मग अभिन्ना इया सेवा । चित्ता मियांचि भरेल जेव्हा ।
माझा प्रसादु जाण तेव्हां । संपूर्ण जाहला ।।
प्रत्येकाला प्रसादाची अपेक्षा असतेच. देवदर्शन केल्यानंतर प्रसाद मिळावा, ही अपेक्षा असतेच. सद्गुरूंचे दर्शन घेतल्यानंतर मनात त्यांनी पेढा द्यावा हा विचार येतोच. त्यात गैर असे काहीच नाही. सद्गुरू तर प्रसाद वाटण्यासाठीच असतात. भक्त तृप्त व्हावा अशीच त्यांची इच्छा असते. भक्तांच्या तृप्तीतच त्यांना समाधान वाटत असते. भक्त तृप्त झाला. समाधानी झाला. तरच भक्ताचे मन साधनेत रमेल. त्याची अध्यात्मिक प्रगती होईल. साधनेत मन गुंतण्यासाठी तृप्ती यावी लागतेच. अमाप पैसा मिळाला म्हणजे मन समाधानी होते असे नाही. द्रव्यातून समाधान लाभते असेही नाही. मुळात या वस्तूंची लालसा कधीही सुटत नाही. या वस्तू कितीही मिळाल्यातरी त्यातून समाधान मिळत नाही. कितीही पगार वाढला तरी तो कमीच वाटतो. पैसा कितीही मिळाला, तरी तो पुरतच नाही. मग अशातून मनास समाधान, तृप्ती येतच नाही. संपत्तीची समृद्धता आली, तरी मनास समाधान वाटेल असे नाही. अनेक श्रीमंत लोकांना रात्री झोपताना गोळ्या खाव्या लागतात. तेव्हाच झोप लागते. मग पैसा कसले समाधान देतो. सुख देतो. थोडा विचार केला, तर असे लक्षात येईल की प्रेमाची एक थाप जरी पाठीवर पडली तर त्यातून मनाला निश्चितच समाधान मिळते. आईचा हात पाठीवरून फिरल्यानंतर बाळाला लगेचच झोप लागते. प्रेमामध्ये इतके सामर्थ्य आहे. सद्गुरुंना नमन केल्यानंतर त्यांनी डोक्यावर हात ठेवला, तर शरीरातील सर्व व्याधी दुर होतात. इतका आधार वाटतो. दुःखाचा डोंगर जरी कोसळला असला तरी तो दूर होतो. इतके सामर्थ्य त्यांच्या आशिर्वादात आहे. प्रेमाचा आधार हा सर्वात मोठा आहे. प्रेमाने प्रगती होते. यासाठी इतरांवर प्रेम करत राहावे. असे केल्यास स्वतःलाही समाधान मिळते व इतरांनाही समाधानी केल्याचा आनंद मिळतो. सद्गुरूंचा हाच तर सर्वात मोठा प्रसाद आहे. त्यांच्या सहवासात प्रेम ओसंडून वाहात आहे. त्यात डुंबायला शिकले पाहीजे. त्यांच्या प्रेमाचा सहवास लाभावा. हा त्यांचा प्रसाद मिळावा. याची इच्छा असावी.
राजेंद्र घोरपडे, 9011087406
No comments:
Post a Comment