Wednesday, March 27, 2013

मधमाशीपालनातील "मधुकर'

कोल्हापूर जिल्ह्यात उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या जंगली भागात नाईक यांचा पूरक व्यवसाय
पश्‍चिम घाटमाथ्यावरील जैवविविधता, तसेच तेथील कुटीर उद्योगांचीही जोपासना गरजेची आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पाटगाव (ता. भुदरगड) येथील मधुकर नाईक अनेक वर्षांपासून मधमाशीपालनाचा व्यवसाय करीत आहेत. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी शेतीला हा पूरक व्यवसाय त्यांना किफायतशीर ठरला आहे.
 
राजेंद्र घोरपडे
पाटगाव येथील मधुकर संभाजी नाईक यांची तशी चार एकर शेती असली तरी त्यातील बरीच पडीक. भात व नाचणी ही त्यांची मुख्य पिके. त्यातून घरी खाण्यापुरते उत्पादन मिळते. मात्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे अर्थार्जन अजून होण्याची गरज होती. पाटगाव परिसरात जंगल असल्याने तेथे सातेरी जातीच्या मधमाश्‍या आढळतात. त्यांच्यापासून मधसंकलनाचा व्यवसाय करण्याचे नाईक यांनी ठरवले. सुरवातीला मधसंकलनासाठी रोजंदारी केली. सन 1970 मध्ये महिन्याला 30 रुपये मजुरी मिळायची. पुढे ही कला अवगत झाल्यानंतर त्यांनी स्वतःच हा व्यवसाय सुरू केला. सध्या यावरच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो.

अनेक चढ-उतार येऊनही त्यांनी हा व्यवसाय सोडला नाही. शहराचा रस्ता पकडला नाही. आहे त्या परिस्थितीला तोंड देत आपली वाटचाल सुरूच ठेवली. या व्यवसायात आता मुलगा विनायक याचीही साथ मिळत आहे.

दहा वर्षे रोजंदारी केल्यानंतर 1980 पासून मधुकर यांनी व्यवसायात स्वयंपूर्णता मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या काळात वर्षाला 150 ते 200 किलो इतका मध ते गोळा करत. पाटगावात तेव्हा सहकारी तत्त्वावर मध उत्पादक संस्था होती. किलोला 30 रुपये दर सोसायटीकडून मिळत होता. सन 1994 पर्यंत या व्यवसायात चांगले उत्पन्न मिळत होते. 1994 मध्ये 28 हजार किलो इतके उच्चांकी मधसंकलन सोसायटीमध्ये झाले होते.

थायी सॅक ब्रुड रोगाचा प्रादुर्भाव
सन 1994 नंतर थायी सॅक ब्रुड रोगाच्या प्रादुर्भावामुळे या व्यवसायावर जवळपास गंडांतरच आले. अंडीकोषातच मधमाश्‍या मरायच्या. मरतूक मोठी असल्याने मधमाश्‍यांच्या वसाहतीच नष्ट झाल्या. वर्षाला केवळ 20 ते 25 किलो इतकेच मधसंकलन व्हायचे. यामुळे अनेकांनी हा व्यवसाय सोडला. पाटगाव येथील मध उत्पादक सहकारी संस्थाही मोडकळीस आली. पण तरीही मधुकर यांनी हा व्यवसाय सोडला नाही. त्यांनी जिद्दीने तो पुढे सुरू ठेवला.

मध संकलन कसे चालते?
 सातेरी जातीच्या मधमाश्‍यांपासून मध काढला जातो.
-मुख्यतः फेब्रुवारी ते मे या कालावधीत संकलन चालते.
-मधमाश्‍यांच्या वसाहती असलेल्या पेट्या जंगलात योग्य ठिकाणी ठेवाव्या लागतात.
-फेब्रुवारीनंतर अनेक जंगली वनस्पती फुलोऱ्यावर येतात.
-कोणत्या कालावधीत कोणत्या वनस्पती फुलोऱ्यावर येतात, कोणत्या भागात या वनस्पतींची संख्या अधिक आहे. याची पाहणी करून तसे पेट्या ठेवण्याचे नियोजन मधुकर करतात.
त्यांच्याकडे मधसंकलन करणाऱ्या सुमारे 30 ते 35 पेट्या आहेत.
- वसाहतींची संख्या, हवामान व फुलोरा या बाबींवर आधारित मधाचे उत्पादन अवलंबून असते.
- वर्षाला सुमारे 250 ते 300 किलो इतका मध संकलित होतो.

-उत्पन्न
दरवर्षी सुमारे 15 पेट्या तरी मधुकर यांना नव्याने कराव्या लागतात. प्रति पेटी एक हजार रुपये खर्च येतो. पेटी आणि मध संकलनासाठी मजुरीचा असा सुमारे 20 हजार रुपये खर्च येतो. सध्या 250 रुपये प्रति किलो दराने मधाची विक्री होते. परिसरातील, कोल्हापूर तसेच मुंबई भागातील ग्राहक घरी येऊन मध घेऊन जातात.
मधाची क्वालिटी चांगली असल्याने दरवर्षीचे ग्राहक तसेच नव्यानेही ग्राहक जोडले जातात.
मध यांत्रिक पद्धतीने काढला जातो, तसेच तो फिल्टर केला जातो. त्याची गुणवत्ता चांगली ठेवली जाते.
वसाहतींचीही विक्री केली जाते. गेल्या वर्षी मधुकर यांनी 16 वसाहतींची विक्री केली. प्रति वसाहत 900 रुपये दर मिळाला. या व्यवसायातून वर्षाला सुमारे 40 ते 45 हजार रुपयांचे उत्पन्न खर्च वजा जाता मिळते. पाटगावसारख्या जंगली भागात उत्पन्नाचे प्रभावी स्रोतच नसल्याने तसेच परिसरातील कोणताही व्यवसाय इतका रोजगार देत नसल्याने मधुकर यांना हा व्यवसाय सर्वाधिक फायदेशीर वाटतो.

