Saturday, January 4, 2014

.कृषि ज्ञानेश्‍वरी

हातोटी

गाय धड जोडे गोमटी । ते तैंचि पिवों ये किरीटी ।
जैं जाणिजे हातवटी । सांजवणीची ।।

गाय दुधाळ आहे. कासेला भरपूर दूध आहे. पण कासेतून दूध कसे काढायचे?
याचे तंत्रच अवगत नाही. मग दुधाळ गाय खरेदी करून दूध मिळणार आहे का? जनावरे
पाळायची आहेत. मग यासाठी आवश्‍यक ते शास्त्र जाणून घ्यायला नको का? ती कशी
पाळायची याचे तंत्र जाणून घ्यायला हवे. जनावरांना चारा, पाणी किती द्यायचे कधी
द्यायचे. किती प्रमाणात द्यायचे हे सर्व माहित हवे. दुधाचे उत्पादन योग्य हवे तर योग्य ते
घटक जनावरांना द्यायला हवेत. त्याची वेळही ठरलेली असते. जनावरांच्या वाढीसाठी
आवश्‍यक मुलद्रव्ये द्यायला हवीत. खुराक कसा असावा किती प्रमाणात हवा याचेही
नियोजन हवे. तरच दुधाचे उत्पादन योग्य प्रमाणात होऊ शकेल. जनावरे सांभाळताना
त्याचे अर्थ शास्त्र जाणून घ्यायला हवे. जनावरांच्या खुराकावर किती खर्च होतो.
त्याच्या संगोपनासाठी एकूण खर्च किती येतो. त्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते का?
या उत्पादनातून योग्य तो नफा हाती लागतो का? याचे गणितही मांडता यायला हवे.
तोटा सहन करून कोणताही उद्योग चालत नाही. शेती हा एक उद्योग आहे. या दृष्टिकोन
डोळ्यासमोर ठेवून तो करायला हवा. जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. पण ती
पाळताना तोटा सहन करावा लागू नये याची काळजी घ्यायला नको का? जोडधंदा
हा मुख्य उद्योगाला हातभार लावण्यासाठी असतो. मुख्य पिकाला फटका बसला तर
त्या फटक्‍याची झळ शेतकरी कुटुंबाला बसू नये यासाठी जोडधंदे आहेत. व्यवसाय
करताना त्याचा प्रथम अभ्यास करायला हवा. या व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्‍यक
ते नियोजन करायला हवे. तसा विचार करायला हवा. शेतात बी पेरले की ते उगवते.
पण ते कसे पेरायला हवे. उत्पादन अधिक येण्याच्या दृष्टीने कसे पेरायचे याचे
तंत्र जाणून घ्यायला हवे. केळीचे पीक 40 ते 45 महिने उत्पादन देते. खोडवा,
निडवा याचे योग्य व्यवस्थापन करून हा कालावधी कमी करता येतो. विशेष म्हणजे
उत्पादनही तेवढेच ठेवून. हे नवे तंत्र आत्मसात करून शेती करायला हवी. तीसमहिन्यात केळीचे खोडवा, निडवा घेता आला तर उरलेल्या कालावधीत एखादे
पीक सहज घेता येणे शक्‍य आहे. घड कोणत्या बाजूला पडतो त्याच्या विरुद्ध
दिशेला पहिल्या पिकाचे घड तयार होण्याआधीच खोडवा ठेवून पिकाचा कालावधी
कमी करता येतो. असे नवे तंत्र आत्मसात करायला हवे. तसेच असे नवे तंत्रस्वतः शोधायला हवे. नियोजनातून, अभ्यासातून होणाऱ्या चुका दुरुस्त करत उत्पादन
वाढीवर भर दिला तर शेतीमध्ये निश्‍चितच प्रगती होऊ शकेल. शेती कशी करायची
याची हातोटी शिकायला हवी. गुरू प्रसन्न आहेत. शिष्यानेही अध्यात्माचा अभ्यासकेला आहे. पण आत्मज्ञान कसे प्राप्त होते हेच शिष्य जाणत नसेल तर तो आत्मज्ञानी
कसा होईल?

12...........................................................................कृषि ज्ञानेश्‍वरी

ठिबक सिंचन

म्हणोनी जाण तेन गुरू भजिजे । तेणें कृतकार्या होईजे ।
जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।।

झाडाची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी त्याच्या मुळाशी पाणी द्यावे लागते
हा विचार संत ज्ञानेश्‍वरांनी त्या काळात सांगितला. यावरून त्याकाळात झाडांची,
रोपांची वाढ कशी होते. त्याला अधिकाधिक फळे लागावीत, उत्पन्न भरघोस यावे
यासाठी प्रयत्न हे केले गेले होते. ठिबक सिंचन हे आज प्रगत शेतीचे तंत्रज्ञानसमजले जात असले तरी बाराव्या शतकातही हेच तंत्र वापरून शेती केली जात होती.
फक्त त्या काळातील सिंचनाची पद्धत वेगळी होती. मडक्‍याच्या तळाशी छोटे छिद्र
पाडून ते मडके झाडाच्या, रोपाच्या मुळाशी पुरले जायचे. तेव्हा विद्युत मोटार किंवा
पंपही नव्हते. पाणी दुरून आणून घालावे लागत होते. ही पुरलेली मडकी पाण्याने
भरली जायची. मडक्‍याच्या छिद्रातून हळूहळू पाणी झाडाच्या मुळापर्यंत झिरपते. अशा
पद्धतीने पाणी दिले जायचे थेट झाडाच्या मुळांशी पाणी देण्याची पद्धत त्याकाळात
अवगत होती. खतेही याच पद्धतीने दिली जात होती. झाडाच्या भोवती गोलाकार रिंग
करून सेंद्रिय खत पेरले जायचे. पुढील काळात मोटेचा शोध लागला. मोटेने पाणी
खेचले जाऊ लागले. त्यानंतर पंपाने पाणी खेचण्याचा शोध लागला. वाट्टेल तेवढे
पाणी विहिरीतून खेचता येऊ लागले. तसे पाण्याचा वाट्टेल तसा वापर होऊ लागला.
अशाने शेतांना मीठ फुटण्याचे प्रकारही घडत आहेत. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न
झाल्याने त्याचा उत्पादनावरही परिणाम होत आहे, पण तरीही आज पाटानेच पाणी
देण्याची पद्धत शेतकरी वापरत आहेत. उत्पादन घट होऊनही, जमीनीचा पोत बिघडला
जात असूनही शेतकरी पिकांना पाटानेच पाणी देण्याची पद्धत वापरत आहे. शास्त्रोक्त
पद्धतीने आज शेती केलीच जात नाही, याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे.
पिकांच्या मुळाशी पाणी देणे गरजच आहे हे शास्त्र सांगते. ज्ञानेश्‍वरांनी हे शास्त्र बाराव्या
शतकात सांगितले, पण मनुष्याच्या आळशीपणामुळे शास्त्रोक्त पद्धती शेतीत वापरल्या
जात नाहीत. काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहेत. पिकांच्या मुळाशी पाणी
देण्याची ठिबक सिंचनाची पद्धत वापरून भरघोस उत्पादन घेत आहेत, पण अशा
शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे. दररोज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत
व्हावा यासाठी ज्ञान विस्ताराचे कार्य केले जाते. ठिबकचा वापर शेतीत वाढावा
यासाठी शासनाचे अनुदानही उपलब्ध आहे, पण तरीही शेतकरी याचा वापर करत
नाहीत. आता शेतकऱ्यांनी हा आळस झटकून शास्त्रोक्त पद्धतीने शेती करायला हवी
तरच भावी काळात शेती टिकून राहणार आहे. याचा विचार करायला हवा.

