इये मराठीचिये नगरी या माझ्या
पहिल्या पुस्तकाला वाचकांनी चांगली पसंती दर्शिवली यामुळेच अशी पुस्तके पुन्हा
वाचकांच्या भेटीला द्यावीत अशी प्रेरणा मला मिळाली. पहिल्या पुस्तकाला मिळालेला
प्रतिसाद पाहता ज्ञानेश्वरीवर आधारित पुस्तकांची मालिकाच करण्याचा मी संकल्प केला
आहे. विविध विषय घेऊन ज्ञानेश्वरीच्या ओव्या पुस्तके घेऊन आपल्या भेटीला येत
राहणार आहे. इये मराठीचिये नगरी हे पुस्तक वाचून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. नागपूरचे चेतन अकर्ते यांनी या पुस्तकांचे मोबाईल ईबुक करण्याची संकल्पना मांडली, तसे ते त्यांनी ताबडतोब केलेही. हजारो मोबाईलधारकांनी हे पुस्तक मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. त्याच्या या कार्याबद्दल त्यांचे उपकार कसे मानावेत हेच समजत नाही. हिंगोली परिसरातील कीर्तनकार माऊली विधाते यांनी ह्या पुस्तकांतील उदाहरणे कीर्तनात सांगण्याची परवानगी मागितली. पंकज पाटील, सचिन गावरी, रविंद्र फासे, साई हिवराळे, श्रावण पवार आदींनी ईबुकवर प्रतिक्रियाही नोंदवली. पल्लवी निंबाळकर यांनी कॅलिफोर्निया येथून फोनवर संपर्क साधून पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. अशी अनेकांनी पुस्तकाची स्तुती केली. आपल्या या आर्शीवादानेच अनुभव ज्ञानेश्वरी हे पुस्तक लिहिण्यास उत्साह वाढला. अनुभव ज्ञानेश्वरी या पुस्तकानंतर आता ज्ञानेश्वरीतील शेतीविषयक ओव्या घेऊन कृषी ज्ञानेश्वरी लिहिण्याचा प्रयत्न असणार आहे. वाचकांचा प्रतिसाद मिळत राहिला तर लिहिणाऱ्याला स्फुरण चढते. ज्ञानेश्वरी स्वतः अभ्यासत इतरांनाही त्यातील प्रसाद मिळावा या उद्देशाने ही सेवा सुरू आहे. ज्ञानेश्वरीचे वाचन करताना जे काही स्फुरले, मनाला भावले, जे काही अनुभवले तेच या अनुभव ज्ञानेश्वरी या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ आहे. त्यातील एखादी तरी ओवी अभ्यासावी त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा. ती ओवी अनुभवण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू ओव्यांचे अनुभव आपोआपच आपल्या मनाला साद घालतात. आवड आपोआपच लागते. हळूहळू आपल्याही जीवनात बदल होतो. काय आता सांगावे. सद्गुरुच ही सेवा आपल्याकडून करवून घेत आहेत. ह्या सेवेतूनच हळूहळू आत्मज्ञानाची ओळख सद्गुरू करून देत आहेत. ह्या सेवेतूनच आता आत्मज्ञानी करावे हीच सद्गुरूचरणी प्रार्थना आहे. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये मला अनेकांनी मोठे सहकार्य केले. विशेषतः माझे नातेवाईक माजी महापौर शिवाजीराव कदम, गुरुदत्त शुगर वर्क्सचे घाटगे आदींनी मोलाची मदत केली. या पुस्तकाचे मुखपृष्ठ कसे असावे, यावर बराच विचार झाला. काही कल्पना मांडून अनेकांची मते घेतली. असेच घेताना दैनिक सकाळमधील प्रदीप घोडके यांनी स्वतः मुखपृष्ठ करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांनी सुंदर, आकर्षक, आजच्या पुस्तकांच्या बाजारपेठेत चालू शकेल असे मुखपृष्ठ तयार करून दिले. याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. घोडके काका यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सल्ला घ्यावा म्हणून काही नमुने दाखवले तर त्यांनी ती कल्पना लगेचच प्रत्यक्षात करून दिली. इतकी सहजता त्यांच्या कामात आहे. अध्यात्मामध्ये सहजपणाला अधिक महत्त्व आहे. उत्स्फूर्तपणे एखादी कल्पना सहजपणे मांडणे तितके सोपे नसते. ते आतून यावे लागते. अंतःकरणातून ही सहजता येते. पुस्तकाच्या या कामात अनेकांचे सहकार्य लाभले, यामध्ये प्रसाद इनामदार, विजय वेदपाठक, नितीन सुतार, अभय कोडोलीकर, विनय गुरव, जगदीश जोशी आदींचेही सहकार्य लाभले. त्यांचाही मनःपूर्वक आभारी आहे. गणेश प्रिंटर्सचे विजयराव थोरवत यांनी छपाई वेळेत करून सहकार्य केले. अथर्व प्रकाशनचे अनुभव ज्ञानेश्वरी हे पहिलेच पुस्तक प्रकाशित होत आहे. प्रकाशनाच्या अनुषंगाने अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. यामध्ये कोल्हापुरातील अक्षरदालनचे अमेय जोशी व रावा प्रकाशनचे राहुल कुलकर्णी यांनीही बहुमोल सहकार्य केले. विशेषतः जोशी यांनी पुस्तकामध्ये अनेक बदल सुचवले. बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीच्या पुस्तकांना मागणी असते, त्यानुसार आवश्यक ते बदल करावे लागतात. भावनिक मुद्दे बाजूला ठेवून पुस्तकामध्ये काही बदल हे गरजेचे असतात. त्यांनी सांगितलेल्या या सूचना पुस्तकनिर्मितीमध्ये निश्चितच उपयोगी ठरल्या. अक्षरदालन व रावा प्रकाशन या दोघांचाही मी ऋणी आहे. वाचक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. या पुस्तकालाही वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभेल अशी आशा करतो. सद्गुरूंच्या कृपेने ज्ञानेश्वरीची ही सेवा अशीच अखंड सुरू राहावी. यापुढील कृषी ज्ञानेश्वरी या पुस्तकाची निर्मिती लवकरात लवकर व्हावी. आपल्या सहकार्याने व सद्गुरूंच्या आर्शीवादाने हे कार्य निश्चितच तडीस जाईल, असा विश्वास मला वाटतो. राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर 9011087406 | |||
Thursday, November 14, 2013
"अनुभव ज्ञानेश्वरी' येत आहे 17 नोव्हेबरला
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment