| अध्यात्मात स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे. स्वतः स्वच्छ राहून इतरांनाही स्वच्छ ठेवणे, स्वच्छ करणे हे गुण अंगी असणे आवश्यक आहे. तसा बदल माणसांमध्ये घडविता यावा लागतो. यासाठी तसे स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक आहे. शरीरातील प्रत्येक घटकांत स्वच्छतेचा हा गुण निर्माण व्हायला हवा. तरच गायीप्रमाणे स्वतःमध्येही पवित्रता येईल. - राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 तैसें गीतेंचें हे दुभतें । वत्स करूनि पार्थातें । दुभीनली जगापुरतें । श्रीकृष्णगाय ।।1689।।अध्याय 18 वा ओवीचा अर्थ - त्याप्रमाणें अर्जुनाला वासरूं बनवून श्रीकृष्णरूपी गायीनें हे गीतेचें दुभते जगाला पुरेल एवढे दिले आहे. भारतीय संस्कृतीत गायीला देवता मानले जाते. हे देवपण कसे येते? कशाने येते? जिवाचा शिव कसा होतो? नराचा नारायण कसा होतो? हे गुण कसे येतात? देशी गाय आपणास या गोष्टी शिकवते. यासाठी देशी गायीचे गुण विचारात घ्यायला हवेत. गाय स्वच्छतेला अधिक महत्त्व देते. स्वतः व आसपासचा परिसर स्वच्छ असावा या दृष्टीने तिचे प्रयत्न असतात. अनेक जनावरे मातीत लोळतात. चिखलात बसतात. सगळे अंग चिखलाने, मातीने माखलेले असते. त्यांना त्यातच अधिक आनंद वाटतो. पण देशी गाय यामध्ये मोडत नाही. गायींच्या अंगावर असे डाग दिसत नाहीत. देशी गाय स्वच्छ राहण्यावर अधिक भर देते. स्वच्छता हा तिचा स्थायी स्वभाव आहे. मलमुत्र विसर्जनही ती एकदाच सकाळी करते. इतर वेळी ती कधीही मुत्र विसर्जन करत नाही. तिच्या मुत्रामध्ये पर्यावरण शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत. म्हणूनच घरामध्ये देशी गायीचे गोमुत्र शिंपडण्याची प्रथा आहे. गायीचे शेण आणि मुत्र हे कीडनाशक म्हणूनही वापरले जाते. शेणाने घर सावरल्याने घरातील कीटक, विषाणू नष्ट होतात. घरात स्वच्छता राहाते. गायीचे दूध हे पचायला हलके असते. लहान मुलांना यासाठी ते देतात. दूध, तुपात अनेक औषधी गुणधर्म आहेत. पाचक शक्ती वाढवितात. इतकी पवित्रता गायीमध्ये नांदते आहे. अध्यात्मात स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे. स्वतः स्वच्छ राहून इतरांनाही स्वच्छ ठेवणे, स्वच्छ करणे हे गुण अंगी असणे आवश्यक आहे. तसा बदल माणसांमध्ये घडविता यावा लागतो. यासाठी तसे स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक आहे. शरीरातील प्रत्येक घटकांत स्वच्छतेचा हा गुण निर्माण व्हायला हवा. तरच गायीप्रमाणे स्वतःमध्येही पवित्रता येईल. देवपण येईल. सद्गुरू हे गायी प्रमाणे असतात. स्वतः स्वच्छ राहतात व इतरांना स्वच्छ करण्यासाठी झटतात. यामुळे माऊलीने भगवान श्रीकृष्णानांना गाईची उपमा दिली आहे. गाय जशी तिच्या वासरांवर प्रेम करते. माया करते. त्याप्रमाणे सद्गुरूही आपल्या भक्तावर माया करतात. प्रेम करतात. गाय जशी स्वतःच्या वासरांना पोसते तसे सद्गुरूही त्यांच्या शिष्यांना पोसतात. पूर्वीच्याकाळी ज्याच्याकडे जास्त गायी तो सर्वांत श्रीमंत समजला जात असे. कारण एक गाईवर एक कुटुंब सहज पोसले जाते. देशी गाय एक लिटर दूध देते. शेतीसाठी खत देते. उत्पादनवाढीसाठी पोषक घटक देते. पर्यावरण शुद्ध करते. मन प्रसन्न ठेवते. शेणीचा धूप घर स्वच्छ, प्रसन्न ठेवतो. अशा गायींची जोपासना आता केली जात नाही हे दुर्दैव्य आहे. अशाने देशी गायींची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. पूर्वी गावात हजारो देशी गायी होत्या पण आता एक गायही मिळणे मुश्किल झाले आहे. गायींचे महत्त्व ओळखून शेतकऱ्यांनी एक देशी गाय तरी घरात पोसणे गरजेचे आहे. । ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके इये मराठीचिये नगरी किंमत - 80 रुपये, कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621 | |||
Monday, May 11, 2020
संत ज्ञानेश्वरांनी भगवान श्रीकृष्णास ही उपमा दिली आहे ?
Sunday, May 10, 2020
पारंपारिक वाणांच्या संवर्धनाची गरज
पोषक ठरणारे पारंपरिक वाण सोडून संकरित बियाण्यांचा वापर किती करायचा, याची उत्पादने किती घ्यायची याचाही विचार करण्याची गरज आहे. जमिनीची खालावलेली प्रत ओळखून शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळला आहे, तसा तो आता पारंपरिक बियाण्यांच्या लागवडीकडेही वळेल. आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना हे पाऊल उचलावे लागणार आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजीं सामाये ।
ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाति न नशे ।। 59।। अध्याय 17 वा
ओवीचा अर्थ - बीज नाहीसें होऊन त्याचें झाड होते, झाड नाहीसें होऊन त्याचा बीजांत समावेश होतो, हा क्रम कोट्यावधी कल्पें चालला तरी ( झाडाची ) जात नष्ट होत नाही.
पिकाच्या पारंपरिक अनेक जाती आता कालबाह्य होत आहेत. पण त्या जातींची चव आजच्या संकरित जातींमध्ये नाही. भाताच्या चंपाकळी, काळा जिरगा, जोंधळा जिरगा, काळी गजरी, घनसाळ, हवळा आदी सुवासिक जाती आहेत. पण या जातींची लागवड फक्त काहीचं शेतकरी करतात. जुन्या जातींचे उत्पादन संकरित बियाण्यांच्या तुलनेत खूपच कमी असते. सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे, महागाईमुळे अशा बियाण्यांची उत्पादने घेणे आता शेतकऱ्यांना परवडत नाही. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करावी लागत आहे. अशा या परिस्थितीमुळे या पारंपरिक जाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही शेतकरी आवड आणि त्यांचे महत्त्व ओळखून या पिकांची लागवड करत आहेत. अशा शेतकऱ्यांच्यामुळे या बियाण्यांचे संवर्धन होत आहे, ही महत्त्वाची बाब आहे. या जातींची वैशिष्ट्ये शेतकऱ्यांनी ओळखून या जातींच्या संवर्धनाचे कार्य हाती घेण्याची गरज आहे. या जातींचे बियाणे रासायनिक खतांना प्रतिसाद देत नाहीत. सेंद्रिय पद्धतीनेच यांची लागवड करावी लागते. या जातीच्या बियाण्यांची चव, सुवास त्याची प्रत टिकवायची असेल तर सेंद्रिय पद्धतीनेच याची लागवड करणे गरजेचे आहे. संकरित बियाण्यास काही वर्षांनंतर त्याची उत्पादकता, चव, त्याची प्रत नष्ट होते. पण पारंपरिक बियाण्यांची प्रत मात्र टिकून असते. विशेष म्हणजे संकरित बियाणे हे शेतकऱ्यांना दरवर्षी विकत घ्यावे लागते. कारण उत्पादित होणारे दाणे हे वांजोटे आहेत. बीज म्हणून आवश्यक गुण त्याच्यामध्ये नाहीत. असे हे वांजोटे उत्पादन सध्या शेतकरी घेत आहेत. बीज म्हणून ते पेरले गेले तर ते उगवत नाही. अशा या संकरित जातींमुळे शेतकऱ्यांची फसवणूकही होत आहे. दरवर्षी संकरित बियाणे तयार करावे लागते. गेल्या काही वर्षातील संकरित जातींचा इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत दर दहा वर्षांनी पिकांच्या नव्याच जाती येताना दिसत आहेत. जुने संकरित वाण टिकून राहात नाही. त्याची गुणवत्ताही टिकून राहात नाही. अशा या बियाण्यांच्या निर्मितीचा उद्योग दरवर्षी करावा लागतो. बदलत्या शेतीच्या या पद्धतीत शेतकऱ्यांनी आरोग्यासाठी उपयुक्त असणारे, पोषक ठरणारे पारंपरिक वाण सोडून संकरित बियाण्यांचा वापर किती करायचा, याची उत्पादने किती घ्यायची याचाही विचार करण्याची गरज आहे. जमिनीची खालावलेली प्रत ओळखून शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळला आहे, तसा तो आता पारंपरिक बियाण्यांच्या लागवडीकडेही वळेल. आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना हे पाऊल उचलावे लागणार आहे. दरवर्षी बियाणे विकत घेण्याऐवजी पारंपरिक वाणांचे संवर्धन शेतकरी करू लागतील. चांगला वाण, सुवासिक, आरोग्यदायी, चविष्ट अशा या पारंपरिक जातीचे संवर्धन ही काळाची गरज आहे. पारंपारिक वाण टिकून राहणारे आहे. त्याची गुणवत्ता टिकूण राहणारी अशी आहे.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
Saturday, May 9, 2020
विषयांची छाटणी यासाठी आवश्यक
परब्रह्मच्या बोधाचा श्रीगणेशा व्हावा असे वाटत असेल तर विषयांचा शेंडा हा तोडावाच लागेल. तरच नव्या फांद्यावर आत्मज्ञानाचे फळ जोमाने वाढेल. भरघोस फळे लागतील. यासाठी छाटणी ही महत्त्वाची आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
जैसी वरीवरी पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजें ।
तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ।। 305 ।। अध्याय 2 रा
ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची वरवरची पालवी खुडून टाकली पण मुळाला पाणी घातलें, तर त्या झाडाचा नाश कसा होणार ?
