आमदारांना पगारवाढ झाली पण देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची किमान आधारभूत किंमत काही वाढली नाही. उसाचा दर काही वाढला नाही. शेतकरी नेते केवळ आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करतात. स्वतःचे नाव कमावतात. खासदारकी-आमदारकीही मिळवतात. मंत्रिही होतात आणि शेतकऱ्यांना विसरतात अशी काहीशी परिस्थिती सध्या तरी आहे. शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्या उसाला भाव मिळाला. कोणीतरी बोलणारे आहे. म्हणून शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. या विश्वासांचा त्यांनी मान राखायला हवा. हे बोलण्याचा उद्देश याचसाठी कारण पर्वाच आमदारांची पगारवाढ झाली. या आमदारांचे काही शेतकऱ्यांनी अनोखे अभिनंदन केले. असाच एक फ्लेक्स वाचणात आला. त्यावर शुभेच्छुकांची नाव वाचली आणि डोळे उघडले. शुभेच्छुस होते. कपाशीवरील लाल्या रोग अनुदान वंचित शेतकरी, मोसंबी अनुदान वंचित शेतकरी, महागाईने होरपळलेला शेतकरी वर्ग, रंजले गांजलेले सर्व सामान्य शेतकरी. आपणास मिळाले नाही म्हणून काय झाले दुसऱ्याला मिळाले आहे ना. याच भावनेने त्यांनी या आमदारांना शुभेच्छा दिल्या आहेत. अहो आम्हाला मिळाले नाही याचे दुःख नाही पण दुसऱ्याला मिळाले म्हणून आम्हाला जळायचे नाही. त्यांना मिळाले त्यांचा मान राखायला हवा. शेतकऱ्यांच्या या स्वभावाचा विचार करायला हवा. अहो महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली. त्यावेळी त्यांनी मुठीत घेतलेले मीठ टाकले नाही. वाट्टेल तेवढा मार बसला तरी त्याला प्रतिकार केला नाही. उलट वार केला नाही. उ की चुही केले नाही. अशा या गांधी वादाचा शेतकऱ्यांवर प्रभाव आहे. कितीही अत्याचार झाला तरी तो सहन करायचा पण या सहनशक्तीचा अंत राजकर्त्यांनी पाहू नये कारण इंग्रजही देश सोडून गेले. तसे तु्म्हालाही सत्ता सोडावी लागेल प्रसंगी देशही सोडावा लागेल याचे भान त्यांनी ठेवायला हवे. शेतकरी गप्प आहे सोसतो आहे याचा अर्थ असा नव्हे की तो काहीच करणार नाही. हिसेंचा मार्ग कधीही घातक आहे. तो शेतकरी स्वीकारणार नाही. पण तुम्हाला पाय उतार करण्यासाठी योग्य मार्ग मात्र तो निश्चित स्वीकारतो याचा विचार करायला हवा. केवळ आश्वासने देऊन आता भागणार नाही. शेतकऱ्यांचे आपण काहीतरी देणे लागतो याचा विचार करुन राजकर्त्यांनी काम करायला हवे. पगारवाढ घेताना शेतकऱ्यांचा विचार आपण करायला हवा होता. ही पगारवाढ स्वीकारताना शेतकऱ्यास विसरू नका ऐवढेच येथे मला सांगावेसे वाटते.
राजेंद्र घोरपडे
राजेंद्र घोरपडे
No comments:
Post a Comment