राजेंद्र घोरपडे
स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय
सांभाळून कोल्हापूर येथील डॉ. सुनील पाटील हे शेतीमध्ये नेहमीच विविध
प्रयोग करत असतात. ऊस, भात आणि वनौषधीच्या माध्यमातून त्यांनी शेतीमध्ये
प्रगती केली आहे. शेतीबरोबरीने परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि
अभ्यासकांना वनौषधींची माहिती होण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो.कोल्हापुरात राहणारे डॉ. सुनील पाटील यांचे आजी-आजोबा हे शेतमजूर होते. ते दुसऱ्यांची शेती कसायचे. यातून त्यांनी स्वतः थोडी शेती विकत घेतली. मिळालेले उत्पन्न हे शेतीतच गुंतवले. पंचगंगा नदी काठावरच त्यांनी शेती विकत घेतली. त्यानंतर गुऱ्हाळ घर उभारले. गुळाला मागणी असल्याने आर्थिक भरभराट झाली. त्यातील गुंतवणूक शेतीतच केल्याने पाटील कुटुंबीयांची शेती 25 एकरांवर गेली. डॉ. पाटील यांचे वडील महसूल खात्यात नोकरीला होते; पण त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचाच निर्णय घेतला. घराची शेती, गुऱ्हाळ सांभाळतच डॉ. पाटील यांचे शिक्षण झाले. सन 1984 मध्ये त्यांनी सोलापूर येथील आयुर्वेद कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. सन 1984 पासून कोल्हापूर शहरात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला; पण हा व्यवसाय करताना योग्य प्रतिची वनौषधी मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे लक्षात घेऊन त्यांनी वनौषधींचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास सुरू केला. स्वतःच्या शेतात आता त्यांनी लागवडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
शेतीमध्ये प्रयोग सुरू...
सन 1994 मध्ये डॉ. पाटील यांच्या वडिलांचे निधन झाले. शेतीची सर्व जबाबदारी डॉ. पाटील यांच्यावर आली. त्यांच्या वाटणीला वडणगे येथील साडेतीन एकर शेती आली. सर्व जमीन पूरक्षेत्रातील आहे, त्यामुळे ऊस लागवडीवर त्यांचा भर असतो. फेरपालटीला ते भात आणि उन्हाळी भुईमुगाची लागवड करतात. पूर्वी वडील गुऱ्हाळ चालवत होते; पण मजुरांच्या टंचाईमुळे डॉ. पाटील यांना हा व्यवसाय सांभाळणे अशक्य झाले, त्यामुळे त्यांनी शेतीवरच लक्ष केंद्रित केले. वैद्यकीय व्यवसाय करतही सर्व शेती सांभाळणे तितके जिकिरीचे होते म्हणून यासाठी त्यांनी शेती भागाने दिली, त्यामुळेच त्यांना शेतीमध्ये प्रयोग करण्यासाठी संधी उपलब्ध झाली. वनौषधींची लागवड स्वतः करून त्यापासून औषधे तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. वैद्यकीय व्यवसाय सांभाळून डॉ. पाटील वडणगे येथील शेतीवर आठवड्यातून दोनदा जातात, तसेच गगनबावडा तालुक्यातील तळये येथे त्यांनी तीन वर्षांपूर्वी आठ एकर क्षेत्रावर टप्प्याटप्प्याने वनौषधी लागवडीस सुरवात केली आहे. तेथेही आठवड्यातून दोनदा त्यांची फेरी असते. शेतीतील अडचणीवर मात करीत नवनवीन प्रयोग करण्यावर त्यांचा भर असतो.
1) सन 2004 ते 2007 या काळात पुरामुळे ऊस शेतीचे नुकसान झाले होते. पुराचे पाणी दहा-दहा दिवस शेतातून ओसरलेच नाही. शेतात अनेक ठिकाणचा ऊस वाया गेला. याचा परिणाम उत्पादनावर झाला. शासनाकडून एकरी चार हजार रुपये नुकसानभरपाईही मिळाली; पण इतकी तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना काय आधार देणार? डॉ. पाटील यांनी पुराचे पाणी ओसरल्यानंतर ऑक्टोबरमध्ये उसाच्या लागवडीत प्रयोग म्हणून दहा गुंठ्यांमध्ये सरीवर अश्वगंधाचे बी टोकले. मध्य प्रदेशातील मंडसोर येथील कृषी विद्यापीठातून अश्वगंधाचे बी डॉ. पाटील यांना मिळाले. योग्य व्यवस्थापनामुळे पिकाची वाढ चांगली झाली. साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अश्वगंधाची काढणी केली. अश्वगंधा वनस्पतीची मुळे औषधी असतात. दहा गुंठ्यांच्या प्रयोगामध्ये अश्वगंधाच्या मुळाचे 400 किलो उत्पादन मिळाले. त्या वेळी 80 ते 120 रुपये किलो इतका दर होता. दहा गुंठ्यांमध्ये त्यांना 20 हजार रुपये मिळाले. मुळ्यांचा वापर औषधे निर्मितीसाठी त्यांनी केला.
2) ऊस लागवडीची जमीन गाळाची असल्याने रासायनिक खतांचा कमीत कमी वापर केला जातो. माती परीक्षणही त्यांनी करून घेतले आहे. परिसरातील प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने ते आता को-86032 जातीची लागवड करतात. एकरी 60 टनांपर्यंत उत्पादन मिळते, तर खोडव्याचे उत्पादन 35 टनांपर्यंत मिळते. व्यवस्थापन खर्च व भागधारकाचा वाटा वजा जाता एकरी अंदाजे तीस हजार रुपये मिळतात.
3) शेताच्या बांधावर तुळस, माका, ब्राह्मी, गोखरू, कस्तुरी भेंडी, शतावरी, कोरफड, काटे रिंगणी, कुडा, निरगुडी, डोर्ली आदी वनौषधींची लागवड केली आहे. या सर्व वनस्पती स्वतःच्या उपयोगासाठी वापरतात.
4) सध्या डॉ. पाटील यांनी दीड गुंठ्यावर कोरफड लागवड केली आहे. कोरफड कमी पाण्यात येते. आयुर्वेदाच्या दृष्टीने याला चांगली मागणी आहे. अकरा ते बारा महिन्यांत कोरफड तुऱ्यावर येते. या वेळी त्याची काढणी केली जाते. कोरफडीला 25 रुपये किलो असा दर मिळतो. त्यांना पाणी, भांगलणी आदीचा मशागतीचा खर्च अंदाजे चार ते पाच हजार रुपये इतका आला. हा खर्च वजा जाता त्यांना एका गुंठ्यातून सहा हजार रुपये मिळाले.
5) गेल्या वर्षी डॉ. पाटील यांनी 27 गुंठ्यांत भाताच्या संकरित जातीची लागवड केली होती. ऐन कापणीच्या काळात पावसाळी वातावरण झाले. तयार भात भिजणार होते, त्यामुळे मजुरांच्यावर अवलंबून न राहता त्यांनी भाताची कापणी मळणी यंत्राने केली. एकरी सहा हजार रुपये इतके भाडे लागले. 27 गुंठ्यांवरील भात अवघ्या एका तासाभरात मळणी होऊन हातात आला. दर वर्षी मजुरांच्या साह्याने मळणीसाठी अंदाजे चार हजार रुपये खर्च येतो. यंत्राने मळणीने अधिक खर्च झाला, तरी भाताचे संपूर्ण नुकसान टाळता आले, वेळही वाचला. 27 गुंठ्यांत 15 पोती भात उत्पादन झाले. हा भात घरासाठी ठेवला आहे.
6) शेती उत्पादनाच्या 50 टक्के हिस्सा हा भागधारकास दिला जातो. यामुळे उत्पादनवाढीसाठी भागधारकाकडून प्रयत्न होतात. डॉ. पाटील यांना वनौषधी तसेच विविध प्रयोगासाठीही भागधारकाची मोठी मदत होते.
7) आयुर्वेद प्रचारासाठी डॉ. पाटील यांनी अमेरिका, जर्मनी, नेदरलॅंड, सिंगापूर, युगोस्लाव्हिया, मॉरिशस, मलेशिया, थायलॅंड, श्रीलंका आदी देशांचे दौरे केले आहेत. परदेशातही ते शेती प्रकल्पांना भेटी देतात. नेदरलॅंड मधील पशुपालन आणि फुलशेती डॉ. पाटील यांना अधिक प्रभावी वाटली. त्यातून नवीन गोष्टी आपल्या शेतात राबविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
शेती झाले माहिती केंद्र 7) गगनबावडा तालुक्यातील तळये येथील निसर्गरम्य परिसरात डॉ. पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी आठ एकर जमीन खरेदी केली. या जागी आयुर्वेद ग्राम उभारण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या त्यांनी या जागेत नैसर्गिक पद्धतीने बहावा, कुंभा, गेळफळ, मदनफळ, जांभूळ, करवंदे, ब्राह्मी, वीजमसार, खैर, कुडा, अनंतमुळ, डोर्ली, निरगुडी, रिंगणी, मधुमालती आदी अनेक वनस्पती या क्षेत्रावर त्यांनी लावल्या आहेत. येथे वर्षातून तीन ते चार वेळा शिबिरांचे आयोजन केले जाते. यामध्ये विद्यार्थी, शेतकरी, पर्यावरण प्रेमी भाग घेतात.
ऍग्रोवन ठरतो मार्गदर्शन
1) दै. ऍग्रोवनमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवांचा शेती नियोजनात फायदा.
2) वेगवेगळ्या प्रयोगांच्या नोंदी, तसेच शेतीच्या जमा-खर्चाचा हिशेब ठेवला जातो.
3) कृषी संशोधन केंद्रे तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी गाठीतून नवीन तंत्राचा अवलंब.
4) वनौषधी प्रसारासाठी शेतावर चर्चासत्रांचे आयोजन.
संपर्क ः डॉ. सुनील पाटील ः 9422049405
No comments:
Post a Comment