Wednesday, December 5, 2018

ब्रह्मीचें स्वराज्य


तैसें रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें ।
तो भोगी सुख आपुलें । आपणचि ।। 271 ।। अध्याय 3 रा

ओवीचा अर्थ - तसे कामक्रोध जर निःशेष गेले, तर ब्रह्मप्राप्तिरूप स्वराज्य मिळाले असे समज. मग तो पुरूषच आपणच आपलें सुख उपभोगितो.

ब्रह्मसंपन्नता मिळावी ही साधना करणाऱ्या प्रत्येक साधकाची अपेक्षा असते. तो मज भेटावा, तो मिळावा, त्याची अनुभूती यावी असे मनोमन प्रत्येकाला वाटत असते. तसे ते प्रत्येक साधकाचे स्वप्न असते. या स्वप्नात तो जगत असतो. पण हे कसे हस्तगत होते ? यासाठी कशाची गरज असते ? हे मात्र माहीत नसते. ते जाणून घेण्याचा प्रयत्न साधक करत असतो. हळूहळू ही प्रक्रिया घडत असते. पण त्यासाठी दृढसंकल्प, मनाची तयारी ही हवी असते. मनात राग उत्पन्न होऊ नये. कोणाचाही द्वेष आपल्याकडून होऊ नये. असा बदल आपल्यात घडवावा लागतो. हा दृढसंकल्प केला आणि तो पाळला तर ब्रह्म मिळण्याची वाट सुकर होते. राग येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. राग दाबून मनातील राग घालवता येत नाही. यासाठी मनमोकळे करावे लागते. मनाला राग येऊ नये यासाठी मौन व्रत हा एक उपाय आहे. कोणी रागाने बोलले तर त्यावर मौन पाळायचे. त्याकडे दुर्लक्ष करायचे. प्रतिक्रियाच द्यायची नाही. दुसऱ्याने व्यक्त केलेल्या रागाने आपले मन बिघडणार याची काळजी घ्यायची. हसतमुखाने त्याच्या रागाचा स्वीकार करायचा. एखाद्या घटनेत आपणासही राग येतो. त्यावेळी आपण तो राग व्यक्त करायचा नाही. मनाला आवर घालायची. मनात राग उत्पन्न होणार नाही, याची काळजी घ्यायची. तसा बदलच आपल्या स्वभावात करून घ्यायचा. आपणच आपल्यात हा बदल घडवायचा आहे. हा बदल घडविता आला तर, आपणाला आपल्या मनाची स्थिरता साधता येणे सहज शक्‍य होणार आहे. राग-द्वेष नाहीसे झाले तर, मनाची स्थिरता सहजच साधता येते. मन स्थिर झाले की साधनेतही स्थिरता साधता येते. साधनेत मन रमण्यास मदत होते. यासाठी स्वतःच्या मनातील राग-द्वेष यांचा त्याग करायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीतून होणारी मनाची चिडचिड दूर करायला हवी. एखाद्या गोष्टीत स्वतःचे मन गुंतवायला हवे. त्यात इतके गढून जायला हवे की मग राग-द्वेषाचा विसर पडायला हवा. राग आल्यानंतर लगेच मन दुसऱ्या कामात गुंतविण्याचा प्रयत्न करावा. अशाने मनातील द्वेष सहज दूर होतो. रागाचा विसर होण्यासाठी आपल्या आवडत्या कामात लगेच मन रमवायला शिकावे. यातून सहजच राग नाहीसा होतो. आपण राग आणि द्वेषावर नियंत्रण मिळवू शकलो तर साधनेत मन रमवू शकू. साधनेत त्याचा बोध निश्‍चितच होऊ लागेल. साधना करताना राग-द्वेष याची मनात कालावाकालव सुरू असते. अनेक विचार डोळ्यासमोर घोंघावत असतात. यातून मन बाजूला काढून मन सो ऽ हम मध्ये गुंतवायला हवे. सो ऽ हमचा स्वर मनाने, कानाने ऐकायला हवा. यासाठी मनाची स्थिरता साधायला हवी. हे मिळवता आले तर ब्रह्मीचे स्वराज्य सहज हस्तगत होते.

No comments:

Post a Comment