Monday, April 13, 2020

देह आणि आत्मा वेगळे कसे? जाणून घेण्यासाठी वाचा...




दिव्याच्या प्रकाशात घरातील सर्व व्यवहार सुरू असतात, पण तो दिवा 
काहीच करत नाही. अगदी तसेच आहे, देहात सर्व व्यवहार सुरू असतात पण आत्मा त्यापासून वेगळा आहे. आत्मा काहीही करत नाही, पण त्याच्या अस्तित्वात सर्व व्यवहार देहात चालतात.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल ८२३७८५७६२१

तो जैसा का साक्षीभूत । गृहव्यापार प्रवृत्तिहेतु ।
तैसा भूतकर्मी अनासक्तु । मी भूतीं असे ।। १२९।। ज्ञानेश्वरी अध्याय ९

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे तो दिवा घरात साक्षीभूत असून घरातील सर्व व्यापारांच्या प्रवृत्तीला कारण असतो, त्याप्रमाणे सर्व भुतांमध्ये मी असून त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मामध्ये मी उदासीन आहे.

रात्रीच्या वेळी अंधारात दिव्याच्या उजेडातच काम सुरू असते. हा दिवा नाहीसा केला तर तेथे फक्त अंधार उरतो. या अंधारात काहीच काम करता येत नाही. या मानवी देहाचे सुद्धा असेच आहे. या पंचमहाभूतांच्या देहात आत्माला आहे. तो त्या घरातील दिव्याप्रमाणे प्रकाशमान आहे. तो जोपर्यंत देहात आहे तोपर्यंत त्या देहात सर्व क्रिया सुरू असतात.तो त्या देहातून गेला की, त्या देहाचे सर्व  व्यवहार बंद होतात किंवा थंड पडतात. म्हणजेच दिवा आणि त्या घरात सुरु असणारे कर्म हे जसे स्वतंत्र आहेत. तसे देह आणि त्या देहातील आत्मा हे सुद्धा वेगवेगळे आहेत. दिव्याच्या प्रकाशात कर्म सुरू आहे तसे आत्म्याच्या अस्तित्वात देहाचे कर्म सुरू आहे. हे आपण जाणून घ्यायला हवे. हे समजूनच आपण आपले कर्म सुरू ठेवायला हवे. या देहात आलेल्या आत्म्याची जाणीव ठेवून त्याचा बोध घेऊन आपण आत्मज्ञानी व्हायचे आहे. त्याचे अस्तित्व जाणणे म्हणजेच आत्मज्ञान. त्याचे नित्य स्मरण ठेवणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे. कारण तो आत्मा हे काम कर, ते काम करू नको असे कधीही सांगत नाही. कर्म देहाकडून केले जात असते. जसे दिव्याच्या प्रकाशात घरातील सर्व व्यवहार सुरू असतात, पण तो दिवा काहीच करत नाही. अगदी तसेच आहे, देहात सर्व व्यवहार सुरू असतात पण आत्मा त्यापासून वेगळा आहे. आत्मा काहीही करत नाही, पण त्याच्या अस्तित्वात सर्व व्यवहार देहात चालतात. पण तो त्या कर्मापासून अलिप्त आहे. वेगळा आहे. त्याला या कर्माशी काहीही घेणे देणे नाही. आत्मा अलिप्त आहे.  देहापासून वेगळा आहे, हेच जाण्यासाठीच सोऽहम साधना आहे. सोऽहम साधनेतून आपण त्याचा बोध घ्यायचा आहे. त्याचे अस्तित्वच जाणून घ्यायचे आहे. या बोधातून आपण आत्मज्ञानी व्हायचे आहे. हेच या मानव जन्माचे कार्य आहे. यासाठीच मानव जन्म आहे. हाच आपला स्वधर्म आहे. हाच धर्म आपण पाळायचा आहे. त्याचे आचरण आपण करायचे आहे. या सोऽहम साधनेचा प्रसार दक्षिण महाराष्ट्रमध्ये खऱ्या अर्थाने परमपूज्य रामचंद्र महाराज तिकोटेकर यांच्यापासून झाला. त्यांची आज पुण्यतिथी. त्यांचे स्मरण करून त्यांच्या सोऽहम साधनेचा बोध आपणास व्हावा, ही साधना त्यांनी आपणाकडून करून घ्यावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.


।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment