोजनाचे गणित आणि कृषी विभागातील कृषी अधिकारी भाऊसाहेब धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रेय खरात, कृषी सहायक विनोद कदम, कृषी पर्यवेक्षक अशोक कोळेकर, बाबासाहेब तोरणे, संभाजी शेवाळे याचे मोलाचे सहकार्य मिळते. शेतकऱ्यांचे कष्ट, पिकांचे नियोजन आणि कृषी विभागाची साथ असेल तर प्रत्येक जिल्ह्यात भुईमूग बीजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची फळीच तयार होईल. यातून प्रत्येक गावात दर्जेदार बियाणे तर पोचलेच, त्याचबरोबरीने तेलबिया उत्पादनात आपण स्वयंपूर्णता गाठू शकू असा विश्‍वास वाटतो.
- कृषी विभागाने दिली दिशा
बाजीराव पाटील यांना बीजोत्पादनासाठी कृषी अधिकारी विजयेंद्र धुमाळ यांनी सहकार्य केले. याबाबत बोलताना श्री. धुमाळ म्हणाले, ""तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या नियमित बैठका आयोजित करत असतो. यातून त्यांचे अनेक प्रश्‍न आमच्या निदर्शनास येतात. या बैठकांना बाजीराव पाटील नियमित येत असत. या वेळी त्यांनी गुंडे यांचे मार्गदर्शन घेतले. गादी वाफ्यावर मल्चिंग पेपर अंथरून भुईमुगाची लागवड करण्यासंबंधीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. कऱ्हाड परिसरात भुईमुगाचे हेक्‍टरी केवळ 16 क्विंटलच उत्पादन येते; पण या नव्या तंत्राने एकरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन शेतकरी घेत आहेत. बाजीराव पाटील यांनी केलेली प्रगती पाहून सध्या या परिसरात अनेक शेतकरी हे तंत्र आत्मसात करत आहेत. काहींनी चांगले उत्पादनही घेतले आहे.''
---
संपर्क ः
बाजीराव पाटील,
उंडाळे, ता. कराड, जि. सातारा
संपर्क ः 9421118615
---
- राजेंद्र घोरपडे

No comments:

Post a Comment