कृषि ज्ञानेश्‍वरी............................................................................13

सुक्षेत्र

कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।
तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ।।

शेतात टाकले की उगवते. उत्पादन मिळते. जास्त कष्ट करावे लागत नाहीत.
पेरले की थेट काढणीलाच शेतात जाणारेही अनेक शेतकरी आहेत. अशाने आता
शेती तोट्याची झाली आहे. ही मानसिकता बदलायला हवी. कोकणात तसेच पश्‍चिम
घाटमाथ्यावर भाताची कापणी झाल्यानंतर नांगरट करून त्या शेतात हरभरा विस्कटून
टाकण्याची पद्धत आहे. काढणीनंतर परतीचा पाऊस पडला तर हा हरभरा जोमात
उगवतो. तीन महिन्यात हरभरा काढणीला येतो. पेरणीनंतर थेट काढणीलाच शेतकरी
शेतात जातात. फारसे कष्ट न घेता हरभऱ्याचे उत्पादन हाती लागते. आजही ही पद्धत
रूढ आहे. एकरी एक-दोन पोती उत्पादन होते. चार जणांच्या शेतकरी कुटुंबाला
वर्षभर हे धान्य पुरते, पण शास्त्रोक्त पद्धतीने हरभरा लागवड केली तर एकरी पाच
पोती उत्पादन मिळते. अडीच पट अधिक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल
हवा. यात आळस नको. क्षेत्रात लागवड नको तर सुक्षेत्रात लागवड हवी. जमीनीची
नांगरट योग्य प्रकारे केलेली असावी. ओळीमध्ये ठराविक अंतरावर पेरणी केलेली
असावी. इतकेच नव्हे तर संत ज्ञानेश्‍वरांनी बी पेरताना ते किती खोलीवर पेरावे याचेही
शास्त्र सांगितले आहे. पिकाची योग्य निगा राखली जावी. त्याच्यावर पडणाऱ्या
कीड-रोगांचा बंदोबस्त करायला हवा. उत्पादन वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या
उपाययोजना करायला हव्यात. खते, पाणी वेळेवर द्यायला हवे. बरेच शेतकरी असे
म्हणतात. असे करण्यासाठी पैसा लागतो. खर्च वाढतो. उत्पादन आले तरी खर्च
वाढतो. सुक्षेत्रात जोमदार पिकात कीड-रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. याचा
विचार कोण करत नाही. यासाठीच याचे अर्थशास्त्र शेतकऱ्यांनी अभ्यासायला हवे.
खर्च खरंच किती होतो. उत्पादन किती टक्‍क्‍यांनी वाढते. हे विचारात घ्यायला हवे.
जमाखर्च मांडला तरच समजेल शेतीत कोणत्या सुधारणा करायला हव्यात. खर्चावर
नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते उपाय योजावेत यावर विचार होऊ शकेल. शेती हा जर
धंदा आहे तर मग धंदेवाईक दृष्टिकोन का नको? शहरात फेरफटका मारायला जाताना
कपडे नीटनेटके घालतो. चेहऱ्याला विविध सौंदर्य प्रसादने लावतो. सुंदर दिसण्यासाठी
काळजी घेतो. हे करताना महागाईचा विचार डोक्‍यात येत नाही. शेतात सुधारणा
करताना महागाई आडवी येते. सुधारणा केली तर उत्पन्नात वाढ होणार याचा विचार
का केला जात नाही? चांगले दिसण्यासाठी खर्च, मग चांगले उत्पादन मिळविण्यासाठी
सुक्षेत्र का नको? यात टंगळामंगळ व्हायला नको. आळस हाच माणसाचा खरा शत्रू
आहे. आळसाने कोणतेही काम होत नाही. आळस झटकून देऊन काम करण्याची वृत्ती
हवी, तरच प्रगतीच्या वाटा सापडतील.

