Wednesday, March 27, 2013

मधमाशीपालनातील "मधुकर'

कोल्हापूर जिल्ह्यात उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या जंगली भागात नाईक यांचा पूरक व्यवसाय
पश्‍चिम घाटमाथ्यावरील जैवविविधता, तसेच तेथील कुटीर उद्योगांचीही जोपासना गरजेची आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पाटगाव (ता. भुदरगड) येथील मधुकर नाईक अनेक वर्षांपासून मधमाशीपालनाचा व्यवसाय करीत आहेत. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी शेतीला हा पूरक व्यवसाय त्यांना किफायतशीर ठरला आहे.
 
राजेंद्र घोरपडे
पाटगाव येथील मधुकर संभाजी नाईक यांची तशी चार एकर शेती असली तरी त्यातील बरीच पडीक. भात व नाचणी ही त्यांची मुख्य पिके. त्यातून घरी खाण्यापुरते उत्पादन मिळते. मात्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे अर्थार्जन अजून होण्याची गरज होती. पाटगाव परिसरात जंगल असल्याने तेथे सातेरी जातीच्या मधमाश्‍या आढळतात. त्यांच्यापासून मधसंकलनाचा व्यवसाय करण्याचे नाईक यांनी ठरवले. सुरवातीला मधसंकलनासाठी रोजंदारी केली. सन 1970 मध्ये महिन्याला 30 रुपये मजुरी मिळायची. पुढे ही कला अवगत झाल्यानंतर त्यांनी स्वतःच हा व्यवसाय सुरू केला. सध्या यावरच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो.

अनेक चढ-उतार येऊनही त्यांनी हा व्यवसाय सोडला नाही. शहराचा रस्ता पकडला नाही. आहे त्या परिस्थितीला तोंड देत आपली वाटचाल सुरूच ठेवली. या व्यवसायात आता मुलगा विनायक याचीही साथ मिळत आहे.

दहा वर्षे रोजंदारी केल्यानंतर 1980 पासून मधुकर यांनी व्यवसायात स्वयंपूर्णता मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या काळात वर्षाला 150 ते 200 किलो इतका मध ते गोळा करत. पाटगावात तेव्हा सहकारी तत्त्वावर मध उत्पादक संस्था होती. किलोला 30 रुपये दर सोसायटीकडून मिळत होता. सन 1994 पर्यंत या व्यवसायात चांगले उत्पन्न मिळत होते. 1994 मध्ये 28 हजार किलो इतके उच्चांकी मधसंकलन सोसायटीमध्ये झाले होते.

थायी सॅक ब्रुड रोगाचा प्रादुर्भाव
सन 1994 नंतर थायी सॅक ब्रुड रोगाच्या प्रादुर्भावामुळे या व्यवसायावर जवळपास गंडांतरच आले. अंडीकोषातच मधमाश्‍या मरायच्या. मरतूक मोठी असल्याने मधमाश्‍यांच्या वसाहतीच नष्ट झाल्या. वर्षाला केवळ 20 ते 25 किलो इतकेच मधसंकलन व्हायचे. यामुळे अनेकांनी हा व्यवसाय सोडला. पाटगाव येथील मध उत्पादक सहकारी संस्थाही मोडकळीस आली. पण तरीही मधुकर यांनी हा व्यवसाय सोडला नाही. त्यांनी जिद्दीने तो पुढे सुरू ठेवला.

मध संकलन कसे चालते?
 सातेरी जातीच्या मधमाश्‍यांपासून मध काढला जातो.
-मुख्यतः फेब्रुवारी ते मे या कालावधीत संकलन चालते.
-मधमाश्‍यांच्या वसाहती असलेल्या पेट्या जंगलात योग्य ठिकाणी ठेवाव्या लागतात.
-फेब्रुवारीनंतर अनेक जंगली वनस्पती फुलोऱ्यावर येतात.
-कोणत्या कालावधीत कोणत्या वनस्पती फुलोऱ्यावर येतात, कोणत्या भागात या वनस्पतींची संख्या अधिक आहे. याची पाहणी करून तसे पेट्या ठेवण्याचे नियोजन मधुकर करतात.
त्यांच्याकडे मधसंकलन करणाऱ्या सुमारे 30 ते 35 पेट्या आहेत.
- वसाहतींची संख्या, हवामान व फुलोरा या बाबींवर आधारित मधाचे उत्पादन अवलंबून असते.
- वर्षाला सुमारे 250 ते 300 किलो इतका मध संकलित होतो.

-उत्पन्न
दरवर्षी सुमारे 15 पेट्या तरी मधुकर यांना नव्याने कराव्या लागतात. प्रति पेटी एक हजार रुपये खर्च येतो. पेटी आणि मध संकलनासाठी मजुरीचा असा सुमारे 20 हजार रुपये खर्च येतो. सध्या 250 रुपये प्रति किलो दराने मधाची विक्री होते. परिसरातील, कोल्हापूर तसेच मुंबई भागातील ग्राहक घरी येऊन मध घेऊन जातात.
मधाची क्वालिटी चांगली असल्याने दरवर्षीचे ग्राहक तसेच नव्यानेही ग्राहक जोडले जातात.
मध यांत्रिक पद्धतीने काढला जातो, तसेच तो फिल्टर केला जातो. त्याची गुणवत्ता चांगली ठेवली जाते.
वसाहतींचीही विक्री केली जाते. गेल्या वर्षी मधुकर यांनी 16 वसाहतींची विक्री केली. प्रति वसाहत 900 रुपये दर मिळाला. या व्यवसायातून वर्षाला सुमारे 40 ते 45 हजार रुपयांचे उत्पन्न खर्च वजा जाता मिळते. पाटगावसारख्या जंगली भागात उत्पन्नाचे प्रभावी स्रोतच नसल्याने तसेच परिसरातील कोणताही व्यवसाय इतका रोजगार देत नसल्याने मधुकर यांना हा व्यवसाय सर्वाधिक फायदेशीर वाटतो.

वसाहतींचे नियोजन
 डिसेंबरमध्येच मधमाश्‍यांच्या वसाहती पेट्यात भरण्याचे काम चालते. जुन्या पेटीतील राणीमाशी योग्य प्रकारे काम करत नसेल तर ती बदलली जाते. मधाचे संकलन योग्य प्रकारे होण्यासाठी पोळ्यांचा रंग पांढरा आहे का? वसाहतीतील मधमाश्‍यांचे काम नियमित चालू आहे का? खाद्याची कमतरता आहे का? आदींची पाहणी करणे गरजेचे असते. पेटीत दोन कप्पे असतात. या दोन्ही कप्प्यात माश्‍या पोळी तयार करतात. खालचा कप्प्यातील मध हा माश्‍यांसाठी खाद्य म्हणून ठेवण्यात येतो तर वरच्या कप्प्यातील मध काढून घेण्यात येतो.

मधासाठी आवश्‍यक वनस्पती
जांभूळ
रामरक्षा
रान पेरव


शिकेकाई

मोरआवळा
 मधाच्या संकलनासाठी जंगलामध्ये शिकेकाई, रामरक्षा, जांभूळ, मोरआवळा, हुरा, रान पेरव, पांगिरा, सावर, हेळा, नाना, सोनवेल, गेळा, कुंभा आदी वनस्पतींची संख्या अधिक असणे आवश्‍यक आहे. अशा भागातच मध संकलन अधिक होते. जंगलातील या वनस्पतींचे संवर्धन यासाठी गरजेचे आहे असे मधुकर यांना वाटते. मधमाशीपालनाच्या या व्यवसायामुळेच या वनस्पतींचे संवर्धन पाटगाव परिसरात केले जात आहे.

कर्ज काढून पेट्यांची खरेदी
दोन वर्षांपूर्वी मधुकर यांनी खादी ग्रामोद्योगच्या योजनेतून तीन वर्षांसाठी कर्ज काढून 25 पेट्यांची खरेदी केली. एका पेटीची किंमत 1500 रुपये असून, यासाठी खादी ग्रामोद्योगचे 25 टक्के अनुदान मिळाले. वर्षाला दहा हजार रुपयांचा हप्ता व चार हजार रुपये व्याजापोटी भरावे लागतात. कर्ज काढून व्यवसाय करण्याचे धाडस मधुकर यांनी केले खरे, पण मध संकलनाची चिंता नेहमीच सतावते. जर योग्य संकलन झाले नाही, रोगाचा प्रादुर्भाव झाला तर हप्ता कसा फेडणार याची चिंता असते. महाबळेश्‍वर येथील मध संचालनालय, खादी ग्रामोद्योग व जिल्हा कृषी विभागाने घाटमाथ्यावरील मध उत्पादकांसाठी वेगळी योजना तयार करण्याची गरज त्यांना वाटते.

- मधुकर संभाजी नाईक, 9405265639
पाटगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत गेल्या वर्षी 40 शेतकऱ्यांना खादी ग्रामोद्योगतर्फे मधमाशीपालनाचे प्रशिक्षण व अनुदानावर 120 पेट्यांचे वाटप केले. हे लाभार्थी पाटगाव, तांब्याची वाडी, मानी, मठगाव परिसरातील आहेत. यंदाही 40 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- महावीर लाटकर, तालुका कृषी अधिकारी, भुदरगड

No comments:

Post a Comment