Sunday, May 18, 2014

शेती झालीय प्रयोगशाळा...

राजेंद्र घोरपडे
स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून कोल्हापूर येथील डॉ. सुनील पाटील हे शेतीमध्ये नेहमीच विविध प्रयोग करत असतात. ऊस, भात आणि वनौषधीच्या माध्यमातून त्यांनी शेतीमध्ये प्रगती केली आहे. शेतीबरोबरीने परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि अभ्यासकांना वनौषधींची माहिती होण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो.

कोल्हापुरात राहणारे डॉ. सुनील पाटील यांचे आजी-आजोबा हे शेतमजूर होते. ते दुसऱ्यांची शेती कसायचे. यातून त्यांनी स्वतः थोडी शेती विकत घेतली. मिळालेले उत्पन्न हे शेतीतच गुंतवले. पंचगंगा नदी काठावरच त्यांनी शेती विकत घेतली. त्यानंतर गुऱ्हाळ घर उभारले. गुळाला मागणी असल्याने आर्थिक भरभराट झाली. त्यातील गुंतवणूक शेतीतच केल्याने पाटील कुटुंबीयांची शेती 25 एकरांवर गेली. डॉ. पाटील यांचे वडील महसूल खात्यात नोकरीला होते; पण त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचाच निर्णय घेतला. घराची शेती, गुऱ्हाळ सांभाळतच डॉ. पाटील यांचे शिक्षण झाले. सन 1984 मध्ये त्यांनी सोलापूर येथील आयुर्वेद कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. सन 1984 पासून कोल्हापूर शहरात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला; पण हा व्यवसाय करताना योग्य प्रतिची वनौषधी मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे लक्षात घेऊन त्यांनी वनौषधींचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास सुरू केला. स्वतःच्या शेतात आता त्यांनी लागवडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शेतीमध्ये प्रयोग सुरू...

सन 1994 मध्ये डॉ. पाटील यांच्या वडिलांचे निधन झाले. शेतीची सर्व जबाबदारी डॉ. पाटील यांच्यावर आली. त्यांच्या वाटणीला वडणगे येथील साडेतीन एकर शेती आली. सर्व जमीन पूरक्षेत्रातील आहे, त्यामुळे ऊस लागवडीवर त्यांचा भर असतो. फेरपालटीला ते भात आणि उन्हाळी भुईमुगाची लागवड करतात. पूर्वी वडील गुऱ्हाळ चालवत होते; पण मजुरांच्या टंचाईमुळे डॉ. पाटील यांना हा व्यवसाय सांभाळणे अशक्‍य झाले, त्यामुळे त्यांनी शेतीवरच लक्ष केंद्रित केले. वैद्यकीय व्यवसाय करतही सर्व शेती सांभाळणे तितके जिकिरीचे होते म्हणून यासाठी त्यांनी शेती भागाने दिली, त्यामुळेच त्यांना शेतीमध्ये प्रयोग करण्यासाठी संधी उपलब्ध झाली. वनौषधींची लागवड स्वतः करून त्यापासून औषधे तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. वैद्यकीय व्यवसाय सांभाळून डॉ. पाटील वडणगे येथील शेतीवर आठवड्यातून दोनदा जातात, तसेच गगनबावडा तालुक्‍यातील तळये येथे त्यांनी तीन वर्षांपूर्वी आठ एकर क्षेत्रावर टप्प्याटप्प्याने वनौषधी लागवडीस सुरवात केली आहे. तेथेही आठवड्यातून दोनदा त्यांची फेरी असते. शेतीतील अडचणीवर मात करीत नवनवीन प्रयोग करण्यावर त्यांचा भर असतो.

1) सन 2004 ते 2007 या काळात पुरामुळे ऊस शेतीचे नुकसान झाले होते. पुराचे पाणी दहा-दहा दिवस शेतातून ओसरलेच नाही. शेतात अनेक ठिकाणचा ऊस वाया गेला. याचा परिणाम उत्पादनावर झाला. शासनाकडून एकरी चार हजार रुपये नुकसानभरपाईही मिळाली; पण इतकी तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना काय आधार देणार? डॉ. पाटील यांनी पुराचे पाणी ओसरल्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये उसाच्या लागवडीत प्रयोग म्हणून दहा गुंठ्यांमध्ये सरीवर अश्‍वगंधाचे बी टोकले. मध्य प्रदेशातील मंडसोर येथील कृषी विद्यापीठातून अश्‍वगंधाचे बी डॉ. पाटील यांना मिळाले. योग्य व्यवस्थापनामुळे पिकाची वाढ चांगली झाली. साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अश्‍वगंधाची काढणी केली. अश्‍वगंधा वनस्पतीची मुळे औषधी असतात. दहा गुंठ्यांच्या प्रयोगामध्ये अश्‍वगंधाच्या मुळाचे 400 किलो उत्पादन मिळाले. त्या वेळी 80 ते 120 रुपये किलो इतका दर होता. दहा गुंठ्यांमध्ये त्यांना 20 हजार रुपये मिळाले. मुळ्यांचा वापर औषधे निर्मितीसाठी त्यांनी केला.

