Tuesday, May 5, 2020

आतां आणिक ही संप्रदायें । परीमातें नेणती समवायें ।


प्रार्थना कशी करावी. कशाची करावी. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण केलेली प्रार्थना ही एकाच ठिकाणी पोहोचते. कारण तो एकच आहे. सबका मालिक एकच आहे. यासाठी हा धर्म श्रेष्ठ, हा धर्म कनिष्ठ असा भेदभाव करणे व्यर्थ आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

आतां आणिक ही संप्रदायें । परीमातें नेणती समवायें ।
जे अग्नि-इंद्र-सूर्य-सोमाये । म्हणऊनि यजिती ।। 344 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत, ते सर्व समान असणारा जो मी त्या मला जाणत नाहीत तर ते अग्नेय, इंद्राय, सूर्याय आणि सोमाय असे म्हणत यज्ञ करतात. 

कोणताही धर्म असो, कोणताही संप्रदाय असो या सर्वांचा उद्देश एकच आहे. देवाचे दर्शन, भगवंताचे दर्शन, म्हणजेच आत्मज्ञानाचे दर्शन, आत्मज्ञानाचा लाभ यावरच सर्व संप्रदाय, धर्म आधारलेले आहेत. येथे ध्येय एकच आहे फक्त प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे आहेत. पण हे सर्व एकाच ठिकाणी पोहोचतात. नमस्कार कसाही केला, कोणत्याही प्रकारे केला तरी त्याच्याजवळ पोहोचतो. कारण देव एकच आहे. सबका मालिक एक, अल्ला असो वा राम दोघेही एकच आहेत. नाथ संप्रदायातील गुरु शिष्य परंपराही आत्मज्ञान लाभावर आधारलेली आहे. आत्मज्ञान प्राप्ती हाच या विद्यापीठाची पदवी आहे. गुरु त्यांच्या शिष्याला आत्मज्ञानी करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यानंतर गुरु आणि शिष्य दोघेही एकाच पदाला पोहोचतात. दोघेही एकरूप होतात. फक्त इथे गुरु आणि शिष्याची अभ्यासाची पद्धत वेगळी असू शकते. पदवी मिळवायची आहे. मात्र प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असू शकते. कोण सकाळी उठून अभ्यास करतो. कोणी रात्री जागून अभ्यास करतो. कोण पाठांतर करतो तर कोण नुसते वाचन करतो. कोण एकपाठी असतो त्याला एकदा वाचलेकी सर्व लक्षात येते. पुन्हा पुन्हा वाचण्याची त्याला गरज पडत नाही. पण कोणास पाच-पाचदा वाचून त्याचा अर्थ समजतो. प्रत्येकाची आकलन शक्ती वेगळी असते. त्यानुसार त्याची अभ्यासाची पध्दत बदलते. गरुने ज्या पद्धतीने अभ्यास केला त्याच पद्धतीने शिष्याचा अभ्यास असेलच असे नाही. त्या दोघांच्याही पद्धती वेगवगळ्या असू शकतात. त्यानुसार त्या पद्धती रुढ होतात. मग आपणास पद्धत वेगळी म्हणजे ते वेगळे असू वाटू लागतात. त्यानुसार त्यांचे संप्रदायही वेगवेगळे वाटू लागतात. पण त्या दोघांचा देव एकच आहे. दोघांच्या साधनेचा उद्देश एकच आहे. संप्रदाय वेगळे झाले, धर्म वेगळे झाले म्हणजे त्यात फरक दिसू लागतो. पण दोन्हीही धर्म, संप्रदाय आत्मज्ञान प्राप्ती याचा उद्देशावर आधारलेले आहेत. प्रार्थना कशी करावी. कशाची करावी. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण केलेली प्रार्थना ही एकाच ठिकाणी पोहोचते. कारण तो एकच आहे. सबका मालिक एकच आहे. यासाठी हा धर्म श्रेष्ठ, हा धर्म कनिष्ठ असा भेदभाव करणे व्यर्थ आहे. वेगवेगळ्या मार्गामुळे ते वेगळे वाटत असले तरी ते एकच आहेत. हे जो जाणतो तो ध्येय गाठतो. मी कोण आहे. मी आत्मा आहे. हाच दोन्हीचा उद्देश आहे. मग ते ज्ञान कसेही मिळवा. ते मात्र एकच आहे. 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment