Tuesday, August 23, 2016

कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे...

कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे... 
अभ्यासकांची भावना; अष्टावधानी व्यक्तिमत्त्वाच्या विविध रूपांची छाप

- राजेंद्र घोरपडे


कृष्ण विविध रूपात पाहायला मिळतो. प्रेममय, भक्तिमय, खोडकर असे त्याचे व्यक्तिमत्त्व जनसामान्यांना आपलेसे वाटते. वात्सल्य, शृंगार, भक्ती, करुणा अशा रसांचा आविष्कार कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वात आहे. प्रेम म्हणजे भक्ती या जाणिवेतून त्याच्यावर काव्य रचना झाल्या. संतांनी विठ्ठल रूपात कृष्णाचे वर्णन केले आहे. कारण पंढरीच्या विठ्ठलात शिव आणि विष्णू अशा दोन्ही तत्त्वांची एकरूपता संतांनी पाहिली आहे. असा हा कृष्ण संत साहित्य अभ्यासकांना कसा वाटतो याविषयी... 


श्रीकृष्ण हे अष्टावधान व्यक्तिमत्त्व आहे. राजनैतिक, युद्धकुशल, चतुरंग योद्धा असा तो आहे. प्रसंगी आपल्या मूल्यांसाठी, स्नेहासाठी तो सारथ्यही पत्करतो. बालवयात तो निरागस खोडकर वाटतो. तारुण्यात तो प्रेमभक्तीत रंगलेला असा वाटतो. त्यानंतर चतुरस्र नेतृत्व करणारे असे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. संतांनी कृष्णाचे विविध पैलू मांडले आहेत. संत नामदेवांचा कृष्ण निरागस, निर्मळ असा आहे. संत एकनाथांनी रंगवलेला कृष्ण बालक्रीडेत रममाण झालेला आहे. तो रोमॅन्टिकही वाटतो. संत तुकारामांनी कृष्णाच्या बालक्रीडेवर अभंग रचले. त्यांच्या अभंगातून तो भक्तीचे दैवत म्हणून पाहायला मिळतो. पंडित कवींनी लोकांचे रंजन करणारा, चांगल्या मूल्यांची जपणूक करणारा कृष्ण रंगवला आहे. शाहिरांनी शृंगारप्रधान असे त्याचे चित्र उभे केले आहे. एकूणच कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे.
- ल. रा. नसिराबादकर, 
संत साहित्याचे अभ्यासक 

भगवद्‌गीतेतील कृष्ण कर्मयोगी, ज्ञानयोगी, भक्तियोगी असा तीन प्रकारचा आहे. अर्जुनाला शिकवण्याचे केवळ निमित्त आहे. त्यामुळे आजच्या जीवनातही त्यातील तत्त्वज्ञान लागू पडते. या तीन गोष्टींनी जीवन आनंदी होते. कर्माच्या मोबदल्यात काय मिळाले याचाच विचार होतो. ते आवश्‍यक असले तरी सध्याच्या पिढीला कर्म करण्याआधीच फळ हवे आहे. श्रद्धेने कर्म केले तर यश जरूर मिळते. परमार्थ करताना व्यवहार ज्ञानही आवश्‍यक आहे. याची सांगड घातली तरच प्रपंच सफल होतो.
- यशवंत पाठक, 
संत ज्ञानदेव अध्यासन प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

भगवद्‌गीता म्हणजे कृष्णाने अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेला ग्रंथ आहे. यावर अनेक मतमतांतरे आहेत. भगवद्‌गीता कृष्णाने सांगितलीच नाही, असे म्हणणारेही लोक आहेत. पण हिंदू धर्मात तीन ग्रंथ पवित्र मानले जातात. त्यात भगवद्‌गीतेचा समावेश आहे. कृष्णाचे जगणे हे भगवद्‌गीतेसारखे आहे. यासाठी भगवद्‌गीता समजल्याशिवाय कृष्ण चरित्र समजत नाही व कृष्ण चरित्र समजल्याशिवाय भगवद्‌गीताही समजत नाही.
- डॉ. सदानंद मोरे, 
संत साहित्याचे गाढे अभ्यासक 

No comments:

Post a Comment