द्राक्षाचे भरघोस उत्पादन येण्यासाठी ऑक्टोंबर आणि मार्च - एप्रिलमध्ये छाटणी करावी लागते. छाटणी केल्याने वेलीची, घडांची वाढ योग्य प्रकारे होते. वेलवर्गीय पिकांमध्ये छाटणी ही आवश्यकच असते. छाटणीमुळे फुटवे अनेक फुटतात. वेल वाढण्यास, पसरण्यास मदत होते. वृक्षांची वाढही योग्य प्रकारे होण्यासाठी त्याचाही फांद्याची छाटणी योग्यवेळी व योग्य प्रकारे करण्याची गरज असते. गणपतीस दूर्वा वाहिल्या जातात. या दूर्वा म्हणजे नेमके काय? हे विचारात घेण्याची गरज आहे. गवताचे शेंडे खुडतो. त्यास दूर्वा म्हणतात. शेंडे खुटल्यानंतर या गवतास अनेक ठिकाणी फुटवे फुटतात. साहजिकच ते गवत सर्व बाजूंना पसरते. त्याची भरघोस वाढ होते. गवत हे आजकाल तण समजले जाते. पण गवत वाढावे, असा विचार पूर्वीच्याकाळी का रुजवला गेला असावा? यालाही शास्त्रोक्त कारण आहे. गवतामुळे जमिनीची धूप थांबते. गवत जितके पसरेल तेथील जमिनीचे संवर्धन होते. थोडसे पाणी जरी त्याच्या मुळांना मिळाले तर त्याची वाढ जोमाने होते. दूर्वा गणपतीला वाहण्यामागे गवताची वाढ होऊन पडीक जमिनीवरील मातीचे संवर्धन व्हावे. जमिनीची धूप थांबावी हा त्यामागचा उद्देश आहे. सरळ वाढणाऱ्या झाडाचा शेंडा तोडला तर त्यास अनेक फांद्या फुटतात. शेंडा तोडला म्हणून झाड मरत नाही, उलट त्याचा विस्तार वाढतो. त्याची वाढ अधिक जोमाने होते. अनेक शाखा त्याला फुटतात. शेंडा तोडल्यानंतर मुळांची जमिनीतील पकड अधिक मजबूत होते,. अशा काळात मुळांना पाणी मिळाले किंवा दिले तर त्या झाडास अधिक फुटवे फुटतात. वाढ जोमाने होते. पण यामागचे अध्यात्म समजून घेण्याची गरज आहे. पूजा - पाठामध्ये करण्यात येणाऱ्या कृती यांना शास्त्रीय आधार आहे. त्यामागे पर्यावरण, निसर्गाचे संवर्धन असे विचार सांगितले गेले आहेत. लोकांमध्ये कृतीतून याची जाणीव व्हावी. आपोआपच त्याच्याकडून संवर्धन केले जावे. तसेच अध्यात्माचे विचारही त्यातून समजले जावेत हा त्यामागचा उद्देश आहे. परब्रह्माच्या वाटेवर असणाऱ्या साधकाने विषयांचा शेंडा तोडला, तर परब्रह्माचा विकास अधिक जोमाने होतो. हा विचार यातून सांगण्यात आला आहे. दूर्वा वाहा. म्हणजे विषय. वासणेचे शेंडे तोडा असे सांगणे आहे. परब्रह्मच्या बोधाचा श्रीगणेशा व्हावा असे वाटत असेल तर विषयांचा शेंडा हा तोडावाच लागेल. तरच नव्या फांद्यावर आत्मज्ञानाचे फळ जोमाने वाढेल. भरघोस फळे लागतील. यासाठी छाटणी ही महत्त्वाची आहे.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
Friday, May 8, 2020
शेतकऱ्यांचा स्वभाव कसा असतो?
दान कोणाला करायचे हे शेतकरी चांगल्याप्रकारे जाणतो. दिसेल त्याला तो दान देत नाही. पण दान देणे हा धर्म तो कधीही सोडत नाही. दानाची मोजदाद तो करत नसल्याने ते वाया गेले तर त्याचे दुःख त्याला होतच नाही.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
नाना कृषीवळु लपवी । पांघुरवी पेरिलें । तैसें झांकी निपजले । दानपुण्य ।। 206 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा ओवीचा अर्थ - अथवा शेतकरी पेरलेले बीज ( जसे माती टाकून) झाकतो त्याप्रमाणे तो आपल्या हातून झालेले दान आणि पुण्य झांकतो. कृषी म्हणजे शेती. वळू म्हणजे कसणारा, वळणारा. संत ज्ञानेश्वरांनी येथे शेतकऱ्यांना कृषीवळु असे म्हटले आहे. शेतकऱ्यांचा स्वभाव कसा असतो? कोणत्याही ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाकडे भेट द्या. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. जाताना ते तुम्हाला कधीही मोकळया हाताने परतू देत नाहीत. घरात असणारा धान्याचा कण तरी ते तुम्हाला देतीलच. गुळाची ढेप, शेतातील ताजी भाजी किंवा परसातील झाडाला लागलेले एखादे तरी फळ तुमच्या हातावर ठेवतातच. हे काहीच मिळाले नाही तर पावशेरभर डाळ, गहू, तांदूळ हे काही तरी देण्यास ते कधीही विसरत नाहीत. काहीच नाही मिळाले, तर वळचणीला ठेवलेला शिल्लक भोपळा तरी देतातच. काहीच देण्यासारखे उरले नसेल तर लहान मुलांच्या हातावर पाच-पन्नास रुपये तरी ते ठेवतातच. महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्यात जावा. शेती कसणाऱ्या कुटुंबात हा गुण तुम्हाला पाहायला मिळतोच. दान देणे हा शेतकरी कुटुंबाचा स्वभाव आहे. घरात आलेला पाहुणा मोकळ्या हातानं कधीही माघारी जाणार नाही याची काळजी घेतली जाते. कोणतीही अपेक्षा न ठेवता हे दान दिले जाते. हे दान ते झाकतात. याची वाच्यता ते कोठे करत नाहीत. शेती करतानाही हाच विचार त्यांच्यात असतो. पेरणी करताना धान्य कोठे उघडे पडले आहे का हे पाहतात. धान्य उघडे पडले तर ते व्यवस्थित उगवत नाही. त्याची वाढ होत नाही. ते वाया जाते. दानाचेही असेच आहे. दान उघडे केले, तर त्यापासून प्रेमाचा अंकुर फुटत नाही. दानाची वाच्यता केली, तर तो व्यवहार होतो. दानाची मोजदाद केली, तर ते दान राहात नाही. शेतकऱ्यांच्या स्वभावातच मुळी प्रेम आहे. व्यवहारातही प्रेम ओसंडून वाहते. मुक्या जनावरांच्यावरच तो प्रेम करतो. ही जनावरे त्याला देवते समान असतात. त्यांचे कुटुंब त्याचावर उपजीविका करते. दुसऱ्यावर प्रेम केले, तर तोही आपणास प्रेम देतो. मारकुटी म्हैस मालक जवळ आला, तर त्याला मारत नाही. कारण तो मालक तिच्यावर जिवापाड प्रेम करतो याची तिला जाणीव असते. प्रेमाने जग जिंकता येते. शहरातील व्यक्तींची दुःखे ऐकून शेतकऱ्याचे मन हेलावते. अशा या त्याच्या हळव्या स्वभावाचा फायदा घेणारेही अनेकजण आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक ही त्याच्या ह्या स्वभावमुळेच होते. पण फसगत झाली म्हणून दुःख करत बसत नाही. हे त्याच्या स्वभावात नाही. तो एकदा फसेल. वारंवार त्याला फसवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकणार नाही. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाता येत नाही. दान देतो म्हणून वारंवार त्याच्याकडून अपेक्षाही ठेवणारे फसतात. दान कोणाला करायचे हे शेतकरी चांगल्याप्रकारे जाणतो. दिसेल त्याला तो दान देत नाही. पण दान देणे हा धर्म तो कधीही सोडत नाही. दानाची मोजदाद तो करत नसल्याने ते वाया गेले तर त्याचे दुःख त्याला होतच नाही. दान देण्यात जो आनंद असतो तो दानशूरपणा मिरविण्यात नाही, हे तो जाणतो. ।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके इये मराठीचिये नगरी किंमत - 80 रुपये, कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621 | |||
Wednesday, May 6, 2020
निंबोळीपासून किटकनाशक..कशावर आहे उपयोगी ?
