अनेक मंदिरात मुर्तींना अभिषेक केले जातात. पण या अभिषेकात वापरले जाणारे दुध वायाच जाण्याचा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. हे दुध वाहत जाऊन सांडपाण्यात मिसळते इतके भानही लोकांना राहात नाही. तरीही भावनेपोटी हे अभिषेक सुरुच असतात. अशा या प्रथांना कोठेतरी आळा बसायला हवा. काही मंदिरात तर हजारो लिटर दुध असेच वाया जाते. ही प्रथा थांबवण्याचा वसा बेळगावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला. गेले दोन वर्षे कपिलेश्वर मंदिरात श्रावणातील सोमवारी होणारे अभिषेक या कार्यकर्त्यांनी रोखले आहेत. हे वाया जाणारे दुध त्यांनी अनाथ व वृद्धा आश्रमांना देऊन एक वेगळा आदर्श उभा केला आहे. आता मला विचाराल तर आम्हा नव्यापिढीला अभिषेक कोणी सुरु केला याची कल्पनाही नाही. तो का केला जातो हे ही माहीत नाही. ते जाणून घेण्याचीही आमची इच्छा नाही. केवळ परंपरा म्हणून अभिषेक करण्याकडेच आमचा कल दिसतो. पूर्वज सांगतात म्हणून श्रद्धेपोटीच आपण अभिषेक करतो. यात त्या मुर्तीची झिज होते याचे भानही राहात नाही. हा अभिषेक दिवसातून एकदाच करावा याचेही भान नसते. दगडीमुर्तीला देव मानायचे मग त्या दगडावर दुध ओतून ओतून त्याचे सोैदर्य नष्ट होते. हे आपल्या लक्षात कसे येत नाही. देवाचे सौदर्य नष्ट होत असेल तर मग ती पुजा कशी आपणास मान्य होते हेच मुळात समजत नाही. तरीही आपण अभिषेक करतच राहातो. अशा अभिषेकाने कित्येक मंदिरात दुर्गंधीही पसरते. याकडे कोणाचेही लक्ष नसते. हीच देवाची भक्ती का? नव्या पिढीला भक्ती म्हणजे काय याचीही माहिती नसल्याने ही परंपरा म्हणून आपण अंधश्रद्धा जोपासतो आहोत. याबाबत आता प्रबोधनाची गरज आहे. संतांनी भक्ती कशी करावी ? श्रद्धा म्हणजे काय ? पुजा कोणाची होते ? पुजेसाठी काय हवे असते ? हे सर्व सांगितले आहे. पण तरीही आपण याचा अभ्यास करत नाही. विचार करत नाही. मग चुका या होणारच. पण त्या चुका आहेत हे ही आपण मान्य करायला तयार नाही. विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. पण तरीही जनता मात्र याबाबत अज्ञानी कशी ? भोळीभाबडी जनता अशा अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडते. विज्ञान प्रगत झाले पण लोकांच्या भाबडेपणाचा फायदा उठवणारे काही कमी राहीले नाहीत. त्यांनी या प्रगत तंत्राने लोकांची फसवणूक केली जात आहे. फसवणूकही आता हायटेक झाली आहे. आपण फसत आहोत याचेही भान आता जनतेला राहीले नाही. पण काही जागरुक माणसे सामाजिक भान ठेऊन कार्य करत आहेत. समाजाला दिशा देण्यासाठी अशा व्यक्तींची गरज आहे. कपिलेश्वर हे बेळगाव शहरातील प्रसिद्ध मंदिर. या मंदिरात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी देवाला अभिषेक करण्याची प्रथा आहे. हजारो लोक दुधाच्या पिशव्या घेऊन या मंदिरात अभिषेक करत होते. पण हे सर्व दुध गटारीत मिसळले जायचे. दुधाची ही नासाडी रोखण्याचा संकल्प नांदुर गल्लीतील मंडळांनी घेतला. देवस्थांनचे पुजारी व विश्वस्थांना विश्वासात घेऊन त्यांनी दुधाची नासाडी थांबवण्यासाठी पुढाकार घेतला. दैनिक सकाळनेही या उपक्रमाचे स्वागत करत जनजागृतीसाठी मंडळास सहकार्य केले. दुधाचा अभिषेक करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना विश्वासात घेऊन येणारे दुध संकलित करण्याचा उपक्रम हाती घेतला. गेली दोन वर्षे हे कार्य सुरु आहे. शेकडो लिटर वाया जाणारे दुध संकलीत करून अनाथ व वृद्धाश्रमात ते वाटण्यात येत आहे. खरी भक्ती कोणती? खरा धर्म कोणता ? खरे पुण्य कशात आहे ? हे आता जनतेनेच ठरवायला हवे आणि कृती करायला हवी. भक्तीचा खरा अर्थ समजून कृती करायला हवी. बेळगावचा हा उपक्रम देशातील अनेक मंदिरात राबविता येणे शक्य आहे. याबाबत जागृतीही करता येणे शक्य आहे. अभिषेकाचे पुण्य कशाने मिळेल हे जनतेने समजून घेऊन आता कृती करायला हवी. यासाठी पुढाकार घ्यायला हवा. देवस्थानच्या परिसरात असे अनेक उपक्रम राबविण्याची आता गरज आहे. अनेक मंदिरात देवळात नारळ फोडले जातात. या नारळातील गोड पाणी शिंपडण्यात येते. पाण्याचे पवित्र विचारात घेऊन कार्य करायला हवे. हे पाणी कोणाच्या तरी पोटात गेल्यास त्याला उर्जा मिळेल. हा विचार का केला जात नाही. एखाद्या आजारी व्यक्तीला हे पाणी दिले तर त्याचा आधार मिळेल. हा विचार का केला जात नाही. यासाठी आवश्यक ती यंत्रणा देवस्थानाने उभारायला हवी. अशा विचार का केला जात नाही. दैनिक सकाळच्या तनिष्का गटाने जोतिबा डोंगरावर हा उपक्रम राबविला. त्याला प्रतिसादही मिळाला. नारळाचे वाया जाणारे पाणी साठवून ते शाळा व रुग्णांना ताबडतोब दिले. या उपक्रमाचे कौतुक झाले. अशा या उपक्रमातून देवस्थानात होणारी स्वच्छताही राखली जाते याचा विचार व्हायला हवा. पुण्य कर्म कोणते हे आता जनतेनेच ओळखायला हवे. तशी कृती करायला हवी. खरी भक्ती कोणती ? खरे अध्यात्म कशात आहे ? देव कोठे आहे ? याचा अभ्यास करुन कृती करायला हवे. हे जाणून घेऊन आपला आचरण करायला हवे. ही जागृती आली तर श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय हे सांगण्याची गरज भासणार नाही. - राजेंद्र घोरपडे |
Monday, August 29, 2016
अभिषेकाचे पुण्य....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment