Sunday, April 5, 2020

गुरुकृपा कशी होते ?


ज्ञानदान हा गुरुंचा धर्म आहे. कार्यक्रमांना मानधन किती मिळते त्यानुसार व्याख्यानांचा दर्जा देणारे व्याख्याते आहेत. मानधन पाहून ज्ञानदान केले जात आहे. अशी विचारसरणी किती योग्य आहे. अशा या विचारांमुळेच पैशाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे ,
मोबाईल ८२३७८५७६२१


आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल ।
नवी विरुढी फुटेल । उन्मेषाची ।। 79 ।। अध्याय 2 रा

शाळेत प्रवेश घेताना सर्व प्रथम आपण काय पाहातो? त्या शाळेतील शिक्षक कसे शिकवतात? त्यांची शिकविण्याची कला कशी आहे? म्हणजे आपण प्रथम गुरु कसे आहेत. याची माहिती घेतो. गुरुंचे मार्गदर्शन हे उत्तम असेल तरच त्या शाळेला महत्त्व येते. उत्तम सुविधांनी युक्त असणाऱ्या शिक्षण संस्था ज्ञान दानात याचमुळे मागे पडतात. पण आज असे गुरु मिळणेही कठीण झाले आहे. विचार बदलले आहेत. पगार जास्त मिळतो ना मग त्या संस्थेत काम करायचे. अशी मानसिकता झाली आहे. त्यात गैरही नाही. पण गुरुंनी आपला धर्म पाळला पाहिजे. ज्ञानदान हा गुरुंचा धर्म आहे. कार्यक्रमांना मानधन किती मिळते त्यानुसार व्याख्यानांचा दर्जा देणारे व्याख्याते आहेत. मानधन पाहून ज्ञानदान केले जात आहे. अशी विचारसरणी किती योग्य आहे. अशा या विचारांमुळेच पैशाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. दानापेक्षा पैसा श्रेष्ठ झाला आहे. पण हे सर्व व्यावाहारिक जीवनात आहे. अध्यात्मात असे घडत नाही. असा विचारही येथे नाही. येथे शिष्याची पात्रता पाहून गुरु ज्ञानदान करतात. शिष्य किती दक्षिणा देतो त्यानुसार येथे ज्ञानदान ठरत नाही. येथे आर्थिक दक्षिणा चालत नाही तर मनपूर्वक साधना हीच गुरुंसाठी दक्षिणा असते. गुरुंच्या जवळील ज्ञान हे ओसंडून वाहत असते. गुरु हा ज्ञानाचा झरा असतो. त्या झऱ्यामध्ये आपण डुंबायला शिकावे. ज्ञानासाठी आर्ततेची गरज आहे. शिष्याने ज्ञानासाठी आतुर व्हावे लागते. उन्हाळ्यात जसे आकाशात पावसाचे ढग यावेत अशी इच्छा होते. तसे गुरुंकडून ज्ञानाचा वर्षाव व्हावा अशी इच्छा उत्पन्न व्हावी लागते. इच्छा नसेल तर ज्ञान झिरपणार नाही. पडणारे पावसाचे पाणी समुद्रात व्हाऊन जाईल. ते झिरपण्याची गरज आहे. गुरुकृपेने होणारा ज्ञानाचा वर्षाव आपणात जिरावा यासाठी आपली तयारी असावी लागते. हे पाणी झिरपले तरच जमिनीत असणाऱ्या बीजाला अंकूर फुटेल. हा ज्ञानाचा अंकूूर या पाण्यावर वाढेल. यासाठीच आयुष्यात उन्हाळा यावा लागतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी ह्या उन्हासारख्या दाहक असतात. या दाहक अडचणींनी गुरुकृपेचा वर्षावाने शांत होतात. त्यातून चांगल्या विचाराचे, विकासाचे अंकूर फुटतात. यासाठी समस्यांच्या उन्हाळ्याला भीऊ नये. घाबरू नये. ताठमानेने या समस्यांना सामोरे जाण्याचे मन ठेवायला हवे. साधनेतही असे उन्हाळे येतात. पण या उन्हाने मनातील रोगट विचार मारण्याचा विचार करायला हवा. मनाची नांगरट ही उन्हाळ्यापूर्वी व्हायला हवी. नांगरटीने मनातील रोगट विचार उघडे पडतील. या उन्हाने ते आपोआप मरतील. तापलेल्या जमिनीत पाणी मुरावे यासाठी पोकळी तयार व्हायला हवी. मनाची उत्तम मशागत यासाठी करावी लागते. साधनेने ही मशागत करावी म्हणजे गुरुकृपेच्या वर्षावाने मनात पेरलेले आत्मज्ञानाचे बीज अंकुरेल.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment