Saturday, August 6, 2016

अभिषेक

चिमणगाव पंधरा हजार लोकवस्तीचा गाव. पुरातन मंदिरे ही गावाची ओळख. रामाने वनावसाच्या काळात येथे वास्तव्य केले होते. यामुळे या गावाला विशेष महत्त्व. वनवासाच्या काळातच देशात मोठा दुष्काळ पडला होता. सर्वत्र पाण्यासाठी ओरड सुरू होती. पाऊस पडावा दुष्काळ दूर व्हावा अशी सर्वांची धारणा होती. पण देवाला याची दया येत नव्हती. अशावेळी चिमणगावातील जनतेने रामाकडे दुष्काळावर उपाय योजण्याची मागणी केली होती. लोकांचे होणारे हाल पाहून रामाने गावच्या डोंगरावर साधना केली व ब्रह्मास्त्राने येथे लिंगाची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. डोंगरावर मारलेल्या बाणाने येथे कायम स्वरूपी झरा निर्माण झाला. हा झरा दुष्काळातही कायम वाहत असतो. या पाण्यामुळे परिसरात कायम हिरवाई बहरलेली असते. या हिरवाईत चिमण्यांचा चिवचिवाट सतत ऐकायला मिळतो. यावरून येथे वसलेल्या या गावाला चिमणगाव असे नाव पडले, असेही येथील लोक सांगतात. असे हे डोंगरकपारीत वसलेले चिमणगाव भक्तीचे केंद्र झाले आहे. शांत वातावरणामुळे आणि विविध गुहांमुळे साधनेसाठी अनेक भाविक येथे येतात. वड, पिंपळासारखे मोठे वृक्ष, विविध वनौषिधींनी नटलेला हा परिसर पर्यटकांसाठी एक वेगळे आकर्षण आहे. कोण साधनेसाठी येथे येतो तर कोण मंत्रोच्चारासाठी येथे येतो.

दर सोमवारी येथे ॐ नमो शिवायः चा जप दिवस-रात्र होतो. मंत्रोच्चराच्या काळात अनेक भाविक येथील शंकराच्या मुर्तीवर व पिंडीवर दुधाचा अभिषेक घालतात. येथे दूध घातल्याने मन स्वच्छ होते असेही मानले जाते. मनातील सर्व अस्वच्छ विचारनाहीसे होतात. स्वच्छतेसाठीच अभिषेक असे त्याचे महत्त्व आहे. आता दुधा सोबत तांदूळही पिंडीवर टाकला जात आहे. या दूध, तांदळाचा सडाच पडलेला परिसरात
पहायला मिळतो. अभिषेकाच्या दुधाचा पाट शेवटी गटारीला मिळतो. याकडेही कोणाचे लक्ष नाही. यामुळे मंदिर परिसरात एक दुर्गंधी पसरली आहे तरीही याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. भक्तीच्या नावे अशुद्धता येथे होते आहे. असेही कोणाला वाटत नाही. शिव...शिव...करत दुसऱ्याचा स्पर्श झाला तरी घरात जाऊन अंघोळ करणाऱ्या भक्तांनाही अभिषेकाने पसरलेली दुर्गंधी दिसत नाही. मंदिर ऐतिहासिक असल्याने येथे पर्यटकांचा ओघ वाढतोच आहे. व्यापारी मात्र दूध, तांदळाचा व्यापार वाढविण्यावरच भर देत आहेत. पर्यटकांना दूध, तांदळाचे महत्त्व सांगून त्यांच्या गळी हा अभिषेक उतरवत आहेत. व्यापाऱ्यांच्या या फायद्याने ही ऐतिहासिक वास्तू गलिच्छ झाली आहे. याचेही भान कोणाला नाही. प्रशासनही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. भाविकांच्या भक्तीपुढे सारेच हतबल झाले आहेत. या दुर्गंधीने गावात डास पसरले. या डासांतूनच आता डेंगुची साथही गावातआली. साथीच्या रोगाचा प्रसार सतत होऊ लागला. आरोग्याच्या वाढत्या समस्यांमूळे या ठिकाणाचे पावित्र्य धोक्‍यात आले. रोगराईमुळे पाहता पाहता पर्यटकांचा ओघही घटला. व्यापाऱ्यांचा धंदा बुडाला. व्यावसायिकांचे उत्पन्न थांबले. सारा चिमणगावच ओस पडला. गावावर अवकळा आली. हे सर्व एका अभिषेकाने झाले.

या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा बोलावण्यात आली. यामध्ये तरुण, सुशिक्षित - अशिक्षित सर्वच यामध्ये सहभागी झाले. अभिषेकामुळे ही दुर्गंधी पसरते यावर ग्रामसभेत एकमत झाले. पण अभिषेक बंद कोण करणार हा मोठा प्रश्‍न होता. यासाठी अभिषेकावर अभ्यास करून यावर निर्णय घ्यावा असे ग्रामसभेत ठरले. तरुणांनी अभिषेकावर अभ्यास सुरू केला. अभिषेक दुधाचाच का? यावरही आता पुस्तके, ग्रंथ चाळले जाऊ लागले. एकात उत्तर मिळाले. दुधाने मुर्ती स्वच्छ होते. स्वच्छतेसाठी दुधाचा वापर केला जातो. मूर्ती स्वच्छ राहावी यासाठी अभिषेक घालण्यात येतो. पण काळाच्या ओघात ही गोष्ट लोक विसरले आहेत. फक्त स्वच्छ होण्यासाठी आवश्‍यक तेवढे दुध मूर्तीवर न ओतता. प्रमाणा बाहेर याचा वापर होऊ लागला आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणात वापरावी लागते. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाला तर त्याचा दुरुपयोग होतो. येथे हेच तर झाले आहे. हे तरुणांच्या लक्षात आले. अभ्यासातून काढण्यात आलेला निष्कर्ष अखेर ग्रामसभेत मांडण्यात आला. काही धर्मांध व्यक्तींनी हा निष्कर्ष मान्य केला नाही. याला विरोध दर्शिवला पण स्वच्छतेच्या प्रश्‍नी सर्वांनी पाठींबा दर्शिवला. ग्रामसभेत मंदिरातील इतर स्वच्छतेवरही चर्चा झाली. मूर्तीवर तांदूळ टाकले जातात. मंदिरा बाहेर नारळ फोडण्यात येतो. त्यातील पाणीही वाया जाते. या पाण्यानेही परिसरात अस्वच्छता होत आहे. येणारे पर्यटक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात. वेफर्स, कुरकुरेच्या तयार पॅकेटमुळेही प्लास्टिकचा कचरा परिसरात होत आहे. या अशा अस्वच्छतेच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला. देवाचे मंदिर हे पवित्र ठिकाण. अशा परिसरात अस्वच्छता योग्य नाही. कोणताही धार्मिक विधी हा स्वच्छ आचार, विचारासाठी असतो. स्वच्छतेचा विचार, मन शुद्धीचा विचार सांगणारे हे ठिकाण अस्वच्छ असणे योग्य नाही. यासाठी स्वच्छता, शुद्धी
हेच अध्यात्म जोपासण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला. मंदिरात स्वच्छतेसाठी विविध उपाय योजना करणाचे ठरले. यात मुख्य म्हणजे अभिषेकामुळे होणारी अस्वच्छता रोखण्यासाठी अभिषेक बंद करण्यात झाला. मूर्तीच्या स्वच्छतेसाठी आवश्‍यक तेवढेच दूध अभिषेकासाठी वापरून उरलेले दूध संकलित करण्याचा निर्णय झाला. हे संकलित झालेले दूध गरजूंना, वृद्धश्रमांना, अनाथांना देण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले. तरुण मंडळांनी याकामी पुढाकार घेतला. मूर्तीवर टाकण्यात येणारे तांदूळही गोळा केले जाऊ लागले. तेही अनाथ आणि वृद्धाश्रमांना देण्याचा निर्णय झाला. नारळ फोडल्यानंतर त्याचे टाकून देण्यात येणारे पाणीही गोळा करून मंदिरात येणाऱ्या भाविकांना वाटण्याचे ठरले. प्लास्टिकचा वाढता कचरा विचारात घेऊन प्लास्टिक
वापरावर मंदिर परिसरात बंदी घालण्यात आली. या सर्व कामांसाठी गावातील तरुण मंडळे पुढे आली. देवस्थानच्या विेशस्तांनीही याकामी पुढाकार घेतला. श्रावणातील पहिल्या सोमवारी याची अंमलबजावणी करण्याचे ठरले. यासाठी जनतेचे प्रबोधन करणारे फलक जागोजागी लावण्यात आले.
नेहमीप्रमाणे श्रावणातल्या या सोमवारीही दर्शनासाठी गर्दी झाली. येणाऱ्या भाविकांचे प्रबोधन करणे हे मोठे आवाहन तरुण मंडळा समोर होते. कोणी उद्धट उत्तरे देत होते. कोणाला हा विचार पटला नाही. त्यांनी दूध घरी नेले. तर काहींनी धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा केला. पण ग्रामसभेच्या निर्णयामुळे व स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण झालेला असल्याचे कारण सांगून भाविकांत जागृती करण्यात आली. मनात शुद्ध विचार असेल, बोलण्यात मृदुता असेल तर कोणाचेही प्रबोधन सहज करता येते. तरुणांनी सर्वांच्या भावनांचा विचार करत. सर्वांचा मान ठेवत कार्य केले.

नम्रपणे केलेली विनंती शत्रूतही बदल घडवते. तसाच बदल आता या मंदिराच्या आवारात घडला. जणूकाय चमत्कार वाटावा असे ते वातावरण होते. जागोजागी लावण्यात आलेल्या फलकांनी मोठे प्रबोधन केले. माणसांना स्वच्छतेचे महत्त्व यातून सांगण्यात आले. स्वच्छता असेल तरच देवाची वस्ती तेथे असते. देव मंदिरात राहावेतयासाठी मनासह परिसराची स्वच्छता करा. असा संदेश वारंवार भाविकांच्या मनावर बिंबवण्यात आला. अध्यात्मात असणारे स्वच्छतेचे महत्त्व वारंवार सांगण्यात आले.

स्वच्छतेचे हे सोमवार आता नियमित सुरू झाले. गावातील इतर मंदिरातही हाच उपक्रम राबविण्यात येऊ लागला. गावातील सारी मंदिरे स्वच्छ झाली. तसा गावही स्वच्छ झाला. परिसरातील स्वच्छता पाहून येणारे पर्यटकही गावाची वाहवा करू लागले. गावाचा हा आदर्श आता इतर गावांनीही घेतला आहे.

No comments:

Post a Comment