2) ऊस लागवडीची जमीन गाळाची असल्याने रासायनिक खतांचा कमीत कमी वापर केला जातो. माती परीक्षणही त्यांनी करून घेतले आहे. परिसरातील प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने ते आता को-86032 जातीची लागवड करतात. एकरी 60 टनांपर्यंत उत्पादन मिळते, तर खोडव्याचे उत्पादन 35 टनांपर्यंत मिळते. व्यवस्थापन खर्च व भागधारकाचा वाटा वजा जाता एकरी अंदाजे तीस हजार रुपये मिळतात.
3) शेताच्या बांधावर तुळस, माका, ब्राह्मी, गोखरू, कस्तुरी भेंडी, शतावरी, कोरफड, काटे रिंगणी, कुडा, निरगुडी, डोर्ली आदी वनौषधींची लागवड केली आहे. या सर्व वनस्पती स्वतःच्या उपयोगासाठी वापरतात.
4) सध्या डॉ. पाटील यांनी दीड गुंठ्यावर कोरफड लागवड केली आहे. कोरफड कमी पाण्यात येते. आयुर्वेदाच्या दृष्टीने याला चांगली मागणी आहे. अकरा ते बारा महिन्यांत कोरफड तुऱ्यावर येते. या वेळी त्याची काढणी केली जाते. कोरफडीला 25 रुपये किलो असा दर मिळतो. त्यांना पाणी, भांगलणी आदीचा मशागतीचा खर्च अंदाजे चार ते पाच हजार रुपये इतका आला. हा खर्च वजा जाता त्यांना एका गुंठ्यातून सहा हजार रुपये मिळाले.
5) गेल्या वर्षी डॉ. पाटील यांनी 27 गुंठ्यांत भाताच्या संकरित जातीची लागवड केली होती. ऐन कापणीच्या काळात पावसाळी वातावरण झाले. तयार भात भिजणार होते, त्यामुळे मजुरांच्यावर अवलंबून न राहता त्यांनी भाताची कापणी मळणी यंत्राने केली. एकरी सहा हजार रुपये इतके भाडे लागले. 27 गुंठ्यांवरील भात अवघ्या एका तासाभरात मळणी होऊन हातात आला. दर वर्षी मजुरांच्या साह्याने मळणीसाठी अंदाजे चार हजार रुपये खर्च येतो. यंत्राने मळणीने अधिक खर्च झाला, तरी भाताचे संपूर्ण नुकसान टाळता आले, वेळही वाचला. 27 गुंठ्यांत 15 पोती भात उत्पादन झाले. हा भात घरासाठी ठेवला आहे.
6) शेती उत्पादनाच्या 50 टक्के हिस्सा हा भागधारकास दिला जातो. यामुळे उत्पादनवाढीसाठी भागधारकाकडून प्रयत्न होतात. डॉ. पाटील यांना वनौषधी तसेच विविध प्रयोगासाठीही भागधारकाची मोठी मदत होते.
7) आयुर्वेद प्रचारासाठी डॉ. पाटील यांनी अमेरिका, जर्मनी, नेदरलॅंड, सिंगापूर, युगोस्लाव्हिया, मॉरिशस, मलेशिया, थायलॅंड, श्रीलंका आदी देशांचे दौरे केले आहेत. परदेशातही ते शेती प्रकल्पांना भेटी देतात. नेदरलॅंड मधील पशुपालन आणि फुलशेती डॉ. पाटील यांना अधिक प्रभावी वाटली. त्यातून नवीन गोष्टी आपल्या शेतात राबविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

शेती झाले माहिती केंद्र 7) गगनबावडा तालुक्‍यातील तळये येथील निसर्गरम्य परिसरात डॉ. पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी आठ एकर जमीन खरेदी केली. या जागी आयुर्वेद ग्राम उभारण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या त्यांनी या जागेत नैसर्गिक पद्धतीने बहावा, कुंभा, गेळफळ, मदनफळ, जांभूळ, करवंदे, ब्राह्मी, वीजमसार, खैर, कुडा, अनंतमुळ, डोर्ली, निरगुडी, रिंगणी, मधुमालती आदी अनेक वनस्पती या क्षेत्रावर त्यांनी लावल्या आहेत. येथे वर्षातून तीन ते चार वेळा शिबिरांचे आयोजन केले जाते. यामध्ये विद्यार्थी, शेतकरी, पर्यावरण प्रेमी भाग घेतात.

ऍग्रोवन ठरतो मार्गदर्शन
1) दै. ऍग्रोवनमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवांचा शेती नियोजनात फायदा.
2) वेगवेगळ्या प्रयोगांच्या नोंदी, तसेच शेतीच्या जमा-खर्चाचा हिशेब ठेवला जातो.
3) कृषी संशोधन केंद्रे तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी गाठीतून नवीन तंत्राचा अवलंब.
4) वनौषधी प्रसारासाठी शेतावर चर्चासत्रांचे आयोजन.