कडुलिंबाच्या बियांपासून उत्तम कीड नाशक करता येते. लेडी बर्ड बिटल तसेच मावा यावर हे कीडनाशक उपयुक्त आहे. सुकलेल्या निबोळ्या पासून ते तयार केले जाते.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल - 8999732685
कां निंबोळियेचें पिक । वरि गोड आंत विख ।
तैसें तें राजस देख । क्रियाफळ ।। 263 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा
ओवीचा अर्थ - अथवा कडुनिंबाच्या निंबोळ्या बाहेरून सुंदर दिसतात, पण आंत विष ( विषासारख्या कडू ) असतात, त्याप्रमाणें ते राजस क्रियांचे फळ आहे, असे समज.
निंबोळी म्हणजे कडुलिंबाच्या बिया. या वरून गोड असल्यातरी आतून त्या कडू असतात. औषध सुद्धा कडू असले तरी त्याचा परिणाम हा गोड असतो. उसाच्या शेतीमुळे बांधावरील झाडे आता कमी झाली आहेत. पूर्वी प्रत्येकाच्या बांधावर झाडे असायची. यातून दुहेरी उत्पन्न मिळत होते. शेतीच्या उत्पन्ना बरोबरच झाडावरील वृक्षाची फळेही चाखायला मिळत. कडुलिंबाचे वृक्ष खायला फळे देत नाही पण त्याची फळे ही औषधी असतात. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. कडुलिंबाची संख्या आता घटली आहे. बांधावरचा हा वृक्ष कमी झाला आहे. पूर्वी धान्य साठवून ठेवताना त्यामध्ये कीड लागू नये यासाठी कडुनिंबाचा पाला टाकत असतं. धान्याला कीड लागत नसे. पण आता बदलत्या काळात पावडर टाकली जाते. ही पावडर मानवी आरोग्यास धोकादायक असते पण तरीही त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कडुनिंबाचा पाला सहज उपलब्ध असूनही शेतकरी आता हा उपाय योजत नाही. जुने बुरसट विचार म्हणून आपण चांगल्या गोष्टींचा त्याग करत आहोत. याकडे आता पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत जागरूक होण्याची गरज आहे. चांगले विचार जोपासण्याची गरज आहे. आरोग्यास ज्या गोष्टी घातक आहेत त्याचा अवलंब हा आपण रोखायला हवा. आरोग्यदायी उपाय योजायला हवेत. कडुलिंबाचे महत्त्व ओळखून त्याचा वापर पुन्हा शेतीमध्ये वाढवायला हवा. त्याचे फायदे, लाभ घ्यायला हवेत. खर्चाची बचतही होते याचाही विचार शेतकऱ्यांनी करायला हवा. कडुलिंबाच्या बियांपासून उत्तम कीड नाशक करता येते. लेडी बर्ड बिटल तसेच मावा यावर हे कीडनाशक उपयुक्त आहे. निंबोळ्या जरी दिसायला सुंदर असल्या तरी त्या कीटकांसाठी विषारी आहेत. म्हणूनच त्याचा वापर हे किटक नष्ट करण्यासाठी केला जातो. सुकलेल्या निबोळ्या पासून ते तयार केले जाते. एक किलो सुकलेल्या बिया घेऊन त्याचा कूट करावा. या कुटलेल्या बिया दोन लिटर देशी गाईच्या गोमुत्रात दोन दिवस भिजत ठेवाव्यात. त्यानंतर 15 लिटर पाण्यात हे मिश्रण एकत्र करून कपड्यातून किंवा गाळण्यातून गाळून घ्यावे. हे मिश्रण पिकावर फवारल्यास पिकातील अनेक प्रकारच्या किडी नष्ट होतात. सहज सोपे व कमी खर्चाचे हे उपाय शेतकऱ्यांनी उपयोगात आणून शेतीतील खर्चात बचत करायला हवी. फवारणीचा खर्च वाचू शकतो. तसेच महागड्या रासायनिक कीडनाशकापासून आरोग्यावर होणारे परिणामही यामूळे रोखले जाऊ शकतात. कडूलिंबापासून तयार केलेले कीडनाशक हे शरीराला अपायकारक नसते. त्यामुळे आरोग्यदायी अशा या पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करायला हवा. लिंब कडू असला तरी त्याचा उपाय हा गोड असतो, लाभदायक असतो याचा विचार करायला हवा. मानवी अनेक आजारावरही कडुलिंबाची काढा उपयुक्त आहे. पित्तनाशक, उष्णतेच्या विकारावर कडुनिंबाचा काढा उपयुक्त आहे. अशा या वृक्षाचे संवर्धन करायला हवे.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
Tuesday, May 5, 2020
आतां आणिक ही संप्रदायें । परीमातें नेणती समवायें ।
प्रार्थना कशी करावी. कशाची करावी. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण केलेली प्रार्थना ही एकाच ठिकाणी पोहोचते. कारण तो एकच आहे. सबका मालिक एकच आहे. यासाठी हा धर्म श्रेष्ठ, हा धर्म कनिष्ठ असा भेदभाव करणे व्यर्थ आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
आतां आणिक ही संप्रदायें । परीमातें नेणती समवायें ।
जे अग्नि-इंद्र-सूर्य-सोमाये । म्हणऊनि यजिती ।। 344 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 9 वा
ओवीचा अर्थ - आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत, ते सर्व समान असणारा जो मी त्या मला जाणत नाहीत तर ते अग्नेय, इंद्राय, सूर्याय आणि सोमाय असे म्हणत यज्ञ करतात.
