Thursday, March 21, 2013

मनुष्यजात

देखें मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ ।
जाहलें असे केवळ । माझां ठायीं ।।

भारतात अनेक जाती, पंथ, परंपरा आहेत. दुसऱ्या देशातही तशाच जाती, परंपरा आहेत. प्रत्येकाला त्याच्या जातीचा, धर्माचा, देशाचा स्वाभीमान असतो. आपण बाहेर गेल्यानंतर आपण मराठी आहे याचा टेंभा मिरवतो. कोणी कानडी असेल तर तो कानडी असल्याचा तोरा मिरवतो. हे स्वाभाविक आहे. त्यात गैर असे काहीच नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आपण श्रेष्ठ आहोत हे दाखविण्यातच आपले महत्त्व असते. यासाठी स्वाभीमान असायला हवा. आज प्रत्येक वृत्तपत्र त्यांचा खप, प्रत्येक चॅनेल त्यांचा टीआरपी कसा जास्त आहे. आपण इतरांपेक्षा कसे चांगले आहोत हेच दाखविण्याचा प्रयत्न करते. आज त्याची गरज झाली आहे. महाराष्ट्राबाहेरही मराठी कशी श्रेष्ठ आहे हे दाखविण्याचे प्रयत्न होतात. मुळात आपणास दूर गेल्यानंतरच आपल्या संस्कृतीची ओढ लागते. त्याचे श्रेष्ठत्व समजते. जाती व्यवस्था जगात सर्वत्र आहे. याला विशेष महत्त्व आहे. कारण यामुळे मनुष्य संघटित राहातो. त्याची सुरक्षितता वाढते. त्याचे कुटुंब, नातेसंबंध यांच्यात ऐक्‍य असते. यामुळे गरजेच्यावेळी त्याला मदतीला अनेकजण धावून येतात. यासाठी या जातींचे महत्त्व आहे. एकलकोंडेपणा राहात नाही. आज शहरात एकलकोंडेपणा वाढला आहे. कोणाकडे जाणे नाही, येणे नाही. अशाने माणसाची मानसिकता ढळत चालली आहे. मुळात हीच स्थिती खरी अध्यात्माची ओढ वाढविणारी आहे. पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने तो भरकटत आहे. अनेकजण त्याच्या या एकाकीपणाचा फायदा घेत आहेत. असे होऊ नये यासाठी जागरूकता महत्त्वाची आहे. प्रत्येक मनुष्यजातीचा भगवंताकडे ओढा असतो. हा मुळात त्याचा स्वभावता गुण आहे. पण गोंधळलेल्या मानसिक स्थितीमुळे तो भरकटत आहे. भगवंताचे भजन, चिंतन, मनन हा स्वभावधर्म आहे. प्रत्येक जातीधर्मात हेच सांगितले आहे. म्हणून मनुष्यजातीचा हा धर्म पाळायला हवा. भगवंताच्या चरणी लीन व्हायला हवे. गर्वाने, तमोगुणाने मनुष्य भरकटला जात आहे. त्याच्या हा अहंकारच त्याला संपवत आहे. हा अहंकार जागृत करण्याचा प्रयत्न काही मंडळीकडून होत आहे. यामुळे तर जातीय तणाव वाढत आहे. अहंकाराने तो भ्रमिष्ठ होत आहे. त्याचाच क्रोध वाढत आहे. क्रोधावर नियंत्रण कसे ठेवायचे याचे उपाय धर्मात सांगितले आहेत. धर्म हा शांतीचा मार्ग सांगतो. त्यामुळे तेथे क्रोधाचा मार्ग कधीच असू शकत नाही. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. पण देव संरक्षणासाठी क्रोधीत जरूर होतो. स्वातंत्र्य कोणी हिरावून घेत असेल तर तो अधर्म आहे. तो अधर्म नष्ट करण्यासाठी त्याला क्रोध हा आवश्‍यक आहे. हा तर मनुष्यजातीचा स्वभाव आहे.

No comments:

Post a Comment