संपर्क ः डॉ. सुनील पाटील ः 9422049405

Saturday, January 4, 2014

.कृषि ज्ञानेश्‍वरी

हातोटी

गाय धड जोडे गोमटी । ते तैंचि पिवों ये किरीटी ।
जैं जाणिजे हातवटी । सांजवणीची ।।

गाय दुधाळ आहे. कासेला भरपूर दूध आहे. पण कासेतून दूध कसे काढायचे?
याचे तंत्रच अवगत नाही. मग दुधाळ गाय खरेदी करून दूध मिळणार आहे का? जनावरे
पाळायची आहेत. मग यासाठी आवश्‍यक ते शास्त्र जाणून घ्यायला नको का? ती कशी
पाळायची याचे तंत्र जाणून घ्यायला हवे. जनावरांना चारा, पाणी किती द्यायचे कधी
द्यायचे. किती प्रमाणात द्यायचे हे सर्व माहित हवे. दुधाचे उत्पादन योग्य हवे तर योग्य ते
घटक जनावरांना द्यायला हवेत. त्याची वेळही ठरलेली असते. जनावरांच्या वाढीसाठी
आवश्‍यक मुलद्रव्ये द्यायला हवीत. खुराक कसा असावा किती प्रमाणात हवा याचेही
नियोजन हवे. तरच दुधाचे उत्पादन योग्य प्रमाणात होऊ शकेल. जनावरे सांभाळताना
त्याचे अर्थ शास्त्र जाणून घ्यायला हवे. जनावरांच्या खुराकावर किती खर्च होतो.
त्याच्या संगोपनासाठी एकूण खर्च किती येतो. त्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते का?
या उत्पादनातून योग्य तो नफा हाती लागतो का? याचे गणितही मांडता यायला हवे.
तोटा सहन करून कोणताही उद्योग चालत नाही. शेती हा एक उद्योग आहे. या दृष्टिकोन
डोळ्यासमोर ठेवून तो करायला हवा. जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. पण ती
पाळताना तोटा सहन करावा लागू नये याची काळजी घ्यायला नको का? जोडधंदा
हा मुख्य उद्योगाला हातभार लावण्यासाठी असतो. मुख्य पिकाला फटका बसला तर
त्या फटक्‍याची झळ शेतकरी कुटुंबाला बसू नये यासाठी जोडधंदे आहेत. व्यवसाय
करताना त्याचा प्रथम अभ्यास करायला हवा. या व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्‍यक
ते नियोजन करायला हवे. तसा विचार करायला हवा. शेतात बी पेरले की ते उगवते.
पण ते कसे पेरायला हवे. उत्पादन अधिक येण्याच्या दृष्टीने कसे पेरायचे याचे
तंत्र जाणून घ्यायला हवे. केळीचे पीक 40 ते 45 महिने उत्पादन देते. खोडवा,
निडवा याचे योग्य व्यवस्थापन करून हा कालावधी कमी करता येतो. विशेष म्हणजे
उत्पादनही तेवढेच ठेवून. हे नवे तंत्र आत्मसात करून शेती करायला हवी. तीसमहिन्यात केळीचे खोडवा, निडवा घेता आला तर उरलेल्या कालावधीत एखादे
पीक सहज घेता येणे शक्‍य आहे. घड कोणत्या बाजूला पडतो त्याच्या विरुद्ध
दिशेला पहिल्या पिकाचे घड तयार होण्याआधीच खोडवा ठेवून पिकाचा कालावधी
कमी करता येतो. असे नवे तंत्र आत्मसात करायला हवे. तसेच असे नवे तंत्रस्वतः शोधायला हवे. नियोजनातून, अभ्यासातून होणाऱ्या चुका दुरुस्त करत उत्पादन
वाढीवर भर दिला तर शेतीमध्ये निश्‍चितच प्रगती होऊ शकेल. शेती कशी करायची
याची हातोटी शिकायला हवी. गुरू प्रसन्न आहेत. शिष्यानेही अध्यात्माचा अभ्यासकेला आहे. पण आत्मज्ञान कसे प्राप्त होते हेच शिष्य जाणत नसेल तर तो आत्मज्ञानी
कसा होईल?

12...........................................................................कृषि ज्ञानेश्‍वरी

ठिबक सिंचन

म्हणोनी जाण तेन गुरू भजिजे । तेणें कृतकार्या होईजे ।
जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।।

झाडाची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी त्याच्या मुळाशी पाणी द्यावे लागते
हा विचार संत ज्ञानेश्‍वरांनी त्या काळात सांगितला. यावरून त्याकाळात झाडांची,
रोपांची वाढ कशी होते. त्याला अधिकाधिक फळे लागावीत, उत्पन्न भरघोस यावे
यासाठी प्रयत्न हे केले गेले होते. ठिबक सिंचन हे आज प्रगत शेतीचे तंत्रज्ञानसमजले जात असले तरी बाराव्या शतकातही हेच तंत्र वापरून शेती केली जात होती.
फक्त त्या काळातील सिंचनाची पद्धत वेगळी होती. मडक्‍याच्या तळाशी छोटे छिद्र
पाडून ते मडके झाडाच्या, रोपाच्या मुळाशी पुरले जायचे. तेव्हा विद्युत मोटार किंवा
पंपही नव्हते. पाणी दुरून आणून घालावे लागत होते. ही पुरलेली मडकी पाण्याने
भरली जायची. मडक्‍याच्या छिद्रातून हळूहळू पाणी झाडाच्या मुळापर्यंत झिरपते. अशा
पद्धतीने पाणी दिले जायचे थेट झाडाच्या मुळांशी पाणी देण्याची पद्धत त्याकाळात
अवगत होती. खतेही याच पद्धतीने दिली जात होती. झाडाच्या भोवती गोलाकार रिंग
करून सेंद्रिय खत पेरले जायचे. पुढील काळात मोटेचा शोध लागला. मोटेने पाणी
खेचले जाऊ लागले. त्यानंतर पंपाने पाणी खेचण्याचा शोध लागला. वाट्टेल तेवढे
पाणी विहिरीतून खेचता येऊ लागले. तसे पाण्याचा वाट्टेल तसा वापर होऊ लागला.
अशाने शेतांना मीठ फुटण्याचे प्रकारही घडत आहेत. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न
झाल्याने त्याचा उत्पादनावरही परिणाम होत आहे, पण तरीही आज पाटानेच पाणी
देण्याची पद्धत शेतकरी वापरत आहेत. उत्पादन घट होऊनही, जमीनीचा पोत बिघडला
जात असूनही शेतकरी पिकांना पाटानेच पाणी देण्याची पद्धत वापरत आहे. शास्त्रोक्त
पद्धतीने आज शेती केलीच जात नाही, याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे.
पिकांच्या मुळाशी पाणी देणे गरजच आहे हे शास्त्र सांगते. ज्ञानेश्‍वरांनी हे शास्त्र बाराव्या
शतकात सांगितले, पण मनुष्याच्या आळशीपणामुळे शास्त्रोक्त पद्धती शेतीत वापरल्या
जात नाहीत. काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहेत. पिकांच्या मुळाशी पाणी
देण्याची ठिबक सिंचनाची पद्धत वापरून भरघोस उत्पादन घेत आहेत, पण अशा
शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे. दररोज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत
व्हावा यासाठी ज्ञान विस्ताराचे कार्य केले जाते. ठिबकचा वापर शेतीत वाढावा
यासाठी शासनाचे अनुदानही उपलब्ध आहे, पण तरीही शेतकरी याचा वापर करत
नाहीत. आता शेतकऱ्यांनी हा आळस झटकून शास्त्रोक्त पद्धतीने शेती करायला हवी
तरच भावी काळात शेती टिकून राहणार आहे. याचा विचार करायला हवा.