वसाहतींचे नियोजन
 डिसेंबरमध्येच मधमाश्‍यांच्या वसाहती पेट्यात भरण्याचे काम चालते. जुन्या पेटीतील राणीमाशी योग्य प्रकारे काम करत नसेल तर ती बदलली जाते. मधाचे संकलन योग्य प्रकारे होण्यासाठी पोळ्यांचा रंग पांढरा आहे का? वसाहतीतील मधमाश्‍यांचे काम नियमित चालू आहे का? खाद्याची कमतरता आहे का? आदींची पाहणी करणे गरजेचे असते. पेटीत दोन कप्पे असतात. या दोन्ही कप्प्यात माश्‍या पोळी तयार करतात. खालचा कप्प्यातील मध हा माश्‍यांसाठी खाद्य म्हणून ठेवण्यात येतो तर वरच्या कप्प्यातील मध काढून घेण्यात येतो.

मधासाठी आवश्‍यक वनस्पती
जांभूळ
रामरक्षा
रान पेरव


शिकेकाई

मोरआवळा
 मधाच्या संकलनासाठी जंगलामध्ये शिकेकाई, रामरक्षा, जांभूळ, मोरआवळा, हुरा, रान पेरव, पांगिरा, सावर, हेळा, नाना, सोनवेल, गेळा, कुंभा आदी वनस्पतींची संख्या अधिक असणे आवश्‍यक आहे. अशा भागातच मध संकलन अधिक होते. जंगलातील या वनस्पतींचे संवर्धन यासाठी गरजेचे आहे असे मधुकर यांना वाटते. मधमाशीपालनाच्या या व्यवसायामुळेच या वनस्पतींचे संवर्धन पाटगाव परिसरात केले जात आहे.

कर्ज काढून पेट्यांची खरेदी
दोन वर्षांपूर्वी मधुकर यांनी खादी ग्रामोद्योगच्या योजनेतून तीन वर्षांसाठी कर्ज काढून 25 पेट्यांची खरेदी केली. एका पेटीची किंमत 1500 रुपये असून, यासाठी खादी ग्रामोद्योगचे 25 टक्के अनुदान मिळाले. वर्षाला दहा हजार रुपयांचा हप्ता व चार हजार रुपये व्याजापोटी भरावे लागतात. कर्ज काढून व्यवसाय करण्याचे धाडस मधुकर यांनी केले खरे, पण मध संकलनाची चिंता नेहमीच सतावते. जर योग्य संकलन झाले नाही, रोगाचा प्रादुर्भाव झाला तर हप्ता कसा फेडणार याची चिंता असते. महाबळेश्‍वर येथील मध संचालनालय, खादी ग्रामोद्योग व जिल्हा कृषी विभागाने घाटमाथ्यावरील मध उत्पादकांसाठी वेगळी योजना तयार करण्याची गरज त्यांना वाटते.

- मधुकर संभाजी नाईक, 9405265639
पाटगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत गेल्या वर्षी 40 शेतकऱ्यांना खादी ग्रामोद्योगतर्फे मधमाशीपालनाचे प्रशिक्षण व अनुदानावर 120 पेट्यांचे वाटप केले. हे लाभार्थी पाटगाव, तांब्याची वाडी, मानी, मठगाव परिसरातील आहेत. यंदाही 40 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- महावीर लाटकर, तालुका कृषी अधिकारी, भुदरगड

Saturday, March 23, 2013

इये मराठीचे नगरी

पुस्तकाचे नाव- इये मराठीचे नगरी  mobile ebook
लेखक- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, 9011087406
 available to free download
https://play.google.com/store/apps/details?id=com.sachi.ethe_marathicheye_nagari.AOUEBEOJTSBCWOZH
संत वाड:मयाविषयी ज्यांना ज्ञानेश्‍वरी दुर्बोध वाटते यांच्यासाठी "इये मराठीचिये नगरी" हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. ज्ञानेश्‍वरांच्या ओव्यांना नव्याने जागृत करण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. अलीकडच्या नव्या पिढीत संत वाड:मय हा प्रकार दुरापास्त होत आहे. इये मराठीचिये नगरी हे पुस्तक नव्या पिढीला सोपेपणाने ज्ञानेश्‍वरीकडे आकर्षित करणारे ठरेल असा लेखकांचा विश्‍वास आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या नव्या पिढीमध्ये ज्ञानेश्‍वरीतील ओव्याचे सोप्या शब्दांत अर्थ मांडण्यात आले आहेत. पुस्तकाच्या प्रत्येक पानावरुन सहज जरी फेरफटका मारला तरी ज्ञानेश्‍वरी काय आहे याची कल्पना येवू शकेल. सर्वसामान्यांना मूळ ज्ञानेश्‍वरी वाचण्याची इच्छा व्हावी, अशा सहजतेने ज्ञानेश्‍वरीतील ओव्यांचा अर्थ सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न आहे. नव्वद ओव्यांचा भावार्थ मांडण्यात आला आहे. या ओव्यांचा अर्थ समजावून सांगताना लेखकाने इतिहासाचा दाखला, त्याला सद्यस्थितीची जोड याचा सुरेख मेळ घातला आहे. या ओव्याचा अर्थ समजावून सांगण्याचे कसब लेखकाने साधले आहे. प्रत्येक ओवीला एक भावनेची किनार देण्यासाठी लेखक आग्रही आहे. ज्ञानेश्‍वरी अभ्यासताना त्याचा सर्वांगाने विचार व्हावा, चांगले, वाईट, यातील फरक समजवून कसा घ्यावा, मनाची शांती चांगल्या कार्यासाठी किती महत्वाची आहे, चांगल्या संस्कारासाठी ओव्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या विविध घटकांची चर्चा ओघवत्या भाषेत लेखकाने केली आहे. पुस्तक धार्मिक असले तरी प्रचलित भाषेचा ओघवता स्पर्श प्रत्येक निरुपणाला आल्याने इये मराठीचिये नगरी हे पुस्तक लिहण्यामागे समाजाने धार्मिकतेच्या माध्यमातून समाजसुधारण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे असा प्रयत्न लेखकाने प्रत्येक ओवीचा अर्थ मांडताना केला आहे.

