एक शिष्य एक गुरू । हा रुढला साच व्यवहारु ।
तो मत्प्रातिकारु । जाणावया ।।
पहिली गुरू ही आई असते. कितीही थोर व्यक्ती झाली तरी त्याच्या या यशामागे आईचे प्रेम, माया निश्चितच कारणीभूत असते. हे प्रेम, माया त्याला यशाच्या शिखरावर नेण्यास कारणीभूत ठरते. जगात सर्व काही विकत मिळू शकते, अगदी प्रेमही विकत मिळते. पण आईची माया, प्रेम विकत घेता येत नाही. ती नशिबानेच मिळते. असे म्हटलेही जाते की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईच्या कुशीत शांती असते. आनंद असतो. गोडवा असतो. हे ज्याला मिळाले तो निश्चितच तृप्त झाला. आईच्या संस्कारामुळेच तो थोर होतो. आत्मज्ञान प्राप्तीसाठीही आत्मज्ञानी गुरूची गरज असते. आत्मज्ञानी गुरू हे आईसारखेच असतात. तीच गोडी, तेच प्रेम त्यांच्यातून ओसंडून वाहत असते. त्या प्रेमात, त्या गोडीत समरस व्हायला शिकले पाहिजे. त्यामध्ये मनमुराद डुंबायला पाहिजे. आत्मज्ञानी संतांच्या या प्रेमामुळेच त्यांना आईची उपमा दिली गेली आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज यांना "माऊली' असे म्हटले गेले आहे. संतांची समाधी ही संजिवन असते. त्यांच्या सहवासात प्रेम ओसंडून वाहत असते. यामुळेच सातशे वर्षानंतर ही आळंदीत भक्तीचा मळा आजही जोमात फुलतो आहे. या मळ्यात विसावा घ्यायला हवा. त्या कुशीचा अनुभव घ्यायला हवा. माऊली आपल्या मुलाला प्रेमाने समजावते. त्याचे अपराध आपल्या पोटात घेते. त्याच्या चुका सुधारते. संत ही असेच असतात. ते भक्ताचे अपराध पोटात घेतात. त्याला कवटाळतात. त्यांच्या या प्रेमानेच भक्तामध्ये अमुलाग्र बदल घडतो. प्रेमाच्या अनुभूतीने भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. प्रेमाने युद्धही जिंकता येते. यासाठी बोलण्यात गोडवा हवा. वागण्यात गोडवा हवा. आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला ही गोडी लावायला शिकले पाहीजे. प्रेमाचे चार शब्दही दुसऱ्याच्या मनातील राग वितळवू शकतात. दुसऱ्याला आनंद देऊ शकतात. यासाठी वक्तव्यात सुधारणा करायला हवी. तशी सवय आपण आपल्याला लावून घ्यायला हवी. आत्मज्ञानी संतही शिष्याला प्रेमाने शिकवतात. त्याच्यात बदल घडवितात. यासाठी अशा या संतांच्या सहवास राहायला हवे. त्यांना जाणून घ्यायला हवे.
राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406
No comments:
Post a Comment