कृषि ज्ञानेश्‍वरी............................................................................13

सुक्षेत्र

कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।
तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ।।

शेतात टाकले की उगवते. उत्पादन मिळते. जास्त कष्ट करावे लागत नाहीत.
पेरले की थेट काढणीलाच शेतात जाणारेही अनेक शेतकरी आहेत. अशाने आता
शेती तोट्याची झाली आहे. ही मानसिकता बदलायला हवी. कोकणात तसेच पश्‍चिम
घाटमाथ्यावर भाताची कापणी झाल्यानंतर नांगरट करून त्या शेतात हरभरा विस्कटून
टाकण्याची पद्धत आहे. काढणीनंतर परतीचा पाऊस पडला तर हा हरभरा जोमात
उगवतो. तीन महिन्यात हरभरा काढणीला येतो. पेरणीनंतर थेट काढणीलाच शेतकरी
शेतात जातात. फारसे कष्ट न घेता हरभऱ्याचे उत्पादन हाती लागते. आजही ही पद्धत
रूढ आहे. एकरी एक-दोन पोती उत्पादन होते. चार जणांच्या शेतकरी कुटुंबाला
वर्षभर हे धान्य पुरते, पण शास्त्रोक्त पद्धतीने हरभरा लागवड केली तर एकरी पाच
पोती उत्पादन मिळते. अडीच पट अधिक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल
हवा. यात आळस नको. क्षेत्रात लागवड नको तर सुक्षेत्रात लागवड हवी. जमीनीची
नांगरट योग्य प्रकारे केलेली असावी. ओळीमध्ये ठराविक अंतरावर पेरणी केलेली
असावी. इतकेच नव्हे तर संत ज्ञानेश्‍वरांनी बी पेरताना ते किती खोलीवर पेरावे याचेही
शास्त्र सांगितले आहे. पिकाची योग्य निगा राखली जावी. त्याच्यावर पडणाऱ्या
कीड-रोगांचा बंदोबस्त करायला हवा. उत्पादन वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या
उपाययोजना करायला हव्यात. खते, पाणी वेळेवर द्यायला हवे. बरेच शेतकरी असे
म्हणतात. असे करण्यासाठी पैसा लागतो. खर्च वाढतो. उत्पादन आले तरी खर्च
वाढतो. सुक्षेत्रात जोमदार पिकात कीड-रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. याचा
विचार कोण करत नाही. यासाठीच याचे अर्थशास्त्र शेतकऱ्यांनी अभ्यासायला हवे.
खर्च खरंच किती होतो. उत्पादन किती टक्‍क्‍यांनी वाढते. हे विचारात घ्यायला हवे.
जमाखर्च मांडला तरच समजेल शेतीत कोणत्या सुधारणा करायला हव्यात. खर्चावर
नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते उपाय योजावेत यावर विचार होऊ शकेल. शेती हा जर
धंदा आहे तर मग धंदेवाईक दृष्टिकोन का नको? शहरात फेरफटका मारायला जाताना
कपडे नीटनेटके घालतो. चेहऱ्याला विविध सौंदर्य प्रसादने लावतो. सुंदर दिसण्यासाठी
काळजी घेतो. हे करताना महागाईचा विचार डोक्‍यात येत नाही. शेतात सुधारणा
करताना महागाई आडवी येते. सुधारणा केली तर उत्पन्नात वाढ होणार याचा विचार
का केला जात नाही? चांगले दिसण्यासाठी खर्च, मग चांगले उत्पादन मिळविण्यासाठी
सुक्षेत्र का नको? यात टंगळामंगळ व्हायला नको. आळस हाच माणसाचा खरा शत्रू
आहे. आळसाने कोणतेही काम होत नाही. आळस झटकून देऊन काम करण्याची वृत्ती
हवी, तरच प्रगतीच्या वाटा सापडतील.

14..........................................................................कृषि ज्ञानेश्‍वरी

भाजलेले बी

देखें अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरुढती ।
तशी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ।।