Thursday, March 21, 2013

आत्मबोध

तें ज्ञान ह्रद्‌यीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फिटे ।
विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ।।

आत्मज्ञान प्राप्तीची एक पायरी आत्मबोधाची आहे. पण हा आत्मबोध कसा होतो? यासाठी काय करावे लागते? हे जाणून घेणे गरजेचे आहे. मी आत्मा आहे. हे ज्ञान जेव्हा होते. याची अनुभूती जेव्हा येते. तेव्हा या ज्ञानाची प्रतिष्ठापना ह्रद्‌यात होते. सोह्‌मचा जप जेव्हा ह्रद्‌यात प्रकट होतो. श्‍वासावर जेव्हा आपले नियंत्रण राहाते. तेव्हा मन स्थिर होते. या स्थितीमध्ये मनात शांतीचा अंकुर फुटतो. यातूनच आत्मबोध वाढतो. हा अंकुर जसजसा वाढेल तसा आत्मबोध वाढतो. याचे वृक्षात रूपांतर होते. त्याला मग आत्मज्ञानाची फळे येतात. यासाठी साधना ही महत्त्वाची आहे. सद्‌गुरूंनी सांगितलेली सोह्‌म साधना नित्य करणे आवश्‍यक आहे. साधनेत मन रमवायला हवे. पण नेमके हेच होत नाही. धकाधकीच्या जीवनात तर आता हे अशक्‍यच वाटत आहे. गुरूकृपेशिवाय हे शक्‍य नाही. मुळात ही साधनाच सद्‌गुरू करवून घेत असतात. यासाठी त्यांच्याकडे ही विनवणी आपणच करायला हवी. तर मग आपोआपच ते ही साधन करवून घेतील. फक्त आपण सवड काढायला हवी. धावपळीच्या जीवनात सवडच मिळत नाही. खरंतर आता या धावपळीत गप्प बसणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व संपविण्याचा प्रकार झाला आहे. यामुळे मनाला गप्प बसण्याचा, निवांतपणाचा विचारच डोकावत नाही. थांबला तो संपला. अशी अवस्था झाली आहे. यामुळे साधना करण्याकडे लोकांचा ओढा कमीच होत चालला आहे. साधना करणे म्हणजे फुकट वेळ घालविणे अशी समजूत आता होऊ घातली आहे. पण प्रत्यक्षात निवांतपणा, विश्रांतीही जीवनाला आवश्‍यक असते. प्रवास करताना काही ठिकाणी थांबे हे घ्यावेच लागतात. तरच प्रवास सुखकर होतो. नाहीतर अंगदुखी, अंग अवघडणे हे प्रकार सुरू होतात. जीवनाच्या प्रवासाचेही असेच आहे. त्यामध्येही काही थांबे घ्यायला हवेत. सततच्या कामात विरंगुळा हा हवाच. यासाठी पर्यटन आपण करतोच. पण दिवसभराच्या कामातही विरंगुळा हवा. थांबा हवाच. यासाठी दहा पंधरा मिनीटे साधना करायला हवीच. साधनेचे फायदे विचारात घेऊन तरी साधना करायला हवी. मनाला त्यामुळे थोडी विश्रांती मिळते. मन ताजेतवाने होते. धकाधकीच्या जीवनात याची मुळात गरज आहे. जीवनात यशाचे शिखर सर करण्यासाठी आत्मबोधाचे हे ज्ञान उपयुक्त ठरणारे आहे. धकाधकीच्या जीवनात व्यायाम नसल्याने अनेक आजार उत्पन्न होत आहेत. यासाठी मनाचा हा व्यायाम तरी नियमित करायला हवा. यामुळे मन ताजेतवाने होऊन नवनव्या कल्पनांना चालना मिळू शकेल. यासाठी तरी साधना करायला हवी. हीच वाट आत्मज्ञानाकडे निश्‍चितच नेईल.

मनुष्यजात

देखें मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ ।
जाहलें असे केवळ । माझां ठायीं ।।

भारतात अनेक जाती, पंथ, परंपरा आहेत. दुसऱ्या देशातही तशाच जाती, परंपरा आहेत. प्रत्येकाला त्याच्या जातीचा, धर्माचा, देशाचा स्वाभीमान असतो. आपण बाहेर गेल्यानंतर आपण मराठी आहे याचा टेंभा मिरवतो. कोणी कानडी असेल तर तो कानडी असल्याचा तोरा मिरवतो. हे स्वाभाविक आहे. त्यात गैर असे काहीच नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आपण श्रेष्ठ आहोत हे दाखविण्यातच आपले महत्त्व असते. यासाठी स्वाभीमान असायला हवा. आज प्रत्येक वृत्तपत्र त्यांचा खप, प्रत्येक चॅनेल त्यांचा टीआरपी कसा जास्त आहे. आपण इतरांपेक्षा कसे चांगले आहोत हेच दाखविण्याचा प्रयत्न करते. आज त्याची गरज झाली आहे. महाराष्ट्राबाहेरही मराठी कशी श्रेष्ठ आहे हे दाखविण्याचे प्रयत्न होतात. मुळात आपणास दूर गेल्यानंतरच आपल्या संस्कृतीची ओढ लागते. त्याचे श्रेष्ठत्व समजते. जाती व्यवस्था जगात सर्वत्र आहे. याला विशेष महत्त्व आहे. कारण यामुळे मनुष्य संघटित राहातो. त्याची सुरक्षितता वाढते. त्याचे कुटुंब, नातेसंबंध यांच्यात ऐक्‍य असते. यामुळे गरजेच्यावेळी त्याला मदतीला अनेकजण धावून येतात. यासाठी या जातींचे महत्त्व आहे. एकलकोंडेपणा राहात नाही. आज शहरात एकलकोंडेपणा वाढला आहे. कोणाकडे जाणे नाही, येणे नाही. अशाने माणसाची मानसिकता ढळत चालली आहे. मुळात हीच स्थिती खरी अध्यात्माची ओढ वाढविणारी आहे. पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने तो भरकटत आहे. अनेकजण त्याच्या या एकाकीपणाचा फायदा घेत आहेत. असे होऊ नये यासाठी जागरूकता महत्त्वाची आहे. प्रत्येक मनुष्यजातीचा भगवंताकडे ओढा असतो. हा मुळात त्याचा स्वभावता गुण आहे. पण गोंधळलेल्या मानसिक स्थितीमुळे तो भरकटत आहे. भगवंताचे भजन, चिंतन, मनन हा स्वभावधर्म आहे. प्रत्येक जातीधर्मात हेच सांगितले आहे. म्हणून मनुष्यजातीचा हा धर्म पाळायला हवा. भगवंताच्या चरणी लीन व्हायला हवे. गर्वाने, तमोगुणाने मनुष्य भरकटला जात आहे. त्याच्या हा अहंकारच त्याला संपवत आहे. हा अहंकार जागृत करण्याचा प्रयत्न काही मंडळीकडून होत आहे. यामुळे तर जातीय तणाव वाढत आहे. अहंकाराने तो भ्रमिष्ठ होत आहे. त्याचाच क्रोध वाढत आहे. क्रोधावर नियंत्रण कसे ठेवायचे याचे उपाय धर्मात सांगितले आहेत. धर्म हा शांतीचा मार्ग सांगतो. त्यामुळे तेथे क्रोधाचा मार्ग कधीच असू शकत नाही. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. पण देव संरक्षणासाठी क्रोधीत जरूर होतो. स्वातंत्र्य कोणी हिरावून घेत असेल तर तो अधर्म आहे. तो अधर्म नष्ट करण्यासाठी त्याला क्रोध हा आवश्‍यक आहे. हा तर मनुष्यजातीचा स्वभाव आहे.

Saturday, March 16, 2013

जावे पुस्तकांच्या गावा

पुस्तकाचे नाव- इये मराठीचे नगरी
लेखक- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, 9011087406
पृष्ठ संख्या- 104, किंमत- रुपये 80
............
भावार्थ ज्ञानेश्‍वरी  -  राजकुमार चौगुले
संत वाड:मयाविषयी ज्यांना ज्ञानेश्‍वरी दुर्बोध वाटते यांच्यासाठी "इये मराठीचिये नगरी" हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. ज्ञानेश्‍वरांच्या ओव्यांना नव्याने जागृत करण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. अलीकडच्या नव्या पिढीत संत वाड:मय हा प्रकार दुरापास्त होत आहे. इये मराठीचिये नगरी हे पुस्तक नव्या पिढीला सोपेपणाने ज्ञानेश्‍वरीकडे आकर्षित करणारे ठरेल असा लेखकांचा विश्‍वास आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या नव्या पिढीमध्ये ज्ञानेश्‍वरीतील ओव्याचे सोप्या शब्दांत अर्थ मांडण्यात आले आहेत. पुस्तकाच्या प्रत्येक पानावरुन सहज जरी फेरफटका मारला तरी ज्ञानेश्‍वरी काय आहे याची कल्पना येवू शकेल. सर्वसामान्यांना मूळ ज्ञानेश्‍वरी वाचण्याची इच्छा व्हावी, अशा सहजतेने ज्ञानेश्‍वरीतील ओव्यांचा अर्थ सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न आहे. नव्वद ओव्यांचा भावार्थ मांडण्यात आला आहे. या ओव्यांचा अर्थ समजावून सांगताना लेखकाने इतिहासाचा दाखला, त्याला सद्यस्थितीची जोड याचा सुरेख मेळ घातला आहे. या ओव्याचा अर्थ समजावून सांगण्याचे कसब लेखकाने साधले आहे. प्रत्येक ओवीला एक भावनेची किनार देण्यासाठी लेखक आग्रही आहे. ज्ञानेश्‍वरी अभ्यासताना त्याचा सर्वांगाने विचार व्हावा, चांगले, वाईट, यातील फरक समजवून कसा घ्यावा, मनाची शांती चांगल्या कार्यासाठी किती महत्वाची आहे, चांगल्या संस्कारासाठी ओव्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या विविध घटकांची चर्चा ओघवत्या भाषेत लेखकाने केली आहे. पुस्तक धार्मिक असले तरी प्रचलित भाषेचा ओघवता स्पर्श प्रत्येक निरुपणाला आल्याने इये मराठीचिये नगरी हे पुस्तक लिहण्यामागे समाजाने धार्मिकतेच्या माध्यमातून समाजसुधारण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे असा प्रयत्न लेखकाने प्रत्येक ओवीचा अर्थ मांडताना केला आहे.

गुरू शिष्य


जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गांठी ।
तेथ स्थिर राहोनि नुठी । कवणें काळीं ।।

