Monday, November 2, 2020

विश्वरुपातील उग्ररुप (एक तरी ओवी अनुभवावी)

 



चांगल्यामध्ये परावर्तीत करण्याचा प्रयत्न आपण ठेवायला हवा. त्यामुळे आपली आत्मिक शक्ती वाढेल. आपल्यात हा आत्मविश्वास आल्यास आपणामध्ये तो भाव जागृत होईल. हीच देवाची उग्ररुपातून कृपा आहे. अर्जुन देवाला भगवंतपणाची आठवण करून देत आहे. म्हणजेच आपणही आपल्यातील भगवंताच्या सात्विक भावांची आठवण ठेवायला हवी.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल ८९९९७३२६८५

किती  वाढविसी या उग्ररुपा । अंगीचे भगवंतपण आठवीं बापा ।

नाहीं तरि कृपा । मजपुरती पाहीं ।। 443 ।। अध्याय 11 वा


ओवीचा अर्थ - या उग्ररुपाला तूं किती वाढवीत आहेस ? देवा, आपल्या स्वतःच्या अंगी असलेले भगवंतपण ( पालन करण्याचा स्वभाव ) आठव. नाहीतर तसें करण्याचें आपल्या मनांत नसेल तर माझ्यापुरती तरी कृपा कर.


आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग उभे राहात असतात. या प्रसंगांना घाबरून न जाता धैर्याने त्यांना सामोरे जायचे असते. या प्रसंगांनी भितीने थरकाप उडतो. निसर्गाचे उग्ररूप तर नेहमीच आपणाला अनेक आव्हाने उभे करते. पूर, भुकंप, साथीचे आजार, अपघात अशा आपत्तीने जीवन चिंताजनक होते. असे प्रसंग नैसर्गिक असतात. ते कोणी घडवत नाही. निसर्गाचा हा प्रकोप अंगावर शहारे आणतो. निसर्गाच्या या प्रकोपापुढे कोणाचेही चालत नाही. पाण्याची शक्ती, वीजेची शक्ती, वाऱ्याची शक्ती, पृथ्वीच्या पोटातील ज्वालामुखीची शक्ती अशा या शक्तीचे उग्ररुप आपणास देवाची आठवण करून देते. म्हणजे या शक्तीचा कर्ता करविता कोणी आहे असे समजून त्याला आपण शरण जातो. खरचं देव आहे की नाही माहीत नाही. पण ही शक्ती आहे. त्या शक्तीची ओळख आपणास या उग्ररुपातून होतो. त्याची अनुभुती येते. पण आपल्यामध्येही एक शक्ती आहे तिची ओळख आपण करुन घेत नाही. त्या शक्तीची ओळख व्हावी यासाठी ही अनुभुती आहे. असे मानायला काहीच हरकत नाही. भितीने आपण त्या शक्तीला शरण जातो. पण प्रत्यक्षात या सर्वाचे प्रयोजन आपल्यातील अंहकार, गर्व, मोह, माया घालवण्यासाठी आहे. ही अनुभुती आपणास आपल्याला स्वः ची ओळख करून देण्यासाठी आहे. ही शक्ती तुझ्यातही आहे असे भगवंतांचे सांगणे आहे. त्याची जाणीव करून घेण्यासाठी या विश्वरुपाचे दर्शन आहे. देवात जो आत्मा आहे, तोच समस्त मानवात आहे. देव म्हणजे समस्त मानवात असणारा आत्मा आहे. सर्वांमध्ये तो आहे. तो वेगवेगळ्या रुपात आहे. वेगवेगळ्या शक्तीच्या रुपात तो आहे.  या शक्तीचा वापर चांगल्यासाठीही होतो आणि वाईटासाठीही होतो. फक्त आपण तो वापर कशा पद्धतीने करायचा यावर ते अवलंबून आहे. वाऱ्याच्या वेगाने नुकसान होते. पण त्याच वाऱ्यापासून पवनचक्की चालते. वीज निर्मिती करता येते. पाण्याची शक्तीही तशीच आहे. त्यापासूनही वीजेची निर्मिती होते. ही शक्ती एकातून दुसऱ्या प्रकारामध्ये परावर्तीत होते. तसे आपणही आपल्यात असणारी ही शक्ती चांगल्या गोष्टीच्या निर्मितीमध्ये परावर्तीत करायला हवी. जैवविविधतेमध्ये प्रत्येक वनस्पतीचे महत्त्व आहे. मग ती विषारी असो वा बिनविषारी. मृतावस्तूवर जगणारी असो वा जमिनीवर वाढणारी असो. परोपजिवी असो वा स्वयंउर्जीत असो. प्रत्येकाचा काहीना काही फायदा आहे. आयुर्वेदामध्ये प्रत्येक वस्तूत औषधी गुणधर्म आहेत असे म्हटले आहे.  हे जसे आहे तसेच आपल्यातही चांगले गुणधर्म आहेत. म्हणजेच आपण आपल्यातील सात्विक भाव जागृत करायला हवेत. आपल्यात असणारी ही शक्ती आपण सात्विक भावात परावर्तीत करू शकतो. सात्विक विचारातून, आचारातून आपल्यातील अध्यात्मिक विकासास चालना मिळेल. आत्मज्ञानाची प्रचिती येते. भगवंताचे उग्ररुप आपण आध्यात्मिक विकासात परावर्तीत करू शकलो तर आपणास निश्चितच आत्मज्ञानाचा लाभ होईल. याचा अर्थ आपल्या आसपास घडणाऱ्या वाईट घटनातून आपण विचलित न होता. त्यांना चांगल्यामध्ये परावर्तीत करण्याचा प्रयत्न आपण ठेवायला हवा. त्यामुळे आपली आत्मिक शक्ती वाढेल. आपल्यात हा आत्मविश्वास आल्यास आपणामध्ये तो भाव जागृत होईल. हीच देवाची उग्ररुपातून कृपा आहे. अर्जुन देवाला भगवंतपणाची आठवण करून देत आहे. म्हणजेच आपणही आपल्यातील भगवंताच्या सात्विक भावांची आठवण ठेवायला हवी. आपल्यातील भगवंतपण आपण सदैव जागृत ठेवायला हवे. माणसाला भगवंतरुपाची, चांगल्याची प्रचिती आणण्यासाठी विश्वरुपातील उग्ररुपाचे दर्शन आहे. आपल्यातील भगवंत जागा करण्यासाठीच हे सर्व आहे. हे जाणून घेऊन आपण आपली अध्यात्मिक प्रगती साधायला हवी.


No comments:

Post a Comment