पावसाळ्यानंतर डोंगरावर वाढलेले गवत वाळते. या गवताला आग लावली
तर त्या धगीमध्ये अनेक वृक्ष, रोपे नष्ट होतात. गवताचे बीजही करपून निघते. अशा
या वनव्यामुळे अनेक ठिकाणी डोंगर ओसाड होताना पाहायला मिळत आहेत. आगीत
भाजलेले बी अंकुरत नाही. हाच विचार घेऊन शेतजमीनी भाजण्याचाही प्रयोग अनेक
शेतकरी करतात. शेतात तणांचा प्रादुर्भाव अधिक वाढला असेल तर, उन्हाळ्यामध्ये
शेत जमीन भाजून घेतात. नांगरट करून सूर्याच्या धगीत जमीन शेकवली जाते. पिकाचे
उरलेले अवशेष पाला पाचोळा शेतात जाळून जमीन शेकवली जाते. या धगीत तणांचे
बी शेकले जाते. भाजलेले हे बी अंकुरत नाही. कीड-रोगांचेही बीजांडे नष्ट होतात.
साहजिकच तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. मोठ्या प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव झालेल्या
शेतात ही पद्धत वापरली जाते. शेतात आग केल्याने जमिनीतील आवश्‍यक जिवाणूही
नष्ट होतात. यामुळे आता जमिन भाजण्याची किंवा शेकण्याची पद्धत आता वापरली
जात नाही. त्याऐवजी तण कुजविण्याची पद्धत रूढ झाली आहे. जमीन शेकविण्याऐवजी
वाढलेले तण फुलोऱ्यावर येणाआधीच ते जमीनीत गाढण्यात येते. उसामध्ये पाचट
कुजवून पिकांमध्ये सेंद्रिय खत तयार केले जात आहे. जमीनीला आवश्‍यक सेंद्रिय कर्ब
उपलब्ध होत नसल्याने आता हा प्रयोग अनेक शेतकरी करत आहेत. सेंद्रिय कर्बामुळे
जमीनीतील जिवाणूंची कार्यक्षमता वाढते. पिकांच्या वाढीला जोर मिळतो. पीक
जोमात असेल तर त्यावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. निरोगी शरीरात जशी
रोगप्रतिकारक क्षमता अधिक असते तसेच जोमात वाढलेल्या पिकांमध्येही रोगप्रतिकार
शक्ती अधिक असते. तणांचा प्रादुर्भाव असणाऱ्या शेतात भरघोस उत्पन्नाची अपेक्षा
करणे चुकीचे आहे. पण फुलोरा येण्यापूर्वी हेच तण शेतात कुजविले तर सेंद्रिय
घटकांच्या निर्मितीचा पिकाला फायदा होऊ शकेल. ताग, ढेच्या ही हिरवळीची खते
जशी शेतात कुजविली जातात तशी तणही कुजविली जाऊ शकतात. ताग, ढेच्या
लवकर कुजतात. त्यामुळे ते कार्यक्षम घटक जमिनीत निर्माण करू शकतात. तसे तण
कुजण्यास जरी वेळ लागला तरी त्यातूनही कार्यक्षम घटक तयार होऊ शकतात. तण
देई धन हा विचार घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात प्रताप चिपळूणकर शेती करत आहेत.
त्यांचा आदर्श घेऊन राज्यात अनेक शेतकऱ्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे. बदलत्या
शेतीपद्धतीत सेंद्रिय खताचा तुटवडा जाणवत आहे. जनावरांची संख्या घटल्याने याचा
फटका सेंद्रिय खताच्या निर्मितीवर झाला आहे. सेंद्रिय खताचा वापरच शेतामध्ये
केला जात नाही. अशाने जमिनी नापिक होण्याचा धोकाही बळावला आहे. शेतांची
उत्पादकता झपाट्याने घटताना दिसत आहे. जमिन पिकाऊ राहिली तरच शेती टिकेल.
यासाठी ती पिकाऊ ठेवण्यासाठी आवश्‍यक असणारे उपायही योजने गरजेचे आहे.

कृषि ज्ञानेश्‍वरी............................................................................15

विचारी पक्षी

देखे उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबे जैसा ।
सांगे नरु केवीं तैसा । पावे वेगां ।।

पूर्वीच्या काळी प्रत्येक गोष्टीची बारीक निरीक्षणे केली जात होती. पक्ष्यांचे
गुण काय आहेत? तो कसा वागतो? तो कसा बोलतो? तो कसा चालतो? तो कसा
विचार करतो? तो कोठे राहातो? तो कसा राहतो? स्वतःचे स्वतः कसे उपचार करतो?
समुहाने राहतो की एकटा राहातो? त्याचे स्थलांतर? आदी सर्व गोष्टींचा अभ्यास केला
जात होता. अशा या निरीक्षणातूनच पक्षांचे संरक्षण व पिकाचे पक्षांपासून संरक्षण यावर
उपाय निश्‍चित केले होते. जगा व जगू द्या हा विचार जोपासला जात होता. आता
हा विचार मागे पडला आहे. पिकांचे पक्षांपासून संरक्षण करताना गोफन वापरली
जायची. शेतात बुजगावणे उभे केले जायचे. हे उपाय हे निरीक्षणातूनच शोधले गेले
होते. यामध्ये पक्षाला कोठेही इजा होणार नाही याची दक्षता घेतली गेलेली आढळते.
गोफणीने फक्त पक्षी हुसकावून लावले जायचे. पक्षी पिकांकडे येणार नाहीत यासाठी
बुजगावणे उभारले जायचे. काही ठिकाणी गोंगाट केला जायचा. आवाजामुळे पक्षी
पळून जावेत हा त्यामागचा उद्देश होता. ढोल, टिमकी वाजवली जायची. यामध्ये पक्षी
ठार मारण्याचा कोणताही उपाय नव्हता. फळे खातात, पिकातील दाणे खातात म्हणून
थेट त्यांना ठार मारा असा कोणताही उपाय येथे नव्हता. पण सध्याच्या युगात असा
विचार मांडला जात नाही. उपाय योजताना हा विचार केलाच जात नाही. नुकसान
होते ना? मग रोखण्यासाठी त्यांना ठार मारणे ही गरज आहे असाच विचार केला
जातो. पक्षी असो कीटक असो याचा समुळ नायनाटच केला जात आहे. रसायनांच्या
फवारण्यामुळे फक्त कीटकच मरतात. असा दावा केला जातो. पण त्याचे अनेक
दुष्परिणाम होत आहेत याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर
विचारही आता बदलत चालले आहेत. अहिंसेचा विचार मागे पडत आहे. अहिंसेच्या
विचारावर आधारित नियोजनच केले जात नाही. हा विचार कालबाह्य मानला जात
आहे. पण जीवन चक्रच खंडित केले जात असल्याने भावी काळात अनेक समस्या
उत्पन्न होणार आहेत. झटपट जीवनशैलीमध्ये दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. आत्ताची
गरजच विचारात घेतली जाते. पुढील काळात त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेतयाचा विचारच केला जात नाही. पक्षाला फळ दिसले, तर तो लगेचच फळाकडे धाव
घेत नाही. एका फांद्यावरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहातो. सर्व बाजूंनी फळाचे
निरीक्षण करतो. कोणी आहे का नाही याची खात्री करून घेतो. हळूहळू फळाकडे
धाव घेतो. पण माणूस मात्र झटपट फळाची अपेक्षा करतो. पक्षाला विचार आहे, पण
मानवाला हा विचार जोपासता येत नाही. हे दुर्दैव्यच म्हणावे लागेल. प्रयत्न करत
राहिले तर यश मिळते. झटपट यशाची अपेक्षा ठेवू नये.

Thursday, January 2, 2014

प्रा. नलगे ग्रंथालयातर्फे पुरस्कार

प्रा. नलगे ग्रंथालयातर्फे जानेवारीत पुरस्कारांचे वितरण
उजळाईवाडी (ता. करवीर) येथील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयामार्फत दिला जाणारा ग्रंथपुरस्कार प्रदान सोहळा 12 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध मराठी कादंबरीकार प्रा. वसंतराव बोधे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गोवा येथील नामवंत लेखकांनी मोठ्या प्रमाणात आपले ग्रंथ पाठविले होते. ग्रंथपुरस्कारप्राप्त लेखकांमध्ये डॉ. विश्‍वनाथ शिंदे (सावळजकरांचा तमाशा), प्रा. सुहासकुमार बोबडे (अग्निकुंड), जयश्री बापट (जीवन संगीत), दिवाकर गंधे (जीवन-एक उत्सव), अशोक चिटणीस (हृदयस्थ), देवराज कामटवार (आयुष्य पडद्यामागचे), रामदास कामत (आम्ही बी घडलो), "सकाळ'चे उपसंपादक राजेंद्र घोरपडे (इये मराठीचिये नगरी), सिसिलिया कार्व्हालो (थुई थुई), रमेश तांबे (खिडकी), रजनी हिरळीकर (बोधकथा), बाळासाहेब तोरस्कर (प्रीतफूल), प्रा. डॉ. जे. के. पोवार (पत्र पावलेली अन्‌ भावलेली), विठ्ठल आप्पाजी भोसले (विठ्ठलायन) आदींचा समावेश आहे.

Tuesday, November 26, 2013

अनुभव ज्ञानेश्‍वरी पुस्तक प्रस्तावना

।। ॐ ।।
विवेकाचे गाव
आदरणीय सद्‌गुरू दादा महाराज सांगवडेकर यांच्या परिवारातील ज्ञानेश्‍वरीचे
अभ्यासक माननीय राजेंद्र घोरपडे यांचे अनुभव ज्ञानेश्‍वरी हे पुस्तक वाचले. घोरपडे
हे सकाळ मध्ये उपसंपादक आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांची भ्रमंती आहे. ते
ज्ञानेश्‍वरीचे अभ्यासक आहेत. साधक ही आहेत. माननीय रामराया सांगवडेकर याचा
सहवास त्यांना लाभला आहे. तो मौलिक आहे. आजच्या काळात ज्ञानेश्‍वरी कशी
अनुभविता येईल याविषयीचे ललित चिंतन या पुस्तकात आहे. ज्ञानेश्‍वरीतील निवडक
ओव्यांच्या आधारे केलेले हे चिंतन, छोटेखानी असले, तरी त्याला मनाने समजून
घेण्याचा अवकाश फार मोठा आहे.
हे पुस्तक विवेकाला अनुसरून आहे. गावात विवेक जागा असेल, तर सर्व प्रश्‍न
सुटतात. त्यासाठी अहंकार नाहीसा करावा लागतो. श्रमदानातून आणि विनम्रवृत्तीतून
एकी निर्माण होते. शरीराचे आणि मनाचे आरोग्य सुधारते. शरीराच्या उगाचच
कष्टविण्याचे कारक नाही. गुरुकृपेने असा विवेक प्राप्त होतो. त्यागाची भावना म्हणजे
संन्यास होय. देहातील विविध रसायनयुक्त असा देह बनतो. त्याच्यात आत्मचैतन्य
येते. हा विज्ञानाचा भाव नीट अभ्यासला पाहिजे, तरच आत्मज्ञानाचा अनुभव येतो.
आत्मज्ञानाच्या विकासासाठी मठ किंवा शिवालय असते. आज मात्र मठांमध्ये तंटे
निर्माण झाले आहेत. विविध देवालयातील विेशस्तांना आपली खुर्ची सांभाळण्याची
काळजी लागली आहे. यावर ज्ञानदेवांनी अत्यंत महत्त्वाचा उपाय सुचविला आहे.
तो म्हणजे, विवेक शक्ती वाढविणे हा होय. त्यासाठी ध्यानाची आवश्‍यकता आहे.
च्या एकाग्रतेतून ध्यानाच्या वाटा दिसू लागतात. त्यावर वाटचाल करणे एकूणच
अवघड असते. गुरुसेवेतून अशा वाटा सहज होतात. मनाचा अभ्यास नीट होतो.
साध्या-साध्या दैनंदिन जीवनातून या गोष्टी समजून घेता येतात. आजच्या सुसाट
जीवनात याची गरज आहे. ते घोरपडे यांनी परिणामकारकपणे सांगितले आहे. मनाला
अध्यात्माची गरज आहे. शरीराला आयुर्वेदाची गरज आहे. मनाला गुरुसेवा जरुरीची
आहे. शरीराला खिलाडूपणा आवश्‍यक आहे. यासाठी उत्कृष्ट कर्मे ही महत्त्वाची
आहेत. नित्यकर्म ही देवपूजा मानायला हवी. त्यासाठी प्रत्येकाला ज्ञानाचा हक्क आहे.
हे ज्ञान वारसा हक्काने क्वचित मिळते. ज्ञानातून आत्मज्ञान मिळाले, की मनाला आनंद
मिळतो. सुख क्षणिक असते. आनंद चिरंजीव असतो.

