Monday, January 30, 2012

चाणक्‍य उदयाची गरज

ह्रद्‌या ह्रद्‌य एक जालें । ये ह्रद्‌यींचे तें ह्रद्‌यीं घातले ।
द्वैत न मोडितां केले । आपणा ऐसे अर्जुना ।।

पुर्वीच्या काळी गुरू - शिष्य यांचे नाते कसे होते हे या ओवीतून स्पष्ट होते. आपला शिष्य आपल्यापेक्षा कसा श्रेष्ठ होईल यावर गुरूंचा भर असायचा. त्यांना घडविण्यासाठी वेळप्रसंगी ते मोठा त्यागही करायला मागेपुढे पाहात नसत. शिष्याची प्रगती हेच त्यांचे एकमेव ध्येय असे. या कार्यातच त्यांना समाधान वाटत असे. पूर्वीची शिक्षणपद्धती ही त्यागाची होती. ध्येयाची होती. यामुळेच या संस्कृतीत अनेक थोर विचारवंत घडले. थोर महात्मे हे या मार्गदर्शनामुळेच घडले. शिक्षण पद्धतीतील हा विचार सध्याच्या पिढीतील शिक्षण पद्धतीत दिसत नाही. शिष्याच्या प्रगती हे ध्येय ठेवणारे शिक्षक फारच कमी पाहायला मिळतात. अशानेच शिक्षण क्षेत्राची पिछेहाट होत आहे. त्यागाची भावना हा विचार तर केव्हाच मागे पडला आहे. शिक्षणाच्या नावावर व्यवसाय उभारला जात आहे. या क्षेत्रास बाजारी स्वरूप प्राप्त झाले आहे. पैशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. विचारापेक्षा, गुणवत्तेपेक्षा पैसा श्रेष्ठ झाला आहे. धनाने पदव्या विकतही मिळत आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पदव्या विकण्याचा व्यवहार करणारेच सत्तेत आघाडीवर आहेत. अशा या शिक्षणपद्धतीतून थोर विचारवंत कसे निर्माण होणार? पैशाने तोलला जाणारा शिष्य शेवटी पैशाचाच विचार मांडणार. तोच व्यवहार करणार. सत्ता अशांच्याच हातात असल्याने यात बदल करू पाहणाऱ्यांचे हात कापले जात आहेत. विचारवंतांनी दुसरे मार्ग स्वीकारले आहेत. पर्यायी मार्गाने जाऊन स्वतःचा बचाव ते करत आहेत. अशा परिस्थितीनेच शोषण व्यवस्था उदयाला आली आहे. हे मोडायला हवे असे सर्वसामान्यांना वाटत आहे. पण तसे घडत नाही. हा धुमसता विचार कधीतरी फुटणार यात शंकाच नाही. पण या ज्वालामुखीच्या उद्रेकाला एका विचारावंताची गरज आहे. चाणक्‍यांसारख्या गुरूची आवश्‍यकता वाटत आहे. गुरू शिष्याचे नाते समजणारा विचारवंत तयार व्हायला हवा. अशा गुरूचा उदय झाला तरच या शोषण व्यवस्थेतून देश मुक्त होण्याची धुरस आशा दिसू लागेल. या चाणक्‍याच्या उदयाचीच सध्यातरी प्रतिक्षा करावी लागेल.


राजेंद्र घोरपडे, 9011087406

No comments:

Post a Comment