14..........................................................................कृषि ज्ञानेश्‍वरी

भाजलेले बी

देखें अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरुढती ।
तशी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ।।

पावसाळ्यानंतर डोंगरावर वाढलेले गवत वाळते. या गवताला आग लावली
तर त्या धगीमध्ये अनेक वृक्ष, रोपे नष्ट होतात. गवताचे बीजही करपून निघते. अशा
या वनव्यामुळे अनेक ठिकाणी डोंगर ओसाड होताना पाहायला मिळत आहेत. आगीत
भाजलेले बी अंकुरत नाही. हाच विचार घेऊन शेतजमीनी भाजण्याचाही प्रयोग अनेक
शेतकरी करतात. शेतात तणांचा प्रादुर्भाव अधिक वाढला असेल तर, उन्हाळ्यामध्ये
शेत जमीन भाजून घेतात. नांगरट करून सूर्याच्या धगीत जमीन शेकवली जाते. पिकाचे
उरलेले अवशेष पाला पाचोळा शेतात जाळून जमीन शेकवली जाते. या धगीत तणांचे
बी शेकले जाते. भाजलेले हे बी अंकुरत नाही. कीड-रोगांचेही बीजांडे नष्ट होतात.
साहजिकच तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. मोठ्या प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव झालेल्या
शेतात ही पद्धत वापरली जाते. शेतात आग केल्याने जमिनीतील आवश्‍यक जिवाणूही
नष्ट होतात. यामुळे आता जमिन भाजण्याची किंवा शेकण्याची पद्धत आता वापरली
जात नाही. त्याऐवजी तण कुजविण्याची पद्धत रूढ झाली आहे. जमीन शेकविण्याऐवजी
वाढलेले तण फुलोऱ्यावर येणाआधीच ते जमीनीत गाढण्यात येते. उसामध्ये पाचट
कुजवून पिकांमध्ये सेंद्रिय खत तयार केले जात आहे. जमीनीला आवश्‍यक सेंद्रिय कर्ब
उपलब्ध होत नसल्याने आता हा प्रयोग अनेक शेतकरी करत आहेत. सेंद्रिय कर्बामुळे
जमीनीतील जिवाणूंची कार्यक्षमता वाढते. पिकांच्या वाढीला जोर मिळतो. पीक
जोमात असेल तर त्यावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. निरोगी शरीरात जशी
रोगप्रतिकारक क्षमता अधिक असते तसेच जोमात वाढलेल्या पिकांमध्येही रोगप्रतिकार
शक्ती अधिक असते. तणांचा प्रादुर्भाव असणाऱ्या शेतात भरघोस उत्पन्नाची अपेक्षा
करणे चुकीचे आहे. पण फुलोरा येण्यापूर्वी हेच तण शेतात कुजविले तर सेंद्रिय
घटकांच्या निर्मितीचा पिकाला फायदा होऊ शकेल. ताग, ढेच्या ही हिरवळीची खते
जशी शेतात कुजविली जातात तशी तणही कुजविली जाऊ शकतात. ताग, ढेच्या
लवकर कुजतात. त्यामुळे ते कार्यक्षम घटक जमिनीत निर्माण करू शकतात. तसे तण
कुजण्यास जरी वेळ लागला तरी त्यातूनही कार्यक्षम घटक तयार होऊ शकतात. तण
देई धन हा विचार घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात प्रताप चिपळूणकर शेती करत आहेत.
त्यांचा आदर्श घेऊन राज्यात अनेक शेतकऱ्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे. बदलत्या
शेतीपद्धतीत सेंद्रिय खताचा तुटवडा जाणवत आहे. जनावरांची संख्या घटल्याने याचा
फटका सेंद्रिय खताच्या निर्मितीवर झाला आहे. सेंद्रिय खताचा वापरच शेतामध्ये
केला जात नाही. अशाने जमिनी नापिक होण्याचा धोकाही बळावला आहे. शेतांची
उत्पादकता झपाट्याने घटताना दिसत आहे. जमिन पिकाऊ राहिली तरच शेती टिकेल.
यासाठी ती पिकाऊ ठेवण्यासाठी आवश्‍यक असणारे उपायही योजने गरजेचे आहे.

कृषि ज्ञानेश्‍वरी............................................................................15

विचारी पक्षी

देखे उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबे जैसा ।
सांगे नरु केवीं तैसा । पावे वेगां ।।

पूर्वीच्या काळी प्रत्येक गोष्टीची बारीक निरीक्षणे केली जात होती. पक्ष्यांचे
गुण काय आहेत? तो कसा वागतो? तो कसा बोलतो? तो कसा चालतो? तो कसा
विचार करतो? तो कोठे राहातो? तो कसा राहतो? स्वतःचे स्वतः कसे उपचार करतो?
समुहाने राहतो की एकटा राहातो? त्याचे स्थलांतर? आदी सर्व गोष्टींचा अभ्यास केला
जात होता. अशा या निरीक्षणातूनच पक्षांचे संरक्षण व पिकाचे पक्षांपासून संरक्षण यावर
उपाय निश्‍चित केले होते. जगा व जगू द्या हा विचार जोपासला जात होता. आता
हा विचार मागे पडला आहे. पिकांचे पक्षांपासून संरक्षण करताना गोफन वापरली
जायची. शेतात बुजगावणे उभे केले जायचे. हे उपाय हे निरीक्षणातूनच शोधले गेले
होते. यामध्ये पक्षाला कोठेही इजा होणार नाही याची दक्षता घेतली गेलेली आढळते.
गोफणीने फक्त पक्षी हुसकावून लावले जायचे. पक्षी पिकांकडे येणार नाहीत यासाठी
बुजगावणे उभारले जायचे. काही ठिकाणी गोंगाट केला जायचा. आवाजामुळे पक्षी
पळून जावेत हा त्यामागचा उद्देश होता. ढोल, टिमकी वाजवली जायची. यामध्ये पक्षी
ठार मारण्याचा कोणताही उपाय नव्हता. फळे खातात, पिकातील दाणे खातात म्हणून
थेट त्यांना ठार मारा असा कोणताही उपाय येथे नव्हता. पण सध्याच्या युगात असा
विचार मांडला जात नाही. उपाय योजताना हा विचार केलाच जात नाही. नुकसान
होते ना? मग रोखण्यासाठी त्यांना ठार मारणे ही गरज आहे असाच विचार केला
जातो. पक्षी असो कीटक असो याचा समुळ नायनाटच केला जात आहे. रसायनांच्या
फवारण्यामुळे फक्त कीटकच मरतात. असा दावा केला जातो. पण त्याचे अनेक
दुष्परिणाम होत आहेत याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर
विचारही आता बदलत चालले आहेत. अहिंसेचा विचार मागे पडत आहे. अहिंसेच्या
विचारावर आधारित नियोजनच केले जात नाही. हा विचार कालबाह्य मानला जात
आहे. पण जीवन चक्रच खंडित केले जात असल्याने भावी काळात अनेक समस्या
उत्पन्न होणार आहेत. झटपट जीवनशैलीमध्ये दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. आत्ताची
गरजच विचारात घेतली जाते. पुढील काळात त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेतयाचा विचारच केला जात नाही. पक्षाला फळ दिसले, तर तो लगेचच फळाकडे धाव
घेत नाही. एका फांद्यावरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहातो. सर्व बाजूंनी फळाचे
निरीक्षण करतो. कोणी आहे का नाही याची खात्री करून घेतो. हळूहळू फळाकडे
धाव घेतो. पण माणूस मात्र झटपट फळाची अपेक्षा करतो. पक्षाला विचार आहे, पण
मानवाला हा विचार जोपासता येत नाही. हे दुर्दैव्यच म्हणावे लागेल. प्रयत्न करत
राहिले तर यश मिळते. झटपट यशाची अपेक्षा ठेवू नये.

No comments:

Post a Comment