कोणताही धर्म असो, कोणताही संप्रदाय असो या सर्वांचा उद्देश एकच आहे. देवाचे दर्शन, भगवंताचे दर्शन, म्हणजेच आत्मज्ञानाचे दर्शन, आत्मज्ञानाचा लाभ यावरच सर्व संप्रदाय, धर्म आधारलेले आहेत. येथे ध्येय एकच आहे फक्त प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे आहेत. पण हे सर्व एकाच ठिकाणी पोहोचतात. नमस्कार कसाही केला, कोणत्याही प्रकारे केला तरी त्याच्याजवळ पोहोचतो. कारण देव एकच आहे. सबका मालिक एक, अल्ला असो वा राम दोघेही एकच आहेत. नाथ संप्रदायातील गुरु शिष्य परंपराही आत्मज्ञान लाभावर आधारलेली आहे. आत्मज्ञान प्राप्ती हाच या विद्यापीठाची पदवी आहे. गुरु त्यांच्या शिष्याला आत्मज्ञानी करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यानंतर गुरु आणि शिष्य दोघेही एकाच पदाला पोहोचतात. दोघेही एकरूप होतात. फक्त इथे गुरु आणि शिष्याची अभ्यासाची पद्धत वेगळी असू शकते. पदवी मिळवायची आहे. मात्र प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असू शकते. कोण सकाळी उठून अभ्यास करतो. कोणी रात्री जागून अभ्यास करतो. कोण पाठांतर करतो तर कोण नुसते वाचन करतो. कोण एकपाठी असतो त्याला एकदा वाचलेकी सर्व लक्षात येते. पुन्हा पुन्हा वाचण्याची त्याला गरज पडत नाही. पण कोणास पाच-पाचदा वाचून त्याचा अर्थ समजतो. प्रत्येकाची आकलन शक्ती वेगळी असते. त्यानुसार त्याची अभ्यासाची पध्दत बदलते. गरुने ज्या पद्धतीने अभ्यास केला त्याच पद्धतीने शिष्याचा अभ्यास असेलच असे नाही. त्या दोघांच्याही पद्धती वेगवगळ्या असू शकतात. त्यानुसार त्या पद्धती रुढ होतात. मग आपणास पद्धत वेगळी म्हणजे ते वेगळे असू वाटू लागतात. त्यानुसार त्यांचे संप्रदायही वेगवेगळे वाटू लागतात. पण त्या दोघांचा देव एकच आहे. दोघांच्या साधनेचा उद्देश एकच आहे. संप्रदाय वेगळे झाले, धर्म वेगळे झाले म्हणजे त्यात फरक दिसू लागतो. पण दोन्हीही धर्म, संप्रदाय आत्मज्ञान प्राप्ती याचा उद्देशावर आधारलेले आहेत. प्रार्थना कशी करावी. कशाची करावी. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण केलेली प्रार्थना ही एकाच ठिकाणी पोहोचते. कारण तो एकच आहे. सबका मालिक एकच आहे. यासाठी हा धर्म श्रेष्ठ, हा धर्म कनिष्ठ असा भेदभाव करणे व्यर्थ आहे. वेगवेगळ्या मार्गामुळे ते वेगळे वाटत असले तरी ते एकच आहेत. हे जो जाणतो तो ध्येय गाठतो. मी कोण आहे. मी आत्मा आहे. हाच दोन्हीचा उद्देश आहे. मग ते ज्ञान कसेही मिळवा. ते मात्र एकच आहे.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
Monday, May 4, 2020
अथवा करूं शाड्वळ । पर्जन्यवृष्टी ।।
दुःखाने माणूस खचतो. मन सुकते. अशा काळात त्याला आधार देणारा कोणी भेटला तर त्याच्यात एक नवी उभारी निर्माण होते. सद्गुरूही असेच वळवाच्या पावसासारखे आपल्या जीवनात बरसतात. आपल्या सुकलेल्या, दुःखी जीवनात बहार निर्माण करतात. नवी उभारी देतात.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
कां वीजु वर्षोनि आभाळ । ठिकरिया आतो भूतळ ।
अथवा करूं शाड्वळ । पर्जन्यवृष्टी ।। 434 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा
ओवीचा अर्थ - अथवा मेघांतून विजेचा वर्षाव होऊन पृथ्वीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होवोत, अथवा मेघ पर्जन्याची वृष्टी करून सगळें भूतळ हिरवेगार करून टाको.
