Saturday, December 3, 2016

अवनि’ करतेय शिक्षण, पर्यावरणाची जागृती

कोल्हापूर शहरातील ‘अवनि’ ही संस्था समाजातील बालकामगार, निराधार, आश्रय नसणाऱ्या बालकांना बालपण मिळवून देण्याचे काम करते. याचबरोबरीने शिक्षण, ग्रामविकास, पर्यावरण आणि स्वच्छतेच्या कामातही संस्थेने आपला ठसा उमटविला आहे.
 राजेंद्र घोरपडे

समाजातील बालकामगार, निराधार, आश्रय नसणाऱ्या बालकांना बालपण मिळवून देण्याच्या मुख्य उद्देशाने सन १९९४ मध्ये प्रा. अरुण चव्हाण यांनी सांगली येथे ‘अवनि’ (अन्न, वस्त्र, निवारा) या संस्थेची स्थापना केली. याचबरोबरीने ग्रामस्वच्छता, पर्यावरण जागृतीसह कचरा निर्मूलनाचे कार्यही संस्थेने हाती घेतले. निराधार मुली, महिलांना आधार; तसेच कचरा वेचणाऱ्या महिलांना संस्थेने स्वयंरोजगार मिळवून दिला. कोल्हापुरातील जीवबानाना पार्क येथे संस्थेने बालगृह उभारले आहे.
उपक्रमाविषयी सांगताना ‘अवनि’ संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले म्हणाल्या, की सन १९९६-९८ मध्ये ग्रामस्वच्छता अंतर्गत सरकारने शौचालय बांधण्याची योजना सुरू केली. या कामात ‘अवनि’ संस्था सहभागी झाली. करवीर तालुक्‍यातील सहा गावांत संस्थेने १६५ शौचालये बांधली. सुरवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या, त्यामुळे या कामात संस्थेला मोठा टप्पा गाठता आला नाही; पण संस्थेने ध्येय सोडले नाही. पर्यावरण आणि स्वच्छतेच्या कामात आजही ‘अवनि’चा पुढाकार आहे. घराघरांत निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या निर्मूलनाचे कार्य संस्थेने हाती घेतले आहे.

कोल्हापुरात निवासी बालगृह ः

भूमिहीन मजूर, शेतमजूर, दारिद्र्यत्रस्त कुटुंबातील मुलांना आधार देण्याचे कार्य ही संस्था करते. या मुलांसाठी कोल्हापूर शहरातील जीवबानाना पार्क येथे निवासी बालगृह सुरू केले. या बालगृहामध्ये सुमारे ४० मुले-मुली राहतात. संस्थेचा वाढता विस्तार विचारात घेऊन हणबरवाडी येथे २५० मुलांची सोय होईल इतके मोठे बालगृह बांधण्याचे काम सुरू आहे.

बालकामगारांचे पुनर्वसन ः
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील धाबे, हॉटेल, हातगाड्यांवर काम करणाऱ्या बालकामगारांचा शोध घेऊन त्यांची मुक्तता करण्याचे कार्य संस्था गेली दोन वर्षे करत आहे. आत्तापर्यंत जवळपास २०० हॉटेलांमध्ये संस्थेने पाहणी केली आहे. या शोधमोहिमेत आत्तापर्यंत १३४ बालकामगारांची मुक्तता केली असून, त्यांचे पुनर्वसनही संस्थेने केले आहे.

डे केअर सेंटर ः
कचरा वेचणाऱ्या महिलांची तीन ते सहा वयोगटातील मुले सांभाळण्यासाठी डे केअर सेंटर हा उपक्रम संस्थेने सुरू केला. गेली तीन वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत असून, कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर, यादवनगर, संभाजीनगर, कत्यायनी कॉम्प्लेक्‍स यासह ग्रामीण भागात फुलेवाडी, वडणगे येथे ही डे केअर सेंटर्स चालवली जातात. सहा वस्त्या मिळून सुमारे १२० मुलांची काळजी संस्थेतर्फे घेतली जाते.

