Sunday, December 16, 2018

कृषी पर्यटनात येत आहेत नवे ट्रेंड



कोल्हापुरात कृषी पर्यटनासाठी भरपूर संधी आहेत. जिल्ह्याचा विचार करता पश्‍चिम घाटमाथ्यातील वनराई व तेथील पारंपारिक रुढी-परंपरा हा पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. याचाच विचार करून गेल्या दहा वर्षांत येथे काही शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन विकासासाठी प्रयत्न केले. दसऱ्यानंतर कोल्हापुरात गुऱ्हाळघरे सुरू होतात. ती चार ते पाच महिने चालतात. गुऱ्हाळघरावरील ग्रामीण जीवनाचा आनंद घेण्यासाठी शहरातील तरुणाई येथे आकर्षित होऊ शकते, याचा विचार करून काही शेतकऱ्यांनी याला पर्यटनाची जोड दिली. स्वतःच गूळ निर्मितीचा आनंद घेण्याची संधी काही शेतकरी उपलब्ध करून देतात. हा हंगामी व्यवसाय असल्याने कायमस्वरूपी पर्यटनाची जोड मात्र याला देता येणे अशक्‍य झाले आहे.
 

कणेरी मठावर अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर महाराज यांनी ग्रामीण जीवनाचे चित्र मांडणारी भव्य सृष्टी निर्माण करून एक प्रकारे कृषी पर्यटनास प्रोत्साहन दिले आहे. याचाच आदर्श घेऊन काही शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाला अध्यात्माची जोड देण्याचाही नवा ट्रेन्ड आता विकसित होऊ पाहात आहे. काही निसर्गप्रेमींचाही कृषी पर्यटनाकडे ओढा दिसून येत आहे. कोडोली (ता. पन्हाळा) येथील महेश देशमुख यांनी निसर्ग संवर्धनाच्या छंदाला कृषी पर्यटनाची जोड दिली आहे. जैवविविधता जोपासण्याची जागृती समाजात करण्याच्या उद्देशाने त्यांनी दोन एकरावर नक्षत्र गार्डन विकसित केले आहे. फुलपाखरांचे उद्यानही विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. 

27 नक्षत्रे आणि देवता व त्यांचे वृक्ष अशी कल्पना मांडून त्यांनी उद्यान विकास प्रकल्प राबविला आहे. पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेत आपल्या आवडत्या नक्षत्राच्या ठिकाणी, देवतेच्या ठिकाणी असणाऱ्या वृक्षाखाली साधना करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. वृक्षांची वाढ होण्यास लागणारा कालावधी विचारात घेता त्यांचा हा प्रकल्प सध्या विकसित होण्याच्या मार्गावर आहे. पण त्याच्या या नवा ट्रेंडचा विचार करता पर्यटकांना मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. त्यांनी याबरोबरच पारंपरिक खेळ विटी-दांडू, खो-खो, मल्लखांब, कुस्ती यांचीही संधी उपलब्ध करून दिली आहे. या खेळांबरोबर त्यांची ओळखही नव्या पिढीला व्हावी, निसर्गाची आवडही त्यांच्यात जोपासली जावी असा हा नवा ट्रेंड त्यांनी विकसित करण्याचा ध्यास घेतला आहे.
 

आजच्या धकाधकीच्या जीवनात मनाच्या शांतीसाठी ग्रामीण भागाकडे शहरी लोकांचा ओढा असतो. याचाच विचार करून कृषी पर्यटनाकडे आज अनेकजण आकर्षित होत आहेत. स्वच्छता, पाहुणचार, ग्रामीण जीवनाचा आनंद देऊ शकणारी ठिकाणे कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिह्यात होऊ घातली आहेत. झुणका-भाकरी, खरडा, लोणी, तूप, दही, दुधाचा आस्वाद देत ग्रामीण जीवनाची ओळख करून देण्याचा उद्देश कृषी पर्यटनामध्ये मुख्यत्वे पाहायला मिळतो. कोकणामध्ये सावंतवाडी तालुक्‍यातील चराटे येथे अमृता पाडगावकर यांनी सुमारे बारा एकरावर कृषी पर्यटनाचा प्रकल्प राबविला आहे. सिंधुदुर्गातील काही पर्यटनस्थळांचा आधार घेत त्यांनी ग्रामीण जीवन व कोकणी जेवणाचा आस्वाद व आनंद देणारे असे हे केंद्र विकसित केले आहे. सुरुवातीला त्यांनी दोन रूमवर सुरू केलेला हा प्रकल्प आता विस्तारला आहे. स्वतःच स्वतःच्या हाताने जेवण करा, आमराईत स्वतःच्या हाताने आंबे, काजू तोडा, प्रक्रिया प्रकल्पांना भेट देऊन व्यवसायाची माहितीही घ्या, असे उपक्रम राबवत त्यांनी या पर्यटनाला चालना दिली आहे. कोकणातील संस्कृतीची ओळख करून देत त्यांनी समर फ्रुट फेस्टिव्हलसारखे उपक्रम राबवून पर्यटनासह प्रशिक्षण हा नवा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.

महाराष्ट्रात कृषी पर्यटन 400 ठिकाणी चालते. पश्‍चिम महाराष्ट्रात सुमारे 100 कृषी पर्यटन केंद्रे आहेत. मराठवाडा व विदर्भ भागात याचे जास्त प्रमाण आहे. कोकणात सुमारे 30 कृषी पर्यटन स्थळे आहेत. सध्या याकडे लोक आकर्षित होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता सध्या पाच ते सात पर्यटन केंद्रे सुरू आहेत व 10 ते 12 केंद्रे नव्याने सुरू होण्याच्या स्थितीत आहेत. शाहूवाडी, पन्हाळा या पश्‍चिम घाटमाथ्याच्या कुशीत कृषी पर्यटनास अधिक संधी उपलब्ध आहेत.
- बी. के. डोंगळे, संचालक,
महाराष्ट्र राज्य ग्रामीण कृषी पर्यटन महासंघ (मार्ट)

No comments:

Post a Comment