अनेकदा ढगांचा गडगडाट होऊन पाऊस पडतो. वादळी वाऱ्यासह येणाऱ्या या पावसाला अवेळी पाऊस असेही म्हटले जाते. मे च्या सुरवातीस पडणाऱ्या पावसाला वळीव असे म्हटले जाते. तापलेल्या जमिनीला या पावसाने गारवा मिळतो. पहिल्या पावसाने तर जमिनीतील जीवाणूमुळे (निमॅटोड्स) सुंगध दरवळतो. प्रसन्न वातावरण तयार होते. हा पाऊस कधी पडतो कधी पडत नाही. याचा काही नेम नाही. या पावसाने कधी नुकसान होते. विशेषतः फळबागांना फटका बसतो. पण पाणी टंचाई भासणाऱ्या भागात हा पाऊस फायद्याचा ठरतो. निसर्गाचा हा पाऊस गरजेचा आहे. उन्हाने वाळू लागलेली झाडे - झुडपे या पावसाने हिरवीगार होतात. असे नेमके या पावसात असते तरी काय? शास्त्रोक्त अभ्यासानुसार हवेत वीज चमकते तेव्हा 2600 अंश सेल्सिअस इतके तापमान वाढते. या तापमानाला हवेत 78 टक्के इतका असणारा नायट्रोजन पाण्यामध्ये विरघळतो. त्याचे अमोनियामध्ये रूपांतर होते. पावसाचे हे नत्रयुक्त पाणी झाडांना उपलब्ध झाल्यानंतर पालवी फुटते. या नव्या पालवीवरच पुढच्यावर्षी फळे लागतात. यासाठी फळझाडांना हा पाऊस उपयुक्त असतो. उन्हाने वाळत चाललेल्या वृक्षांच्या वाढीसाठी हा पाऊस उपयुक्त असतो. त्या वृक्षांमध्ये यामुळे नव चैतन्य निर्माण होते. वाढत्या तापमानामुळे नष्ट होत चाललेल्या वृक्षांच्या जातींच्या संवर्धनासाठी तर अशा पावसाची गरज आहे. जंगलामध्ये हा पाऊस नवी आशा देऊन जातो. हा पाऊस अवेळी पडत आहे. पण मुख्यतः पावसाळा संपल्यानंतर परतीचा पाऊस हा वादळी असतो. हा पाऊस झाला तर रब्बी मध्ये शेतकरी पिकेही घेऊ शकतात. या पावसामुळे रब्बीच्या उत्पादनात मोठी वाढ होते. ऑक्टोंबरमध्ये छाटणी केलेल्या वृक्षांची जोमाने वाढ होण्यासाठीही हा पाऊस उपयुक्त ठरतो. या पावसाने फुटलेली नवी पालवी उन्हाळ्यातही तग धरू शकते. मे च्या मध्यावर हा पाऊस झाला तर उन्हाच्या दाहकतेने सुकत चाललेल्या वृक्षांना पुन्हा बहार येतो. मार्चमध्ये हा पाऊस झाला तर नत्रयुक्त पाणी फळझाडांना मिळाल्याने आंबा, काजू, फणस यांचे उत्पादनही वाढते. निसर्गाची ही देणगी आहे. निसर्गाचा हा नियम आहे. माणसाच्या जीवनातही असेच दुःखाचे प्रसंग घडत असतात. दुःखाने माणूस खचतो. मन सुकते. अशा काळात त्याला आधार देणारा कोणी भेटला तर त्याच्यात एक नवी उभारी निर्माण होते. सद्गुरूही असेच वळवाच्या पावसासारखे आपल्या जीवनात बरसतात. आपल्या सुकलेल्या, दुःखी जीवनात बहार निर्माण करतात. नवी उभारी देतात. सुकलेल्या विचारांना नवा विचार जोडतात. नवी उमेद निर्माण करतात. निसर्गाच्या नियमाप्रमाणे हे त्यांचे कार्य अखंड सुरू असते. फक्त आपण त्यांचे हे कार्य समजून घेत नाही. निसर्गाशी आपण स्पर्धा करत राहतो अन् मग दुःखाचा हा डोंगर दूर होत नाही. यासाठी निसर्गावर प्रेम करायला शिकले पाहिजे. निसर्गाचे नियम पाळायला हवेत. निसर्गाची ही देणगी आहे. निसर्ग नियमानेच आध्यात्मिक विकास होतो.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
Sunday, May 3, 2020
शेतकऱ्यांना तिहीं ऋतूं समान
धोके आहेत म्हणून शेती सोडून नोकरीच्या मागे धावणे योग्य नाही. भावी काळात शेतीला महत्त्व येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेते टिकवून ठेवायला हवीत. पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी म्हणत असत या जगातील सर्व उद्योग संपू शकतील, बंद पडतील पण शेती हा असा व्यवसाय आहे जो कधीही बंद पडणार नाही किंवा तो बंद पडून चालणार नाही.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
तिहीं ऋतूं समान । जैसें कां गगन ।
तैसें एकचि मान । शीतोष्णीं जया ।। 202 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा
ओवीचा अर्थ - तिन्ही ऋतूमध्ये आकांश जसें सारखें असतें, त्याप्रमाणें थंड व उष्ण इत्यादिची किंमत ज्याच्याजवळ सारखीच असतें.
