Sunday, November 6, 2011

कुंडलिनी जागृती

कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकासूनि ।
आधारादि भेदूनि । आज्ञावरी ।।

आजकाल कोणत्याही गोष्टीत प्रथम फायदा-तोटा पाहिला जातो. गोष्ट फायद्याची असेल, तर तिचा स्वीकार पटकन केला जातो. यासाठी अध्यात्माचा नेमका फायदा काय आहे. याबाबत सध्याच्या युगात जागृती करण्याची गरज आहे. पण याचा फायदा मिळायला अनेक वर्षे लागतात. यासाठी तसा त्यागही करावा लागतो. गुरुकृपा झाली तर मात्र पटकन लाभ होतो. पण यासाठी साधना करावी लागते. नित्य साधनेने आत्मज्ञान प्राप्ती सहज शक्‍य आहे. ध्यान, साधना याचे फायदे काय आहेत यासाठीच प्रथम जाणून घेण्याची गरज आहे. फायद्याच्या गोष्टी दिसल्यातर नव्या पिढीला अध्यात्माची गोडी निश्‍चितच लागेल. ध्यानाने मन स्थिर होते. मनातील दुष्ट विचार नाहीसे होतात. त्यावर नियंत्रण बसते. ध्यानधारणेच्या प्रक्रियेत कुंडलिनी जागृतीला महत्त्व आहे. सतत नामस्मरणाने, भक्तीने कुंडलिनी सहज जागृत होते. सद्‌गुरुंनी दिलेल्या मंत्राची नित्य साधना केल्यास गुरूकृपा होऊन कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी जागृतीस शास्त्रीय आधार आहे. विज्ञानाच्या युगातील पिढीने हे शास्त्र जाणून घेण्याची गरज आहे. अध्यात्म हे विज्ञानावर आधारित आहे. येथे चमत्कार, जादू यांना थारा नाही. चमत्कार, जादू ही फसवणूक आहे. जे चमत्कार करून दाखवतात. जादू करून दाखवतात. ते स्वतःला व इतरांनाही फसवत असतात. यासाठी कुंडलिनी जागृतीचे शास्त्र अभ्यासने गरजेचे आहे. शरीरातील शक्ती केंद्रे, जाणून घ्यावीत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूरी चक्र, ह्रद्‌यचक्र, विशुद्ध चक्र, तालुचक्र, आज्ञाचक्र ( तेजचक्र), ललाटचक्र, सहस्त्राधारचक्र आदी चक्रांची माहिती करून घेणे गरजेचे आहे. कुंडलिनी नावाची तेजःशक्ती- निजाशक्ती जेव्हा त्यांच्या दोषांचा नाश करते तेव्हा मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होण्यास प्रतिबंधक असलेली कारणे नष्ट होऊन त्याला सुक्ष्म व शुद्ध बोधव्य लाभते.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

No comments:

Post a Comment