Thursday, April 18, 2013

ऊस पट्ट्यात फुलला "फुलशेतीचा बुके'

बुकेसाठीच्या फुले आणि फिलर्सच्या विक्री व्यवस्थापनातून राजकुमार भोसले यांनी मिळवले यश नरंदे (जि. कोल्हापूर) येथील राजकुमार भोसले हे गेल्या सहा वर्षांपासून बुकेसाठी लागणाऱ्या लांब दांड्याची फुले व फिलर्सचे उत्पादन करतात. योग्य नियोजन आणि विक्री व्यवस्थापनातून चांगला फायदा कमावत वडिलोपार्जित चार एकर शेतीची 12 एकरापर्यंत वाढ केली आहे. शिक्षण कमी असले तरी अंगभूत हुशारीने राजकुमार यांचा "फूल शेतीचा हा बुके' आजूबाजूच्या उसाच्या पट्ट्यामध्ये ठळकपणे नजरेत भरत आहे. राजेंद्र घोरपडे 

नरंदे (ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) येथील राजकुमार भोसले यांची वडिलोपार्जित चार एकर शेती होती. राजकुमार यांनी शालेय शिक्षण आठवीपर्यंत झाल्यानंतर घरच्या शेतात लक्ष घातले. गावातील अन्य शेतकऱ्यांप्रमाणे ऊस आणि भाजीपाला पिकांची लागवड केली होती. मात्र माळरान जमिनीतून ऊस व भाजीपाल्याचे समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी 1996 ला दोन एकरामध्ये गुलाबाची लागवड केली. त्यातून चांगल्या प्रकारे उत्पादन व उत्पन्न मिळाल्याने राजकुमार यांचा उत्साह वाढला.
गुलाबाच्या विक्रीसाठी बाजारात सातत्याने जाणाऱ्या राजकुमार यांनी फुलांसोबतच बुके सजावटीसाठी ग्लॅडिओलस, स्प्रिंगेरी, कामिनी, गोल्डन रॉड, ब्लुडीजी, स्टारडीजी यांसारख्या फिलर्सचीही गरज लागत असल्याचे लक्षात आले. सुरवातीला त्यांनी एक एकर क्षेत्रावर ग्लॅडिओलसची लागवड केली. त्यातून त्यांना चांगले उत्पादन मिळाल्याने बुके सजावटीसाठीच्या फिलर्सची लागवड करण्याचा निर्णय घेतला. फिलर्समध्ये त्यांनी गोल्डन रॉड, स्प्रिंगेरी, कामिनी आदींची लागवड केली.

उत्पन्नाची शेतीतच गुंतवणूक
फुलांसोबतच फिलर्स असल्याने त्यांच्याकडे मागणी वाढत होती. शेतीतून आलेला पैसा हा शेतीच्या विस्तारातच गुंतवत चार एकरावरून शेती 12 एकरापर्यंत वाढविली आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा सुधारित तंत्रज्ञानातून अधिक नफा मिळू शकतो, हे पाहून त्यांनी हरितगृहाची उभारणीही केली आहे. आज त्यांच्याकडे सहा एकर क्षेत्रावर हरितगृह आहे. उर्वरित सहा एकर क्षेत्रामध्ये बुकेसाठी लागणाऱ्या फिलर्सची लागवड केली आहे. त्यामध्ये त्यांच्या सध्या एक एकर स्प्रिंगेरी, 20 गुंठ्यांत कामिनी, एक एकरामध्ये गोल्डन रॉडची लागवड केलेली आहे. तसेच अन्य फुलांमध्ये दरवर्षी डबल निशिगंध 30 गुंठ्यांवर, सिंगल निशिगंध एक एकरावर व ग्लॅडिओलसची 30 गुंठ्यावर लागवड ते करतात. 

घरच्यांचेही सहकार्य हरितगृह शेतीचे तंत्र सुरवातीला त्यांना माहीत नव्हते. त्या काळात आष्टा गावातील तानाजी चव्हाण या 1970 पासून फुलशेतीचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचे मार्गदर्शन मिळाल्याचे राजकुमार सांगतात.
राजकुमार यांचे बंधू प्रकाश आणि नंदकुमार भोसले यांचेही शेतीमधील मार्गदर्शन मिळते. राजकुमार यांच्या व्यवसाय वाढीमध्ये त्यांची पत्नी अनिता यांचाही मोठा वाटा आहे. त्या शेतीतील सर्व कामगारांचे व्यवस्थापन पाहतात. मालाच्या काढणीपासून ते पॅकेजिंगपर्यंतची सर्व कामे त्या कामगारांकडून करून घेतात. प्रसंगी कामगारांबरोबर स्वतः या कामामध्ये सहभागी असतात.