शेतकऱ्याचे जीवन हे कष्टाचे आहे. उन्ह, थंडी, पावसाळा असो त्याला या सर्व परिस्थितीत काम करावे लागते. उन्ह आहे म्हणून नांगरटीचे काम थांबवता येत नाही. पाऊस पडतो म्हणून शेतात चिखल पेरणी करण्याचे टाळता येत नाही. थंडी आहे म्हणून उसाला पाणी देण्याचे टाळता येत नाही. काम करताना ऋतुंचा विचार करून चालत नाही. अशी स्थिती इतर उद्योगात नाही. पाऊस आहे, आज कामावर रजा सांगू. थंडी वाजते आहे, बाहेर पडायला नकोसे वाटते. आजच्या दिवशी घरी बसू. असे म्हणून कामाला दांडी मारता येते. ऑफिसमध्ये सांगितले की काम झाले. व्यापारीही पाऊस आहे. माल आज पाठवायला नको. उद्या पाठवू. त्यातही सूट मिळते. पण शेतीची कामे करताना अशी टंगळामंगळ करता येत नाही. आजचे काम उद्यावर ढकलता येत नाही. वेळ चुकवून चालत नाही. येथे आराम हराम आहे. घात असतानाच पेरणी करावी लागते. पेरणीची योग्य वेळ साधावी लागते. यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याचे सामर्थ्य असावे लागते. शेतकऱ्यासाठी हे तीनही ऋतू सारखेच आहेत. इतके कष्ट घेऊन हाती काहीच मिळत नाही. अशी आजच्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. वर्षभर शेतात उसाचे पीक असते. ग्रामीण भागात चोवीस तास विजेचा पुरवठा होत नाही. वारंवार वीज खंडित केली जाते. अशा काळात रात्री अपरात्री शेताला पाणी देण्याची वेळ येते. रात्रीच्या वेळी शेतात साप असू शकतात. विंचू, किडे असतात. या सर्वांचा धोका पत्करून धाडसाने हे काम करावे लागते. सध्याच्या काळात असे कष्ट करणारे मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे ही कामे स्वतःच करावी लागतात. शाळा कमी शिकला की कर शेती हाच नियम ग्रामीण भागात आहे. पण आता शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागल्याने कमी क्षेत्रात शेतीवर जीवन जगणे कठीण झाले आहे. पेरलेले केव्हा वाया जाईल याचा नेम राहिला नाही. सोयाबीन तीन महिन्यात येते. भरपूर उत्पन्न देते. पण काढणीच्यावेळी पाऊस पडला तर पीक वाया जाण्याचा धोका असतो. पेरल्यानंतर सर्व हाती लागेल याचा नेम आता राहिलेला नाही. उसामध्ये कष्ट आहेत पण पीक वाया जाण्याचा फारसा धोका नाही. यामुळे अनेक शेतकरी उसाकडे वळले आहेत. पण उसाच्या दरासाठी शेतकऱ्यांना आंदोलन उभारावे लागते. तेव्हा कुठे आज शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडू लागले आहेत. पण शेतीत कष्ट आहेत, धोके आहेत म्हणून शेती सोडून नोकरीच्या मागे धावणे योग्य नाही. भावी काळात शेतीला महत्त्व येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेते टिकवून ठेवायला हवीत. पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी म्हणत असत या जगातील सर्व उद्योग संपू शकतील, बंद पडतील पण शेती हा असा व्यवसाय आहे जो कधीही बंद पडणार नाही किंवा तो बंद पडून चालणार नाही. कारण कृषी मुलश्च जीवनम. शेती शिवाय जीवन जगणेच अशक्य आहे.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
Saturday, May 2, 2020
पर्जन्ययाग म्हणजे काय?
यजुर्वेदात कारीरी इष्टिनामक यज्ञ सांगितला आहे. पुरातणकाळातही पाऊस पाडण्यासाठी विविध यज्ञ केले जायचे. याला शास्त्रीय आधारही आहे. यज्ञामध्ये आंबा, वड, पळस, पिंपळ, जांभूळ, उंबर अशी चीक निर्माण करणाऱ्या झाडांच्या फाद्या वापरल्या जात. यामध्ये मीठ, नवसागर टाकले जायचे. याला पर्जन्ययाग असे म्हटले जाते.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञाते प्रगटी कर्म ।
कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ।। 135 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 3 रा
ओवीचा अर्थ - तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो, तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो. आणि वेदरुप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे.
शहरातील लोकांना पावसाळा नकोसा वाटतो. पण ग्रामीण भागातील जनतेचे जीवनच पावसावर अवलंबून असते. पाऊस पडला नाही तर शेती ओस पडेल. कुपोषणाची समस्या उभी राहील. दुष्काळामुळे जनावरांचेही हाल होतील. ती कशी जगवायची? की कत्तलखान्यात पाठवायची असे अनेक प्रश्न उभे राहतात. वर्षात दोन ते अडीच महिने पडणारा पाऊस कमी झाली तरी समस्या, अधिक झाला तरीही समस्या. पावसाच्या अनियमितपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. बऱ्याचदा पेरणी होते पीक उगवून येते आणि पाऊस दडी मारतो. पेरणी वाया जाते. मान्सूनच्या पावसाने दडी मारल्यानंतर पावसासंदर्भातील अनेक अंधश्रद्धांना ऊत येतो. भोळाभाबडा शेतकरी अशा या अंधश्रद्धांना बळीही पडतो. पाऊस पडण्यासाठी कोण गाढवांची लग्ने लावतो, तर कोण बेडकांची लग्ने लावतो. काही ठिकाणी कौल लावण्याचीही पद्धत आहे. काळ्या घोड्याला किंवा मेंढीला गावातून हाकतात. ते पळत असताना जर त्यांनी मुत्र विसर्जन केले तर पाऊस पडतो असे मानले जाते. अशा अनेक प्रथा आजही प्रचलित आहेत. कारण पावसाचा अनियमितपणा सर्वांनाच भेडसावतो आहे. समस्यांच्या गर्तेत सापडलेली व्यक्ती मग अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते. यामुळे खरच पाऊस पडतो का याला काहीही शास्त्रीय आधार नाही. अशा अनेक अंधश्रद्धा ग्रामीण भागात पाहायला मिळतात. यात अनेकांचे बळीही जातात. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अनेक प्रयोग झाले आहेत. यजुर्वेदात कारीरी इष्टिनामक यज्ञ सांगितला आहे. पुरातणकाळातही पाऊस पाडण्यासाठी विविध यज्ञ केले जायचे. याला शास्त्रीय आधारही आहे. यज्ञामध्ये आंबा, वड, पळस, पिंपळ, जांभूळ, उंबर अशी चीक निर्माण करणाऱ्या झाडांच्या फाद्या वापरल्या जात. यामध्ये मीठ, नवसागर टाकले जायचे. याला पर्जन्ययाग असे म्हटले जाते. यामुळे पाऊस पडतो. काही वर्षापूर्वी डॉ. राजा मराठे यांनी वरूणयंत्राचा प्रयोग याच शास्त्रीय आधारावर राज्यात राबविला होता. ढगाळ वातावरणाच्या काळात हा यज्ञ करून पाऊस पाडण्यात आला. साधे मीठ 804 अंश सेल्सियसला वितळते. तर 1475 अंश सेल्सियसला उकळते. यज्ञामध्ये मीठ टाकल्यानंतर ते वितळते. वितळलेले हे बाष्पीभूत मीठ तीव्र ज्वालामुळे आकाशात जाते. वातावरणात या आयनिक मीठाचा मुक्त संचार होतो. उष्ण ढगापर्यंत हे आयन पोहोचल्यानंतर त्या ढगांचे पाण्यात रूपांतर होते व पाऊस पडतो. असे हे रासायनिक समिकरण आहे. पूर्वीच्या काळातील यज्ञ हे अशाच रासायनिक अभ्यासावर आधारलेले होते. यज्ञामुळे पाऊस पडतो याला असा शास्त्रीय आधार आहे. चीनमध्ये डॉपलर रडारचा वापर करून कृत्रिम पाऊस पाडण्यात येतो. सध्या असे अनेक प्रयोग विकसित केले जात आहेत.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
Friday, May 1, 2020
मी कोण आहे, हे जाणण्याची गरज काय?
आत्मज्ञान प्राप्तीसाठी अभ्यास मात्र आपणालाच करावा लागतो. ज्ञानातून आत्मज्ञान कसे मिळवायचे हे त्यानेच अभ्यासायचे आहे. दैनंदिन जीवन सुखी होण्यासाठी आवश्यक ज्ञान घ्यायलाच हवे पण त्या जीवनाचा खरा अर्थ, जन्माचा अर्थ समजून घ्यायला हवा.
-राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल ८९९९७३२६८५
अर्जुना वेदु जरी जाहला । तरी मानें नेणतां वायां गेला ।
कणु सांडुनि उपणिला । कोंडा जैसा ।। ३३३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा
ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफणावा त्याप्रमाणे अर्जुना मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद झाला तरी तो व्यर्थ होय.
मी कोण आहे ही जाणण्याची गरज काय? हा धर्म आपण पाळण्याची गरज काय ?मला जाणून मला काय मिळणार ? असे प्रश्न आपणास पडणे स्वाभाविक आहे. पण मानव जन्माचा हा धर्म आहे. तो प्रत्येकासाठी आहे. हाच मानवाचा खरा स्वधर्म आहे. त्याचे आचरण करणे हे गरजेचे आहे. तोच न पाळणे म्हणजेच जन्म व्यर्थ घालवणे असेच आहे. वारंवार हे सांगणे का केले जाते असा प्रश्नही आपणास पडला असेल, पण हेच ध्येय आपणास गाठायचे आहे. आपणास त्याची जाणीव व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. धान्य निवडताना, त्याला वारा देताना वाऱ्याने कोंडा बाजूला होतो अन् धान्य वेगळे होते. पण निवडायच्या धान्यात केवळ कोंडाच असेल तर त्यातून धान्य कसे मिळणार? त्यातून आपणास कोंडाच भेटणार. नुसत्या कोंड्याला वारा देण्यात काय अर्थ आहे? तसेच आत्मज्ञान नाही असे ज्ञान शिकून आपणास कशाची प्राप्ती होणार. जीवन कसे जगायचे याचे ज्ञान हे घ्यायलाच हवे, पण जीवनाचा अर्थ सांगणारे ज्ञानसुद्धा जाणून घ्यायला नको का ? नुसत्या जगण्याला काय अर्थ आहे. त्यात जीवनाचा अर्थ नसेल तर, हेच जगणे व्यर्थ आहे. अमर कोण होतो ? जो आत्मज्ञानी होतो, तोच अमर होतो. मग अमर होण्यासाठी आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग स्वीकारायला नको का ? सर्व वेद शिकला तरी आत्मज्ञानाची ओळख करून घेतली नाही तर जीवनात मिळवलेल्या ज्ञानाचा काय उपयोग. ते सर्व व्यर्थ नाही का? उच्च असे हे आत्मज्ञान स्वतःहून जाणायचे आहे. गुरूंच्या कृपेने ते आपणास प्राप्त होते. असे ज्ञान देणारे गुरु आपणास भेटायला हवेत. त्यांचा शोध घ्यायला हवा. ज्ञान हे गुरूकडून घ्यावयाचे असते. शालेय शिक्षण आपण गुरूकडून शिकतो, पण त्याचा अभ्यास केला तरच शिष्य पास होतो. गुरु फक्त मार्गदर्शन करतात अभ्यास मात्र शिष्यालाच करावा लागतो. गुरु योग्य रस्ता दाखवतात त्या मार्गाने शिष्याने जायचे असते, तरच त्यांना मार्क मिळतात. तेव्हाच पास होतो. तसेच आत्मज्ञान प्राप्तीमध्ये आहे. मार्गदर्शन गुरु करतात, आत्मज्ञान प्राप्तीसाठी अभ्यास मात्र आपणालाच करावा लागतो. ज्ञानातून आत्मज्ञान कसे मिळवायचे हे त्यानेच अभ्यासायचे आहे. दैनंदिन जीवन सुखी होण्यासाठी आवश्यक ज्ञान घ्यायलाच हवे पण त्या जीवनाचा खरा अर्थ, जन्माचा अर्थ समजून घ्यायला हवा. यासाठी मी कोण आहे? याचा शोध घ्यायला हवा.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621
Subscribe to:
Posts (Atom)








