Saturday, March 16, 2013

गुरू शिष्य


जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गांठी ।
तेथ स्थिर राहोनि नुठी । कवणें काळीं ।।

नाथ परंपरेमध्ये ज्ञान हे गुरूकडून शिष्यास दिले जाते. यामुळे गुरूशिष्याच्या या नात्यास महत्त्व आहे. सद्‌गुरू हे आत्मज्ञानी असतात. त्याचा उपदेश हा उपयुक्त असतो. त्यांच्या उपदेशामुळेच गुरू-शिष्यांचे नाते दृढ होते. एक उद्योगपती सद्‌गुरूंच्यांकडे उपदेशासाठी आला. त्याची आई आजारी होती. तिला झटका आला होता. ती कोमात होती. तिला शुद्धीवर आणण्याचे सर्वप्रयत्न सुरू होते. पण ती शुद्धीवर येत नव्हती. नेमके कारण डॉक्‍टरांनाही समजत नव्हते. या समस्येने त्रस्त उद्योगपती अखेर सद्‌गुरूंच्या चरणी आला. त्याने सद्‌गुरूंना याबाबत विचारले. सद्‌गुरूंनी त्याला आईचे दात मोजण्यास सांगितले. ते सर्व व्यवस्थित आहेत का? याबद्दल पाहाण्यास सांगितले. सद्‌गुरू आत्मज्ञानी होते. त्यांनी नेमके कारण ओळखले होते. उद्योगपती लगेच दवाखान्यात गेला आणि त्याने डॉक्‍टरांना हा प्रकार सांगितला. डॉक्‍टर हसले आणि त्यांनी या उद्योगपतींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. उद्योगपतीने मग स्वतःच आईचे सर्व दात आहेत का पाहिले. तर खरच त्यातील दोन दात नव्हते. त्याने लगेच त्या डॉक्‍टरांना याबाबत कल्पना दिली. त्यानुसार डॉक्‍टरांनी आईची तपासणी केली. त्यात तिच्या पोटात दोन दात असल्याचे आढळले. ते काढण्यात आले आणि चमत्कार काय तर काही वेळातच त्या उद्योगपतीची आई शुद्धीवर आली. खरेतर त्या दातांच्या विष्यामुळेच ती शुद्धीवर येत नव्हती. सद्‌गुरूंना आत्मज्ञानाने दातामुळे समस्या असल्याचे समजले. डॉक्‍टरांना मात्र ते लक्षात आले नाही. आता येथे डॉक्‍टर श्रेष्ठ की सद्‌गुरू श्रेष्ठ. दोघेही ज्ञानी आहेत, पण आत्मज्ञानी संत सर्वज्ञानी असतात. त्यांना ती दृष्टी असते. यासाठी ते श्रेष्ठ असतात. यासाठीच आत्मज्ञानी संतांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करू नये. विश्‍वास नसला तर कमीत कमी काय सांगितले आहे ते खरे आहे की खोटे आहे हे तपासायला तरी काहीच हरकत नाही. यामुळे आपला काही तोटा तर होत नाही. सद्‌गुरूचा हा उपदेश उद्योगपतींनी ऐकला. त्याची पडताळणी केली. त्यांनी स्वतः तपासणी केली म्हणूनच त्यांची आई शुद्धीवर आली. विज्ञानाने प्रगती जरूर केली आहे. पण ते ज्ञान योग्य प्रकारे वापरायला हवे. ते वापरण्याचे कौशल्य हवे. ते कौशल्य नसेल, तर सर्व व्यर्थ आहे. काही गोष्टी विज्ञानानेही समजत नाहीत. सुटत नाहीत. त्या आत्मज्ञानाने समजतात. त्या गोष्टी सोडविण्यासाठी यावर विश्‍वास ठेवायला हवा. 

1 comment:

  1. या हकिकतीचा पूर्ण तपशील मिळू शकेल का?

    ReplyDelete