स्प्रिंगेरी लागवड सहा वर्षांपूर्वी राजकुमार यांनी एक एकर क्षेत्रावर स्प्रिंगेरीची लागवड केली. लागवडीपूर्वी त्यांनी 25 ट्रॉल्या शेणखत शेतामध्ये मिसळले. लावण पाच फूट रुंदीच्या गादीवाफ्यावर दीड फूट x एक फूट अंतरावर केली. एकरी साडेचार हजार रोपे लागली. पाणी व खते ठिबक सिंचनाद्वारे दिली जातात. खुरपणी व्यतिरिक्त यामध्ये फारशी आंतरमशागत करावी लागत नाही.

खत व्यवस्थापन दर आठवड्याला ठिबकमधून खते दिली जातात. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 19-19-19 आणि 12- 61- 0 हे विद्राव्य खत, दुसऱ्या आठवड्यात 16- 08-24 आणि 0- 52- 34 तिसऱ्या आठवड्यात दिले जाते. या व्यतिरिक्त तीन आठवड्यांतून एक वेळेस कॅल्शिअम नायट्रेट दिले जाते. पाणी दोन तास दररोज ड्रीपने दिले जाते.

स्प्रिंगेरीतून तीन लाख उत्पन्न लागवडीनंतर स्प्रिंगेरी पिकातून जवळपास दहा वर्षांपर्यंत उत्पन्न देते. आता सहा वर्षे झाली आहेत. दररोज तीन हजार काड्यांची तोड होते. 50 काड्यांचा बंडल करून विक्रीस पाठविला जातो. मागणीनुसार दररोज 50 ते 60 बंडल निघतात. एक बंडलला बाजारभावाप्रमाणे 25 ते 50 रुपयांपर्यंत दर मिळतो. लागवडीसाठी साडेचार हजार रोपे आठ रुपयांप्रमाणे विकत घेण्यात आली. त्यासाठी 36 हजार रुपये लागले होते. त्याचा प्रतिवर्ष खतासाठी 30 हजार, वीज बिल व अन्य खर्च साधारणपणे सहा हजार रुपये खर्च होतात. वर्षाला अंदाजे पाच ते सहा लाख काड्यांचे उत्पादन मिळते. वर्षाला स्प्रिंगेरी पीक व्यवस्थापनासाठी अंदाजे एक लाख रुपये खर्च येतो.

कामिनी लागवड चार वर्षांपूर्वी स्प्रिंगेरीमध्येच 20 गुंठे क्षेत्रामध्ये आंतरपीक म्हणून कामिनीची लागवड केली आहे. पाच फुटांचे गादी वाफे करून चार x अडीच फूट अंतरावर लागवड केली आहे. त्यासाठी 2300 रोपे यासाठी लागली. प्रति रोप 12 रुपये किमतीने रोपे आणली होती. दररोज 10 काड्यांचे एक बंडल असे मागणीनुसार अंदाजे 50 ते 100 बंडलची तोड केली जाते. बाजारभावाप्रमाणे एका बंडलाला 10 ते 15 रुपये दर मिळतो.

गोल्डन रॉड लागवड 

एक एकर क्षेत्रामध्ये गोल्डन रॉड लावला आहे. तीन फुटांच्या सरीवर एक फूट अंतरावर मुळ्यांची लावण राजकुमार यांनी केली आहे. एकदा केलेली लागवड दोन वर्षे चालू शकते. एक एकरी चार हजार रुपये खर्च आला. महिन्यातून एकदा एकरी डीएपी 100 किलो आणि युरिया 25 किलोचा असा खताचा डोस दिला जातो. खतासाठी वर्षाला 25 हजार रुपये, काढणीसाठी 20 हजार रुपये, असा एकत्रित अंदाजे 60 हजार रुपये खर्च आहे. मागणीनुसार दररोज 100 ते 150 बंडल गोल्डन रॉडची काढणी केली जाते. एका बंडलामध्ये 15 ते 20 काड्या असतात. एका बंडलाला साधारणपणे 10 ते 20 रुपये इतका दर मिळतो.