कचरा संकलनावर प्रक्रिया ः

कचरा वेचणाऱ्या सुमारे ३३६ कुटुंबांशी संस्था जोडलेली आहे. या कुटुंबांचे संघटन करून त्यांना ओळखपत्रे तसेच घरकुले, शौचालये आदी सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोल्हापूर शहरातील दहा वस्त्यांमध्ये कचरा गोळा करण्याचे काम संस्था करते. सध्या रोज १२० घरांतील कचरा संस्थेतर्फे संकलित केला जातो. दररोज ५० ते ५५ किलो कचऱ्याचे संकलन होते. यामध्ये सुका व ओला कचरा स्वतंत्रपणे संकलित केला जातो. यासाठी २२ महिलांना कचरा कसा गोळा करायचा याचे प्रशिक्षण देण्यात आले. शहरातील भक्ती-पूजानगर येथे संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. यासाठी विविध आकारांचे खड्डे तयार करण्यात आले आहेत. दररोजचा कचरा वेगवेगळ्या खड्ड्यांत साठविण्यात येतो. सोमवार ते रविवार असे खड्डे केले आहेत. सात दिवस या खड्ड्यांत कचरा कुजवल्यानंतर तो एका मोठ्या खड्ड्यात साठविण्यात येतो. साधारणपणे ३१ दिवसांत या कचऱ्यापासून खत तयार होते. महिन्याला साधारणपणे ९० किलो सेंद्रिय खताची निर्मिती होते. चाळीस रुपये किलो या दराने विक्री केली जाते.

विविध संस्थांकडून गौरव ः
‘अवनि’च्या कार्याची दखल घेऊन अनुराधा भोसले यांना आत्तापर्यंत विविध संस्थांनी गौरविले आहे. यामध्ये प्रामुख्याने राजर्षी शाहू गौरव पुरस्कार, बाया कर्वे पुरस्कार, पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर पुरस्कार,
हिरकणी पुरस्कार, उंच माझा झोका या पुरस्कारांबरोबरीने अमेरिकेतील एका संस्थेने त्यांना गौरविले आहे.

पर्यावरणपूरक घर ः

महात्मा गांधींच्या ग्राम व पर्यावरणविषयक विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी मुंबई येथील गांधी फाउंडेशन व ‘अवनि’ने एकत्रितपणे प्रयत्न सुरू केले. नंदवाळ (वाशी) येथे संस्थेची पाच एकर जागा आहे. या जागेत पर्यावरणपूरक डोम पद्धतीची दोन घरे बांधली आहेत. सध्या येथे चार विद्यार्थी राहात असून, उर्वरित जागेत भाजीपाला, मका, कडधान्ये, भुईमूग इत्यादी पिकांची लागवड केली जाते. येथे जैविक शेतीबाबात प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते.
ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षण ः
लातूर, बीड, उस्मानाबाद आदी दुष्काळी जिल्ह्यांतून येणारी कुटुंबे ही उपजीविकेसाठी वीटभट्टी, धाबा, साखर कारखान्यांची ऊसतोडणी अशी कामे करतात. या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्‍न असतो. शाळा उपलब्ध नसल्याने अशी मुले लहान वयामध्ये मजुरी करतात. अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन ‘अवनि’ने त्यांच्या शिक्षणासाठी कार्य हाती घेतले. सन २००१ पासून संस्थेने शाळाबाह्य मुलांना शिक्षण देण्यास सुरवात केली.
याबाबत अनुराधा भोसले म्हणाल्या, की संस्थेतर्फे कोल्हापूर शहराच्या परिसरातील उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, कळंबा, बालिंगा, वाकरे खुपिरे; तसेच शिरोळ तालुक्‍यातील चिंचवाड, उदगाव येथे सर्व्हेक्षण करून शाळाबाह्य मुले शोधण्यात येतात. तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी वीटभट्ट्यांवर आनंद शाळा ‘अवनि’ संस्था चालविते. सहा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांना परिसरातील शाळांत शिक्षणाची सोय करून दिली जाते.
आॅक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये कामाच्या निमित्ताने ही कुटुंबे येतात आणि मार्च- एप्रिलमध्ये परत आपापल्या गावी जातात. या कालावधीत या मुलांना परिसरातील शाळांत शिक्षणाची सोय केली जाते. ही मुले गावी गेल्यावर तेथील शाळेत जातात की नाही, याची पाहणी संस्थेतर्फे केली जाते. सन २००१ मध्ये सुरवातीला सुमारे २०० मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न संस्थेने सोडविला. यंदा सुमारे १२०० मुलांच्या शिक्षणाची सोय संस्थेने केली आहे. आत्तापर्यंत सुमारे ९१०० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य संस्थेने केले आहे.

संपर्क ः अनुराधा भोसले ः ९८८१३२०९४६

No comments:

Post a Comment