ज्ञानेश्‍वरीतील अनुभवविश्‍व समृध्द आहे. ते आजही मनास धैर्य देते. विश्‍व
म्हणजे वर्तमानातील जाणिवांचा समूह. जाणीव नेहमी वर्तमानाला पूरक असते.
विवेकाला जाणिवेची बैठक लागते. मनाला विचार करण्याची सवय जडते. असे
विचार सक्रिय असतात. यातून मानवी निर्णय चांगले ठरतात. सत्याचा आग्रह गरजेचा
ठरतो. यातून अहिंसा अनुभवता येते. स्वतःमध्ये गुण असतील तर, अहिंसेला मूल्य
प्राप्त होते. तेच देवाचे रूप असते. अध्यात्म ही सेवा आहे. सेवाभाव विश्‍व जिंकू
शकतो. गंगेचे पाणी साऱ्यांना स्वच्छ करते. त्याप्रमाणे शुद्ध मन अनेकांना स्वच्छ
करते, आपले कर्तव्य-कर्म चोख केले की, माणसाला देवपणाचा अनुभव येतो.
घोरपडे यांना समर्थाचिया पंक्तिभोजनें या ओवीत समान नागरी कायदा जाणवला.
विठ्ठलाच्या दर्शनाला वेगळी रांग नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानात वेगळी रांग नसते. ती
एक विशिष्ट दृष्टी असते.
या पुस्तकात अनेक चिंतनशील विचार आहेत. यातून ज्ञानेश्‍वरीकडे वेगळ्या
दृष्टीने बघता येते. अंतरंग शुद्ध राखणे आणि अहंतेला थारा न देणे या महत्त्वाच्या
बाबी आहेत. हे ध्यानात येण्यासाठी हे पुस्तक वाचावे. ते मन शुद्ध करील. आपणही
शुद्धीवर येऊ. संवेदनशील मनाला हे पुस्तक आवडावे. सुबोध वाक्‍ये, सुलभ निरूपण,
श्रद्धायुक्त मन या लेखातून व्यक्त होते. आजचा वर्तमान निवांत मनाने कसा जगता येईल
ते या पुस्तकातून कळते. श्रद्धेतून मिळणारी डोळस जाणीव विवेकाचा गाव निर्माण
करते. या गावात विशुद्ध मी आनंदाने राहतो. त्याच्याशी बोलायला माऊली येते.
तो जगण्यातून नवा होतो. त्याच्या आत्मज्ञानाला बहर येतो. शांतवृत्तीतून तो मनाचा
नंदादीप लावतो. देवाशी बोलताना, त्याच्या मनाला भरती येते. निष्काम कर्मातून तो
गगनभरारी घेतो. त्याच्या प्रत्येक कृतीला माऊली सोबत करते. तो तृप्त होतो. हा
अनुभव या पुस्तकातून श्रीयुत राजेंद्र घोरपडे यांनी दिला. तो त्यांनी आपल्याला प्रसाद
म्हणून वाटला. हे भाग्य ज्याला मिळेल, त्याला सारे काही मिळेल. याबद्दल श्रीयुत
घोरपडे यांचे अभिनंदन. त्यांना पुढील लेखनप्रवासासाठी शुभेच्छा.

डॉ. यशवंत पाठक,
संत ज्ञानदेव अध्यासन प्रमुख,
पुणे विद्यापीठ, गणेशखिंड,
पुणे 411007

Monday, November 18, 2013

"अनुभव ज्ञानेश्‍वरी' पुस्तकाचे प्रकाशन

श्री अथर्व प्रकाशनच्या "अनुभव ज्ञानेश्‍वरी' या पुस्तकाचे प्रकाशन आज "सकाळ'च्या कार्यालयात सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, कोल्हापूर सकाळचे निवासी संपादक मनोज साळुंखे, संजय पाटोळे, सुधाकर काशिद, चंद्रशेखर माताडे यांच्या हस्ते झाले. 
 

