Tuesday, November 15, 2011

चौथी भक्ती

तैसा मी एकवांचूनी कांही । तया तयाही सकट नाहीं ।
हे चौथी भक्ती पाहीं । माझी तो लाहे ।।

नव्या पिढीला सतत नामस्मरण, चोविस तास माळांचा जप या गोष्टी न आवडणाऱ्या आहेत. याची टिंगळ टवाळी या पिढीकडून होत आहे. हे खरे आहे की मनाने नमस्कार केला तरी तो देवापर्यंत पोहोचतो. यासाठी देवळात जाण्याचीही गरज नाही. नुसते स्मरण ही सुद्धा देवाची भक्ती आहे. चांगल्या विचारांचा आचार ठेवला तरी त्याला देवत्व प्राप्त होते. वाल्हाने "मरा',"मरा'... असा जप केला तरी त्याच्यावर राम प्रसन्न झाला. पापांचा डोंगर उभा करूनही देव त्यांच्याच पाठीशी आहे. ही कसली भक्ती? देव दुष्टांच्या जरूर पाठीशी असतो. पण त्याचा उद्देश त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा असतो. म्हणूनच वाल्हाचा वाल्मिकी झाला. दुष्टांना मृत्यूदंड ही शिक्षा नाही. यामुळे दुष्ट नष्ट होतात दुष्टत्व संपत नाही. दुष्टत्व हे मनात असते. देव या दुष्टांची मने बदलू इच्छित आहे. मन परिवर्तन हा देवाचा मुख्य उद्देश आहे. दुष्टांच्यातील दुष्टत्व नष्ट करणे. त्याला सदाचारी बनवणे. त्या वाटेवर तो पुन्हा फिरकणार नाही, असा बदल त्याच्यात घडवतो. सद्‌गुरुही हेच करत असतात. दुष्टांचे मन परिवर्तन झाले, तरच खऱ्या अर्थाने शांती नांदेल. मृत्यूदंडाच्या शिक्षेने एक दुष्ट मारला जाईल. दोन दुष्ट तुम्ही मारू शकाल. असे किती दुष्ट तुम्ही मारत बसणार. दररोज तोच उद्योग करावा लागेल. यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी लागेल. त्यावर मोठा खर्चही होईल. हा खर्च वाढतच जाईल. कारण एकाला मारले की, उद्या तिथे दुसरा कोणीतरी निर्माण होतो. हे न संपणारे चक्र आहे. त्या ऐवजी दुष्ट विचारच नष्ट करणे अधिक सोयीस्कर आहे. सद्‌गुरू तेच करतात. भक्तांच्या मनात सद्विचारांची बीजे पेरतात. त्याला अंकुर फुटतोच. दुष्टांमध्येही सद्विचारांचा अंकूर फुटतो. मन परिवर्तन होते. यातूनच तो भक्त देवत्वाला पोहोचतो. यासाठी केलेली पापे विसरा आणि आता सद्विचारांचा मार्ग धरा. देव तुमच्याच पाठीशी आहे. तुमच्यातही देवत्त्व जागृत होऊ शकते.


राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

No comments:

Post a Comment