Saturday, March 2, 2013

नियम

तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें ।
दुरी केंही न वचावें । तीर्थांसी गा ।।

एक मंदीर होते. सुंदर होते. परिसरही निसर्गरम्य होता. पण गावाच्या मध्यभागी असूनही या मंदीरात फारसे कोणी जाता येताना दिसत नव्हते. मला मंदीर आवडले म्हणून मी तेथे नेहमी जाऊ लागलो. तेथे साधना करायचो. पण इतका चांगला परिसर असूनही येथे कोणीच का येत नाही? हा प्रश्‍न मात्र मला नेहमीच विचलीत करायचा. लोकांच्या आवडी निवडी बदलल्या आहेत का? की लोकांना आजकाल अशा नयनरम्य, शांत परिसरातही जायला वेळ नाही? असे अनेक प्रश्‍न मला पडू लागले. उत्तर मात्र सापडत नव्हते. मी मंदीरात नेहमीप्रमाणे साधनेला बसलो होतो. अचानक माझा मोबाईल वाजला. त्यावेळी मंदीरात माझ्या व्यतिरिक्त एक-दोन व्यक्ति असतील. मी फोन वर बोलू लागलो. लगेच मंदीरातील पुजारी, मंदीरामध्ये इतर कामकाज पाहणाऱ्या व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी मला मोबाईल ताबडतोब बंद करण्यास सांगितला. त्यांनी माझ्याशी वाद घालण्यास सुरवात केली. तुम्हाला लिहीलेले वाचता येत नाही का? मंदीर आवारात मोबाईलवर बोलण्यास बंदी आहे. असे खडे बोल सुरू झाले. त्यांची उद्धट भाषा पाहून मलाही राहावले नाही. मीही बोलण्यास सुरवात केली. कारण त्या मंदीरात मी रोजच जात होतो. ध्यान मंदीराची जागा स्वतंत्र आहे. तेथे मोबाईलवर बोलू नये, हे मलाही समजते. पण मंदीर आवारात बोलले, तर काहीच फरक पडत नाहीत. तसे मंदीरात कोणी नव्हतेही? अशावेळी माझ्या बोलण्याचा कोणाला त्रास होणार, हेच मला समजत नव्हते. मी रोज मंदीरात साधनेला बसतो तेव्हा, तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांशी गप्पा मारत बसतात. याचा त्रास रोजच होतो. पण ते चालते. माझे बोलणे चालत नाही. यानंतर मी लगेच तेथून उठलो, बाहेर आलो. माझ्याशी देव बोलला. गावाच्या भर वस्तीत असणाऱ्या या मंदीरात कोणीच का येत नाही? हाच तुझा प्रश्‍न होता ना? मिळाले का उत्तर. नुसता निसर्गरम्य परिसर असून चालत नाही. तेथील वातावरणही रम्य असावे लागते. यासाठी त्या मंदीरात काम करणाऱ्या व्यक्ती, पुजारी हेही तसेच सुभाषिक असायला हवेत. तरच तेथे लोक रमतात. अन्यथा सर्व सुविधा असूनही कोणीच तेथे फिरकत नाही. कारण प्रत्येकाला मनशांती हवी असते. यासाठी प्रत्येकजण तेथे येत असतो. असा फुकटचा वाद घालायला कोणी येत नाही? त्यापेक्षा तेथे जाणे लोक पसंत करत नाहीत. नियम असावेत पण त्याची अमंलबजावणी योग्यवेळी, योग्यप्रकारे व्हायला हवी. मोबाईल बोलण्यास बंदी आहे. तेव्हा मंदीरातील पुजाऱ्याला गप्पा मारत बसण्यास बंदी का नाही? यासाठीच नियम कोणते असावेत यावरही सर्व अवलंबून आहे. निसर्गरम्य परिसर मनाला मोहित करतो, पण तेथे प्रेम नसेल, तेथे भेटणारे वाद घालणारे असतील, तर तेथे देव सुद्धा नांदत नाही. मग तेथे भक्तही राहात नाहीत. यामुळेच तेथे कोणी जात नाही.

1 comment:

  1. unfortunately, this will not be read by any of those who are connected to administration of any temple.

    ReplyDelete