नाथ परंपरेमध्ये ज्ञान हे गुरूकडून शिष्यास दिले जाते. यामुळे गुरूशिष्याच्या या नात्यास महत्त्व आहे. सद्‌गुरू हे आत्मज्ञानी असतात. त्याचा उपदेश हा उपयुक्त असतो. त्यांच्या उपदेशामुळेच गुरू-शिष्यांचे नाते दृढ होते. एक उद्योगपती सद्‌गुरूंच्यांकडे उपदेशासाठी आला. त्याची आई आजारी होती. तिला झटका आला होता. ती कोमात होती. तिला शुद्धीवर आणण्याचे सर्वप्रयत्न सुरू होते. पण ती शुद्धीवर येत नव्हती. नेमके कारण डॉक्‍टरांनाही समजत नव्हते. या समस्येने त्रस्त उद्योगपती अखेर सद्‌गुरूंच्या चरणी आला. त्याने सद्‌गुरूंना याबाबत विचारले. सद्‌गुरूंनी त्याला आईचे दात मोजण्यास सांगितले. ते सर्व व्यवस्थित आहेत का? याबद्दल पाहाण्यास सांगितले. सद्‌गुरू आत्मज्ञानी होते. त्यांनी नेमके कारण ओळखले होते. उद्योगपती लगेच दवाखान्यात गेला आणि त्याने डॉक्‍टरांना हा प्रकार सांगितला. डॉक्‍टर हसले आणि त्यांनी या उद्योगपतींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. उद्योगपतीने मग स्वतःच आईचे सर्व दात आहेत का पाहिले. तर खरच त्यातील दोन दात नव्हते. त्याने लगेच त्या डॉक्‍टरांना याबाबत कल्पना दिली. त्यानुसार डॉक्‍टरांनी आईची तपासणी केली. त्यात तिच्या पोटात दोन दात असल्याचे आढळले. ते काढण्यात आले आणि चमत्कार काय तर काही वेळातच त्या उद्योगपतीची आई शुद्धीवर आली. खरेतर त्या दातांच्या विष्यामुळेच ती शुद्धीवर येत नव्हती. सद्‌गुरूंना आत्मज्ञानाने दातामुळे समस्या असल्याचे समजले. डॉक्‍टरांना मात्र ते लक्षात आले नाही. आता येथे डॉक्‍टर श्रेष्ठ की सद्‌गुरू श्रेष्ठ. दोघेही ज्ञानी आहेत, पण आत्मज्ञानी संत सर्वज्ञानी असतात. त्यांना ती दृष्टी असते. यासाठी ते श्रेष्ठ असतात. यासाठीच आत्मज्ञानी संतांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करू नये. विश्‍वास नसला तर कमीत कमी काय सांगितले आहे ते खरे आहे की खोटे आहे हे तपासायला तरी काहीच हरकत नाही. यामुळे आपला काही तोटा तर होत नाही. सद्‌गुरूचा हा उपदेश उद्योगपतींनी ऐकला. त्याची पडताळणी केली. त्यांनी स्वतः तपासणी केली म्हणूनच त्यांची आई शुद्धीवर आली. विज्ञानाने प्रगती जरूर केली आहे. पण ते ज्ञान योग्य प्रकारे वापरायला हवे. ते वापरण्याचे कौशल्य हवे. ते कौशल्य नसेल, तर सर्व व्यर्थ आहे. काही गोष्टी विज्ञानानेही समजत नाहीत. सुटत नाहीत. त्या आत्मज्ञानाने समजतात. त्या गोष्टी सोडविण्यासाठी यावर विश्‍वास ठेवायला हवा. 

Friday, March 8, 2013

स्वधर्म

म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा ।
सर्वभावें भजावा । हाचिं एकु ।।

स्वधर्म कोणता? स्वतः लाच स्वतःमध्ये पाहणे हाच स्वधर्म आहे. म्हणजे काय? स्वतःचे रूप स्वतःच पाहणे. मी कोण आहे? जग मला एका नावाने ओळखते. माझे जगात नाव आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आता नाव जगभर पोचवता येते. एकाक्षणात तुमचा पराक्रम जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकतो. आता जग जवळ आले आहे. आपण टाकलेली एखादी पोस्ट एकाक्षणात सर्वांना पोहोच होते. जगात आपला नावलौकिक होतो. पण जग ज्या नावाने मला ओळखते तो मी आहे का? याचा अभ्यास करण्याची गरज आहे. नावामध्ये काय आहे. मृत्यूनंतर फक्त नावच उरते. तो मी आहे का? तो नाही तर, मग मी कोण आहे? हा प्रश्‍न स्वतःच स्वतःला विचारायला हवा. यावर विचारमंथन करायला हवे. जग जिंकायला निघालेल्या एका शुराला भारताच्या सीमेवर एका साधूने हा प्रश्‍न विचारला होता. त्याला राग आला. त्याने त्या साधूला उलटे टांगले. पण तरीही साधूने त्याला उपदेश देणे सुरूच ठेवले. साधू म्हणाला, स्वतः प्रथम कोण आहेस याचा विचार कर? स्वतःवर विजय मिळव. तेव्हाच तू सर्व जग जिंकशील. या साधुच्या विचाराने तो शूरवीर अस्वस्थ झाला. पण त्याच्या डोक्‍यात हा विचार घोळू लागला. साधुच्या बोलण्याचा अर्थ त्याला कळेना. त्याने विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर त्याला सापडेना. शेवटी त्याने नतमस्तक होऊन त्या साधूला या प्रश्‍नाचे उत्तर विचारले. तो साधू म्हणाला, तू एक प्रदेश जिंकलास, उद्या दुसरा प्रदेश जिंकशील. असे करून तू जग जिंकल्याचा स्वाभिमान मिरवत असशील. पण तू स्वतःला जिंकू शकलास का? स्वतः कोण आहेस याचा विचार कधी केला आहेस का? अरे, तू केवळ एक आत्मा आहेस. या तुझ्या देहात हा आत्मा आला आहे. तोच आत्मा माझ्याही देहात आहे. सर्व प्राणीमात्रामध्ये तो आत्मा आहे. सर्व चराचरामध्ये त्याचे वास्तव्य आहे. तो देहात येतो आणि जातो. पण तो अमर आहे. त्याला मृत्यू नाही. त्याला जन्मही नाही. तो नाशवंत नाही. अविनाशी आहे. तो आत्मा तू आहेस. हे तू जाणण्याचा प्रयत्न कर. हे जाणणे हाच तुझा खरा धर्म आहे. हा तुझा स्वतःचा धर्म आहे. हे जेव्हा तुला समजेल तेव्हा तू स्वतः अमर होशील. तेव्हा तू खरे जग जिंकले असे समज. ज्याने स्वतःवर जय मिळविला, त्याने सर्व जगावर विजय मिळवला. मी आत्मा आहे, हे जाणणे हाच प्रत्येकाचा धर्म आहे. तोच स्वधर्म आहे.