डबल निशिगंध लागवड दरवर्षी 30 गुंठ्यांवर डबल निशिगंधाची लागवड राजकुमार करतात. जूनमध्ये लावण केल्यानंतर साधारणपणे ऑगस्ट ते मार्च असे सात ते आठ महिने उत्पादन मिळते. 30 गुंठ्यांमध्ये 14 हजार कंद साधारणपणे लागतात. त्यासाठी 12 हजार रुपये लागतात. अडीच फुटांच्या गादीवाफ्यावर दीड-दीड फुटाच्या अंतरावर कंद लावण्यात येतात. महिन्याला एकरी डीएपी 70-80 किलो व युरिया 10 किलोचा खताचा डोस दिला जातो. अंदाजे 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. एक दिवसाआड 600 काडी निघते. त्याला प्रति दांडा तीन ते सात रुपयांपर्यंत दर मिळतो.

विक्रीची व्यवस्थापन 1) बुके व्यावसायिकांच्या दारात -
नरंदे येथे फार्म हाऊसवर पॅकिंग केले जाते. सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, बेळगाव, कऱ्हाड, इस्लामपूर, कोकणात सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी येथील बुके तयार करणाऱ्या व्यावसायिकांशी थेट मालाची विक्री केली जाते. हे व्यावसायिक थेट संपर्क साधून मालाची आगाऊ ऑर्डर देतात. मालाचा दर मात्र बाजारपेठेतील दर आणि असलेल्या मागणीनुसार ठरविला जातो. मालाच्या वाहतुकीसाठी स्वतःची तीन पिकअप वाहने आहेत. वाहतुकीसाठी अंदाजे वर्षाला पन्नास हजार तरी खर्च होतो.

2) होलसेल विक्री गाळा -
- कोल्हापूर शहरामध्ये होलसेल विक्रीसाठी दुकानही घेतले आहे. या दुकानातून जास्तीत जास्त माल हा स्थानिक बाजारपेठेतच विकला जातो. स्थानिक बाजारपेठेत मालाला मागणी कमी असल्यास मुंबई, हैदराबाद, विजयवाडा, बंगळूर या ठिकाणच्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून मालाची विक्री केली जाते. तिकडे हा माल रेल्वेतून पाठविण्यात येतो.
3) गणपती, दसरा, दीपावली अशा सणांच्या काळात व्हॅलेंटाइन डे या कालावधीत फुलांना अधिक मागणी असते. लग्नाचे मुहूर्त असलेल्या महिन्यामध्येही फुलांची मागणी अधिक असते. त्याचा अभ्यास करून नियोजन केले जाते.


सुधारित शेती पोचली साडेपाच एकरावर हरितगृहामध्ये जरबेरा, गुलाब आणि कार्नेशियन यांची लागवड केली आहे. गुलाब अडीच एकरात, कार्नेशियन अर्धा एकरावर आणि जरबेरा अडीच एकरावर क्षेत्रामध्ये आहे. गेल्या दोन वर्षांपासून हरितगृहातून फुलांचे उत्पादन घेत आहेत.
- बुके तयार करताना लागणारा सर्व शेतीमाल स्वतःच्या शेतात उत्पादित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

राजकुमार यांच्या शेतीची वैशिष्ट्ये - बुके व्यावसायिकांना लागणारे सर्व प्रकारचे फूल दांडे आणि फिलर्स अशा शेतीमालाचे उत्पादन ते घेतात. व्यावसायिकांची मागणी लक्षात आल्याने नियोजन सोपे जाते.
- थेट बुके व्यावसायिकांशी विक्री करत असल्याने दलालीचा खर्च वाचतो
- स्वतःच्या शेतीमालाचा दर ते स्वतःच ठरवतात.
- मालाच्या वाहतुकीसाठी स्वतःचीच वाहने असून, माल वेळेवर पोचवण्याकडे लक्ष दिले जाते.
संपर्क - राजकुमार रामचंद्र भोसले, 9765554242

No comments:

Post a Comment