Wednesday, April 22, 2020

कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।


शहरात फेरफटका मारायला जाताना कपडे नीटनेटके घालतो. चेहऱ्याला विविध सौंदर्य प्रसादने लावतो. सुंदर दिसण्यासाठी काळजी घेतो. हे करताना महागाईचा विचार डोक्‍यात येत नाही. शेतात सुधारणा करताना महागाई आडवी येते. सुधारणा केली तर उत्पन्नात वाढ होणार याचा विचार का केला जात नाही? चांगले दिसण्यासाठी खर्च, मग चांगले उत्पादन मिळविण्यासाठी सुक्षेत्र का नको? 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें । 
तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ।। 40 ।। अध्याय 1 ला 

ओवीचा अर्थ - किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे भारतामध्ये चार पुरुषार्थ प्रफुल्लित झालेले आहेत. 

शेतात टाकले की उगवते. उत्पादन मिळते. जास्त कष्ट करावे लागत नाहीत. पेरले की थेट काढणीलाच शेतात जाणारेही अनेक शेतकरी आहेत. अशाने आता शेती तोट्याची झाली आहे. ही मानसिकता बदलायला हवी. कोकणात तसेच पश्‍चिम घाटमाथ्यावर भाताची कापणी झाल्यानंतर नांगरट करून त्या शेतात हरभरा विस्कटून टाकण्याची पद्धत आहे. काढणीनंतर परतीचा पाऊस पडला, तर हा हरभरा जोमात उगवतो. तीन महिन्यात हरभरा काढणीला येतो. पेरणीनंतर थेट काढणीलाच शेतकरी शेतात जातात. फारसे कष्ट न घेता हरभऱ्याचे उत्पादन हाती लागते. आजही ही पद्धत रूढ आहे. एकरी एक - दोन पोती उत्पादन होते. चार जणांच्या शेतकरी कुटुंबाला वर्षभर हे धान्य पुरते, पण शास्त्रोक्त पद्धतीने हरभरा लागवड केली तर एकरी पाच पोती उत्पादन मिळते. अडीच पट अधिक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल हवा. यात आळस नको. क्षेत्रात लागवड नको तर सुक्षेत्रात लागवड हवी. जमीनीची नांगरट योग्य प्रकारे केलेली असावी. ओळीमध्ये ठराविक अंतरावर पेरणी केलेली असावी. इतकेच नव्हे तर संत ज्ञानेश्‍वरांनी बी पेरताना ते किती खोलीवर पेरावे याचेही शास्त्र सांगितले आहे. पिकाची योग्य निगा राखली जावी. त्याच्यावर पडणाऱ्या कीड-रोगांचा बंदोबस्त करायला हवा. उत्पादन वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या उपाययोजना करायला हव्यात. खते, पाणी वेळेवर द्यायला हवे. बरेच शेतकरी असे म्हणतात. असे करण्यासाठी पैसा लागतो. खर्च वाढतो. उत्पादन आले तरी खर्च वाढतो. सुक्षेत्रात जोमदार पिकात कीड - रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. याचा विचार कोण करत नाही. यासाठीच याचे अर्थशास्त्र शेतकऱ्यांनी अभ्यासायला हवे. खर्च खरंच किती होतो. उत्पादन किती टक्‍क्‍यांनी वाढते. हे विचारात घ्यायला हवे. जमाखर्च मांडला तरच समजेल शेतीत कोणत्या सुधारणा करायला हव्यात. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते उपाय योजावेत यावर विचार होऊ शकेल. शेती हा जर धंदा आहे तर मग धंदेवाईक दृष्टिकोन का नको ? शहरात फेरफटका मारायला जाताना कपडे नीटनेटके घालतो. चेहऱ्याला विविध सौंदर्य प्रसादने लावतो. सुंदर दिसण्यासाठी काळजी घेतो. हे करताना महागाईचा विचार डोक्‍यात येत नाही. शेतात सुधारणा करताना महागाई आडवी येते. सुधारणा केली तर उत्पन्नात वाढ होणार याचा विचार का केला जात नाही? चांगले दिसण्यासाठी खर्च, मग चांगले उत्पादन मिळविण्यासाठी सुक्षेत्र का नको? यात टंगळामंगळ व्हायला नको. आळस हाच माणसाचा खरा शत्रू आहे. आळसाने कोणतेही काम होत नाही. आळस झटकून देऊन काम करण्याची वृत्ती हवी, तरच प्रगतीच्या वाटा सापडतील.  

। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621




No comments:

Post a Comment