Tuesday, March 5, 2013

कर्नाटकचा कृषी अर्थसंकल्प एक आदर्श


कर्नाटक सरकारने यंदा तिसरा कृषी अर्थसंकल्प आठ फेब्रुवारीस सादर केला. विशेष म्हणजे तीनही कृषी अर्थसंकल्प वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी सादर केले. कृषी अर्थसंकल्प 2011-12 चा पहिला अर्थसंकल्प तत्कालिन मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी सादर केला. तर दुसरा कृषी अर्थसंकल्प 2012-13 तत्कालिन मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केला. यंदा कर्नाटकचे मुख्यमंत्री जयदिश शेट्टर यांनी 2013-14 साठीचा कृषी अर्थसंकल्प सादर केला. वेगवेगळ्या व्यक्तिंनी कृषी अर्थसंकल्प सादर केले असले तरीही तीनही कृषी अर्थसंकल्पात एक वाक्‍यता दिसून येते. सेंद्रीय शेतीला प्राधान्य, शेतीसाठी मोफत वीजपुरवठा, सिंचनासाठीच्या विविध योजनांवर तरतूदी, बियाणे विकासासाठी योजना, खतांसाठी विशेष तरतूदी यामध्ये पाहायला मिळतात.
यंदाच्या अर्थसंकल्पाचा विचार करता शेतकऱ्यांचे विविध विभागात वर्गीकरण करून त्यानुसार योजना तयार करण्याचा सरकारचा विचार दिसतो. यासाठीच सरकारने शेतकऱ्यांना पासबुके देण्याचा विचार केला आहे. हा एक चांगला विचार आहे. अल्पभुधारक आणि कमाल जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या असतात. कोरडवाहू शेती करणारा शेतकरी आणि बागायती शेती असणारा शेतकरी यामध्येही मोठा फरक असतो. क्षेत्र किती आहे यापेक्षा ते क्षेत्र कसे आहे याला महत्त्व असते. त्यानुसार शेतकऱ्यांना सरकारच्या योजना तयार करण्यासाठी हे पासबुक सरकारला निश्‍चितच मार्गदर्शक ठरणार आहे. सरकारच्या अनुदान वाटपातही हे पासबुका निश्‍चित महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. शेतीसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडत असल्यामुळे सरकारचे लक्ष शेती विकासावर केंद्रीत झाले आहे. शेतकऱ्यांचा विकास डोळ्यासमोर ठेऊन कर्नाटक सरकार निश्‍चित प्रगतीसाधत आहे. हा त्यांचा आदर्श इतर राज्यांसाठी निश्‍चितच मार्गदर्शक ठरणारा आहे.
अर्थसंकल्पात जलसिंचनाच्या योजनांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींचाही समावेश करण्यात आला आहे. दुष्काळी भागासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनासाठीही तरतूद करण्यात आली आहे. यावरून सरकार उद्योगापेक्षा शेतीला पाणी देण्यावर अधिक भर देते हे स्पष्ट होते. सरकार प्रथम शेतीचा विकास करू इच्छित आहे. सिंचनाचे प्रकल्प राबविताना शेतीला पाणी पुरवठा हा उद्देश यातून स्पष्ट होतो.
भुचेतना योजनेतून इक्रिसॅट सारखा संशोधन संस्थांनाही सामावून घेऊन शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती व उत्पादकता वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले आहेत. 2012-13 चा या योजनेचा आढावा घेतला तर 16 पिकांचे उत्पादन 21 टक्‍क्‍यांवरून 43 टक्‍क्‍यांपर्यत वाढविता आले आहे. या योजनेचा फायदा विचारात घेऊन हे कर्नाटक मॉडेल महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश राज्यानेही अमलात आणले आहे.

कृषी अर्थसंकल्पामध्ये कृषी, उद्यानविद्या, सेंद्रीय शेती, जैव इंधन, मधुमक्षिका पालन, रेशीम शेती, मत्स्य शेती यांचा समावेश आहे. या विभागाच्या विकासासाठी विशेष योजना व तरतुदी यामध्ये करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची संकल्पना निश्‍चितच शेतीच्या विकासास प्राधान्य देणारी आहे. कोणत्या घटकावर किती निधी खर्च होतोय. हे यातून स्पष्ट होते. यातून शेती विकास कसा साधला जाणार हेही स्पष्ट होते. कोणते क्षेत्र वाढत आहे. कोणते घटत आहे. यावरही प्रकाश टाकला जात असल्याने एकंदरीत शेतीच्या विकासास यातून निश्‍चितच चालना मिळणार आहे. सध्या केंद्रीय स्तरावरही शेतीसाठी वेगळ्या अर्थसंकल्पाचा विचार केला जात आहे. आजही जर देशात 60 टक्‍क्‍याहून अधिक जनता ही शेती व शेतीशी निगडीत व्यवसायावर अवलंबून असेल तर निश्‍चितच शेतीसाठी वेगळा अर्थसंकल्प असण्याची गरज भासते. अशा वेळी या घटकाच्या बारीकसारीक गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी वेगळ्या अर्थसंकल्पाची गरज आहे. देशातील शेतीचा विकासा साधायचा असेल तर यासाठी वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची निश्‍चितच गरज वाटते.


