Thursday, November 10, 2011

शांती

ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा ।
तैं ब्रह्म होआवयाजोगा । होय तो पुरूष ।।

देशात शांती नांदली, तर विकासाला निश्‍चितच प्रोत्साहन मिळते. घरात शांती असेल, तर घरातील वातावरण प्रसन्न राहाते. समाधानामुळे प्रगती होते. घरात भरभराट होते. यासाठी मन समाधानी असायला हवे. समाधानानेच शांती येते. लोभ, क्रोध, माया, मोह आदींमुळे शांती लोप पावते. शांतीचा विनाश होतो. यासाठी यावर नियंत्रण ठेवायला हवे. पण ते जमत नाही. सध्याच्या चंगळवादी युगात तर हे आता अशक्‍यच वाटत आहे. प्रत्येकजण लोभी होताना दिसत आहे. स्पर्धेमुळे एकमेकाचे ऊनुदुणे काढण्यातच समाधान मानले जात आहे. अशानेच शांती लोप पावत आहे. एकमेकामध्ये दुरावा वाढत आहे. यासाठी विचारसरणीच बदलायला हवी. माणसांना बदलता येत नाही. यासाठी आपणच आपल्या प्रगतीसाठी आपल्या विचारात बदल करायला हवा. चांगल्या गोष्टींचा मोह करायला हवा. लोभ करायला हवा. अशाने चांगले विचार आपोआपच मनात उत्पन्न होतील. आपोआपच सत्कर्म घडेल. चांगल्या विचारांची सवय मनाला लावायला हवी. दुष्ट विचार करून स्वतःला व साहजिकच आसपासच्या सर्वांना त्रस्त करण्याऐवजी चांगल्या विचाराने इतरांची मने जिंकायला हवीत. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाच्या आवडी निवडीही वेगळ्या असतात. काळ वेळेनुसार आवडही बदलते. घरातच पाहीले तर आईला दोडका आवडतो. तर वडीलांना वांगे आवडते. भावाला कारले आवडते तर बायकोला मेथी आवडते. स्वतःची आवड याहून वेगळी असते. आवडनिवड सारख्या असणाऱ्या व्यक्तींची मने जुळतात असे म्हणतात. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. हे क्षणीक असते. प्रत्येकाची विचार करण्याचीही पद्धतही वेगळी असते. मोहाने आवड निर्माण होते. वासनेमुळे त्याला प्रोत्साहन मिळते. वासनेने एकत्र आलेली मने भोगापूर्तीच एकत्र असतात. भोगानंतर पुन्हा दुरावा निर्माण होतो. यासाठी वासनेवर नियंत्रण ठेवायला हवे. सद्विचारांनीच दुष्ट विचारावर नियंत्रण ठेवता येते. यासाठी सद्‌ विचारांची सवय मनाला लावायला हवी. यातूनच मनाला प्रसन्न ठेवता येते. समाधानी ठेवता येते. समाधानी मनाने शरीरात शांती नांदते. शरीरात तसा बदल घडतो. आत्मज्ञानप्राप्तीसाठी हा बदल आवश्‍यक आहे. ठराविक स्थिती प्राप्त झाल्यानंतरच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते.


राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

No comments:

Post a Comment