Thursday, November 14, 2013

"अनुभव ज्ञानेश्‍वरी' येत आहे 17 नोव्हेबरला

इये मराठीचिये नगरी या माझ्या पहिल्या पुस्तकाला वाचकांनी चांगली पसंती दर्शिवली यामुळेच अशी पुस्तके पुन्हा वाचकांच्या भेटीला द्यावीत अशी प्रेरणा मला मिळाली. पहिल्या पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद पाहता ज्ञानेश्‍वरीवर आधारित पुस्तकांची मालिकाच करण्याचा मी संकल्प केला आहे. विविध विषय घेऊन ज्ञानेश्‍वरीच्या ओव्या पुस्तके घेऊन आपल्या भेटीला येत राहणार आहे.
इये मराठीचिये नगरी हे पुस्तक वाचून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.
नागपूरचे चेतन अकर्ते यांनी या पुस्तकांचे मोबाईल ईबुक करण्याची संकल्पना मांडली, तसे ते त्यांनी ताबडतोब केलेही. हजारो मोबाईलधारकांनी हे पुस्तक मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. त्याच्या या कार्याबद्दल त्यांचे उपकार कसे मानावेत हेच समजत नाही. हिंगोली परिसरातील कीर्तनकार माऊली विधाते यांनी ह्या पुस्तकांतील उदाहरणे कीर्तनात सांगण्याची परवानगी मागितली. पंकज पाटील, सचिन गावरी, रविंद्र फासे, साई हिवराळे, श्रावण पवार आदींनी ईबुकवर प्रतिक्रियाही नोंदवली. पल्लवी निंबाळकर यांनी कॅलिफोर्निया येथून फोनवर संपर्क साधून पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. अशी अनेकांनी पुस्तकाची स्तुती केली. आपल्या या आर्शीवादानेच अनुभव ज्ञानेश्‍वरी हे पुस्तक लिहिण्यास उत्साह वाढला. अनुभव ज्ञानेश्‍वरी या पुस्तकानंतर आता ज्ञानेश्‍वरीतील शेतीविषयक ओव्या घेऊन कृषी ज्ञानेश्‍वरी लिहिण्याचा प्रयत्न असणार आहे. वाचकांचा प्रतिसाद मिळत राहिला तर लिहिणाऱ्याला स्फुरण चढते. ज्ञानेश्‍वरी स्वतः अभ्यासत इतरांनाही त्यातील प्रसाद मिळावा या उद्देशाने ही सेवा सुरू आहे.
ज्ञानेश्‍वरीचे वाचन करताना जे काही स्फुरले, मनाला भावले, जे काही अनुभवले तेच या अनुभव ज्ञानेश्‍वरी या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्‍वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ आहे. त्यातील एखादी तरी ओवी अभ्यासावी त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा. ती ओवी अनुभवण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू ओव्यांचे अनुभव आपोआपच आपल्या मनाला साद घालतात.
आवड आपोआपच लागते. हळूहळू आपल्याही जीवनात बदल होतो. काय आता सांगावे. सद्‌गुरुच ही सेवा आपल्याकडून करवून घेत आहेत. ह्या सेवेतूनच हळूहळू आत्मज्ञानाची ओळख सद्‌गुरू करून देत आहेत. ह्या सेवेतूनच आता आत्मज्ञानी करावे हीच सद्‌गुरूचरणी प्रार्थना आहे.
या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये मला अनेकांनी मोठे सहकार्य केले. विशेषतः माझे नातेवाईक माजी महापौर शिवाजीराव कदम, गुरुदत्त शुगर वर्क्‍सचे घाटगे आदींनी मोलाची मदत केली. या पुस्तकाचे मुखपृष्ठ कसे असावे, यावर बराच विचार झाला. काही कल्पना मांडून अनेकांची मते घेतली. असेच घेताना दैनिक सकाळमधील प्रदीप घोडके यांनी स्वतः मुखपृष्ठ करून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार त्यांनी सुंदर, आकर्षक, आजच्या पुस्तकांच्या बाजारपेठेत चालू शकेल असे मुखपृष्ठ तयार करून दिले. याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. घोडके काका यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सल्ला घ्यावा म्हणून काही नमुने दाखवले तर त्यांनी ती कल्पना लगेचच प्रत्यक्षात करून दिली. इतकी सहजता त्यांच्या कामात आहे. अध्यात्मामध्ये सहजपणाला अधिक महत्त्व आहे. उत्स्फूर्तपणे एखादी कल्पना सहजपणे मांडणे तितके सोपे नसते. ते आतून यावे लागते. अंतःकरणातून ही सहजता येते. पुस्तकाच्या या कामात अनेकांचे सहकार्य लाभले, यामध्ये प्रसाद इनामदार, विजय वेदपाठक, नितीन सुतार, अभय कोडोलीकर, विनय
गुरव, जगदीश जोशी आदींचेही सहकार्य लाभले. त्यांचाही मनःपूर्वक आभारी आहे. गणेश प्रिंटर्सचे विजयराव थोरवत यांनी छपाई वेळेत करून सहकार्य केले. अथर्व प्रकाशनचे अनुभव ज्ञानेश्‍वरी हे पहिलेच पुस्तक प्रकाशित होत आहे.
प्रकाशनाच्या अनुषंगाने अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्‍यक असते. यामध्ये कोल्हापुरातील अक्षरदालनचे अमेय जोशी व रावा प्रकाशनचे राहुल कुलकर्णी यांनीही बहुमोल सहकार्य केले. विशेषतः जोशी यांनी पुस्तकामध्ये अनेक बदल सुचवले. बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीच्या पुस्तकांना मागणी असते, त्यानुसार आवश्‍यक ते बदल करावे लागतात. भावनिक मुद्दे बाजूला ठेवून पुस्तकामध्ये काही बदल हे गरजेचे असतात. त्यांनी सांगितलेल्या या सूचना पुस्तकनिर्मितीमध्ये निश्‍चितच उपयोगी
ठरल्या. अक्षरदालन व रावा प्रकाशन या दोघांचाही मी ऋणी आहे.
वाचक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. या पुस्तकालाही वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभेल अशी आशा करतो. सद्‌गुरूंच्या कृपेने ज्ञानेश्‍वरीची ही सेवा अशीच अखंड सुरू राहावी. यापुढील कृषी ज्ञानेश्‍वरी या पुस्तकाची निर्मिती लवकरात लवकर
व्हावी. आपल्या सहकार्याने व सद्‌गुरूंच्या आर्शीवादाने हे कार्य निश्‍चितच तडीस जाईल, असा विश्‍वास मला वाटतो.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406