यंदाच्या कृषी अर्थसंकल्पातील काही महत्त्वपूर्ण तरतूदी आणि निर्णय ः

1. अमृतभूमी योजना
सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य आहे. प्रत्येक तालुक्‍यात सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गट या राज्याने तयार केला आहे. यामाध्यमातून 1 लाख 10 हजार शेतकरी 4 लाख 46 हजार एकरवर सेंद्रीय शेती करत आहेत. या शेतकऱ्यांना कर्नाटक सरकारने 100 कोटींचे अनुदानाची तरतूद केली आहे. त्यातील 2012-13 यावर्षात 58 ,571 शेतकऱ्यांनी या अनुदानाचा लाभ घेतला आहे. या योजनेस आता अमृतभुमी योजना असे नाव देण्यात आले आहे आणि या योजनेची जबाबदारी उद्यानविद्याशाखकडे हस्तांतरीत केली आहे.

2. शेतकऱ्यांना पास बुक
शेतकऱ्याकडे असणारी जमीन, त्याचा पट्टा, तो कोणत्या गटात मोडतो म्हणजे तो कोरडवाहू शेती करतो की बागायतादार आहे, सेंद्रीय शेती करतो की अन्य शेती असे विविध गट, कोणत्या सुविधांसाठी तो पात्र आहे याची माहिती सांगणारे एक पासबुक कर्नाटक सरकार सर्व शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांच्या या नोंदीमुळे विविध योजना राबविता येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत असे सरकारला वाटते. या पासबुकच्या माध्यमातून शेतकऱ्याला सर्व आवश्‍यक माहिती देण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी सरकारने 15 कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे.

3. एक खिडकी योजना
कृषी विभागात तज्ञांची कमतरता भासते. यामुळे ज्ञान विस्ताराचे कार्य योग्य प्रकारे होत नाही. आवश्‍यक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने विचारात घेऊन सरकारने एक खिडकी योजनेच्या माध्यमातून तज्ञ संस्थांच्या सहकार्याने हे सर्व नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग तुमकुर, चिक्कमंगलूर, बिजापूर आणि रायचूर या जिल्ह्यात खरीप हंगामात प्रथम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर रब्बी हंगामात हा प्रकल्प 12 जिल्ह्यात राबविण्यात येईल त्यानंतर 2014-15 पासून कर्नाटकातील सर्व राज्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यासाठी 75 कोटी रुपयांची तरतूद सरकारने या अर्थ संकल्पात केली आहे.

4. भू चेतना योजना
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, शेती उत्पादनात वाढ व्हावी. यासाठी इक्रीसॅटच्या सहकार्याने भू चेतना योजना सुरू केली आहे. कोरडवाहू पिकांची उत्पादकता 20 टक्‍क्‍यांनी वाढविण्याचे उद्दिष्ठ यासाठी निश्‍तित केले आहे. या योजनेसाठी 75 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली आहे. यंदा ही योजना 168 लाख एकरावर राज्यात राबविण्यात येणार असून यामध्ये 144 लाख एकर कोरडवाहू आणि 24 लाख एकर सिंचनाखालील क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.

5. सौर उर्जा पंप
राज्यात 18 लाख कृषी पंप आहेत. यासाठी वाढता विद्युत पुरवठा विचारात घेता कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना सौर उर्जा पंप देण्याची योजना हाती घेतली आहे. यासाठी सरकारने चार महसूल जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यात ही योजना राबविण्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

6. शेतीसाठी मोफत वीजपुरवठा
सिंचनासाठी आवश्‍यक दहा एचपीच्या विद्युतपंपासाठी मोफत वीज पुरवठा सरकारकडून केला जातो. ही योजना गेली तीन वर्षे कर्नाटक सरकार राज्यामध्ये वापरत आहे. यासाठी सरकारने गेल्या वर्षी 17 लाख कृषीपंपासाठी 4600 हजार कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली होती यंदाही सरकार ही योजना राबविणार असून यासाठी 5250 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली आहे.

7. हळद आणि बेदाणे मार्केट
सध्या कर्नाटकात हळद आणि बेदाणे मार्केट अस्थित्वात नाही. मुख्यतः महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बाजारावरच यासाठी अवलंबून राहावे लागते. ही अवलंबिता दूर व्हावी यासाठी सरकारने अथणी तालुक्‍यातील कागवाड येथे हळद आणि बेदाणे मार्केट सुरू करण्याचा सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी तज्ज्ञांच्या सहकार्याने आवश्‍यक त्या विकास योजना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.


अर्थसंकल्पात वाढीव तरतूद
पहिला कृषी अर्थसंकल्प 2011-12 17,857 कोटींची तरतूद
दुसरा कृषी अर्थसंकल्प 2012-13 19,660 कोटींची तरतूद
तिसरा कृषी अर्थसंकल्प 2013-14 22,310 कोटींची तरतूद

Saturday, March 2, 2013

नियम

तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें ।
दुरी केंही न वचावें । तीर्थांसी गा ।।

एक मंदीर होते. सुंदर होते. परिसरही निसर्गरम्य होता. पण गावाच्या मध्यभागी असूनही या मंदीरात फारसे कोणी जाता येताना दिसत नव्हते. मला मंदीर आवडले म्हणून मी तेथे नेहमी जाऊ लागलो. तेथे साधना करायचो. पण इतका चांगला परिसर असूनही येथे कोणीच का येत नाही? हा प्रश्‍न मात्र मला नेहमीच विचलीत करायचा. लोकांच्या आवडी निवडी बदलल्या आहेत का? की लोकांना आजकाल अशा नयनरम्य, शांत परिसरातही जायला वेळ नाही? असे अनेक प्रश्‍न मला पडू लागले. उत्तर मात्र सापडत नव्हते. मी मंदीरात नेहमीप्रमाणे साधनेला बसलो होतो. अचानक माझा मोबाईल वाजला. त्यावेळी मंदीरात माझ्या व्यतिरिक्त एक-दोन व्यक्ति असतील. मी फोन वर बोलू लागलो. लगेच मंदीरातील पुजारी, मंदीरामध्ये इतर कामकाज पाहणाऱ्या व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी मला मोबाईल ताबडतोब बंद करण्यास सांगितला. त्यांनी माझ्याशी वाद घालण्यास सुरवात केली. तुम्हाला लिहीलेले वाचता येत नाही का? मंदीर आवारात मोबाईलवर बोलण्यास बंदी आहे. असे खडे बोल सुरू झाले. त्यांची उद्धट भाषा पाहून मलाही राहावले नाही. मीही बोलण्यास सुरवात केली. कारण त्या मंदीरात मी रोजच जात होतो. ध्यान मंदीराची जागा स्वतंत्र आहे. तेथे मोबाईलवर बोलू नये, हे मलाही समजते. पण मंदीर आवारात बोलले, तर काहीच फरक पडत नाहीत. तसे मंदीरात कोणी नव्हतेही? अशावेळी माझ्या बोलण्याचा कोणाला त्रास होणार, हेच मला समजत नव्हते. मी रोज मंदीरात साधनेला बसतो तेव्हा, तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांशी गप्पा मारत बसतात. याचा त्रास रोजच होतो. पण ते चालते. माझे बोलणे चालत नाही. यानंतर मी लगेच तेथून उठलो, बाहेर आलो. माझ्याशी देव बोलला. गावाच्या भर वस्तीत असणाऱ्या या मंदीरात कोणीच का येत नाही? हाच तुझा प्रश्‍न होता ना? मिळाले का उत्तर. नुसता निसर्गरम्य परिसर असून चालत नाही. तेथील वातावरणही रम्य असावे लागते. यासाठी त्या मंदीरात काम करणाऱ्या व्यक्ती, पुजारी हेही तसेच सुभाषिक असायला हवेत. तरच तेथे लोक रमतात. अन्यथा सर्व सुविधा असूनही कोणीच तेथे फिरकत नाही. कारण प्रत्येकाला मनशांती हवी असते. यासाठी प्रत्येकजण तेथे येत असतो. असा फुकटचा वाद घालायला कोणी येत नाही? त्यापेक्षा तेथे जाणे लोक पसंत करत नाहीत. नियम असावेत पण त्याची अमंलबजावणी योग्यवेळी, योग्यप्रकारे व्हायला हवी. मोबाईल बोलण्यास बंदी आहे. तेव्हा मंदीरातील पुजाऱ्याला गप्पा मारत बसण्यास बंदी का नाही? यासाठीच नियम कोणते असावेत यावरही सर्व अवलंबून आहे. निसर्गरम्य परिसर मनाला मोहित करतो, पण तेथे प्रेम नसेल, तेथे भेटणारे वाद घालणारे असतील, तर तेथे देव सुद्धा नांदत नाही. मग तेथे भक्तही राहात नाहीत. यामुळेच तेथे कोणी जात नाही.

संशय

म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियांसी ।।


संशयामुळे मनाची स्थिरता विचलित होते. घरात शांती नांदायची असेल. दोघांचा संसार चागला चालावा असे वाटत असेल तर संशयास थारा देता कामा नये. काही नसले तरी मनात संशयाची पाल चुकचुकतेच. पण याकडे दुर्लक्ष करून त्यावर मात करता येते. घरातच आपण अनेक गोष्टीवर संशय व्यक्त करतो. याचा आपल्या जीवनावरही परिणाम होतो. खिशातले पैसे कमी झाले असे वाटले की लगेच, जोडीदाराने खिशातील पैसे हळूच काढून घेतले आहेत का? असा अनेकदा संशय व्यक्त केला जातो. त्यातून चिडचिड होते. दोघांमध्ये कडाक्‍याचे भांडणही होते. नंतर आठवते की पैसे वेगळ्याच गोष्टीवर खर्च केले होते. मग काय माफीनामा. पण मन तेही करायला तयार होत नाही. चूक मान्य करण्यात आपणास लाज वाटते. कमीपणा वाटतो. पण अशाने नाते संबंध ताणत जातात. याचा विचारला करायला नको का? काही वेळेला तर अशाने घटस्फोटापर्यंत प्रकरणे जातात. संशयामुळे इतकी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. संशयच व्यक्त केला नाही तर, हा प्रसंग उद्‌भवणारही नाही. पोलिसांची वृत्ती ही संशयी असते. प्रत्येक गोष्टीकडे ते याच दृष्टीने पाहतात. एखाद्याने चोरी केलेली नसली, तरी त्याला संशयाने पकडून बेधम मारहाण करून त्याला चोरी केली असल्याचा जबाबही नोंदवितात. संशयामुळे अशा चुका अनेकदा घडतात. खून न केलेल्या व्यक्तीसही तुरुंगवास भोगावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. संशयाने शिक्षा कधी दिली जाऊ नये. नंतर पश्‍चात्ताप करावा लागतो. गुन्हा न करणारी व्यक्तीही नंतर मोठा गुन्हा करू शकते. संशयावर मात करायची असेल तर, सत्य जाणून घ्यायला हवे. सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. पैसे जोडीदाराने घेतल्याचा संशय घेण्याऐवजी आपण कोठे खर्च केलेत का? कोठे ठेवले होते? कोठे पडले का? याचा विचार प्रथम करायला हवा. पण तसे होत नाही. संशय घेऊन आपण स्वतःच स्वतःला त्रास करून घेतो. यामुळे आपले मानसिक संतुलन ढासळते. याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. मानसिक विचारांमुळे आपल्या शरीरात विविध रसायने उत्पन्न होत असतात. पीत्त म्हणजे हे रसायनच आहे. रागामुळे पीत्त उसळते. यासाठी मानसिक संतुलन ठेवणे खूप गरजेचे आहे. शांत मनामुळे शरीरास आवश्‍यक रसायनांचीच निर्मिती होते. साधनेमुळे मनातील राग नियंत्रित करता येतो. साहजिकच जहाल, शरीराला मारक ठरणाऱ्या अशा रसायनांची निर्मिती यामुळे कमी होते. याचा परिणाम शरीरावर निश्‍चितच दिसून येतो. शांत माणसांना आजारही कमी होतात. यासाठीच संशयाने मनास पिडा देणे योग्य नाही.