Sunday, May 3, 2020

शेतकऱ्यांना तिहीं ऋतूं समान


धोके आहेत म्हणून शेती सोडून नोकरीच्या मागे धावणे योग्य नाही. भावी काळात शेतीला महत्त्व येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेते टिकवून ठेवायला हवीत. पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी म्हणत असत या जगातील सर्व उद्योग संपू शकतील, बंद पडतील पण शेती हा असा व्यवसाय आहे जो कधीही बंद पडणार नाही किंवा तो बंद पडून चालणार नाही.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

तिहीं ऋतूं समान । जैसें कां गगन । 
तैसें एकचि मान । शीतोष्णीं जया ।। 202 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 12 वा 

ओवीचा अर्थ - तिन्ही ऋतूमध्ये आकांश जसें सारखें असतें, त्याप्रमाणें थंड व उष्ण इत्यादिची किंमत ज्याच्याजवळ सारखीच असतें. 

शेतकऱ्याचे जीवन हे कष्टाचे आहे. उन्ह, थंडी, पावसाळा असो त्याला या सर्व परिस्थितीत काम करावे लागते. उन्ह आहे म्हणून नांगरटीचे काम थांबवता येत नाही. पाऊस पडतो म्हणून शेतात चिखल पेरणी करण्याचे टाळता येत नाही. थंडी आहे म्हणून उसाला पाणी देण्याचे टाळता येत नाही. काम करताना ऋतुंचा विचार करून चालत नाही. अशी स्थिती इतर उद्योगात नाही. पाऊस आहे, आज कामावर रजा सांगू. थंडी वाजते आहे, बाहेर पडायला नकोसे वाटते. आजच्या दिवशी घरी बसू. असे म्हणून कामाला दांडी मारता येते. ऑफिसमध्ये सांगितले की काम झाले. व्यापारीही पाऊस आहे. माल आज पाठवायला नको. उद्या पाठवू. त्यातही सूट मिळते. पण शेतीची कामे करताना अशी टंगळामंगळ करता येत नाही. आजचे काम उद्यावर ढकलता येत नाही. वेळ चुकवून चालत नाही. येथे आराम हराम आहे. घात असतानाच पेरणी करावी लागते. पेरणीची योग्य वेळ साधावी लागते. यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याचे सामर्थ्य असावे लागते. शेतकऱ्यासाठी हे तीनही ऋतू सारखेच आहेत. इतके कष्ट घेऊन हाती काहीच मिळत नाही. अशी आजच्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. वर्षभर शेतात उसाचे पीक असते. ग्रामीण भागात चोवीस तास विजेचा पुरवठा होत नाही. वारंवार वीज खंडित केली जाते. अशा काळात रात्री अपरात्री शेताला पाणी देण्याची वेळ येते. रात्रीच्या वेळी शेतात साप असू शकतात. विंचू, किडे असतात. या सर्वांचा धोका पत्करून धाडसाने हे काम करावे लागते. सध्याच्या काळात असे कष्ट करणारे मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे ही कामे स्वतःच करावी लागतात. शाळा कमी शिकला की कर शेती हाच नियम ग्रामीण भागात आहे. पण आता शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागल्याने कमी क्षेत्रात शेतीवर जीवन जगणे कठीण झाले आहे. पेरलेले केव्हा वाया जाईल याचा नेम राहिला नाही. सोयाबीन तीन महिन्यात येते. भरपूर उत्पन्न देते. पण काढणीच्यावेळी पाऊस पडला तर पीक वाया जाण्याचा धोका असतो. पेरल्यानंतर सर्व हाती लागेल याचा नेम आता राहिलेला नाही. उसामध्ये कष्ट आहेत पण पीक वाया जाण्याचा फारसा धोका नाही. यामुळे अनेक शेतकरी उसाकडे वळले आहेत. पण उसाच्या दरासाठी शेतकऱ्यांना आंदोलन उभारावे लागते. तेव्हा कुठे आज शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडू लागले आहेत. पण शेतीत कष्ट आहेत, धोके आहेत म्हणून शेती सोडून नोकरीच्या मागे धावणे योग्य नाही. भावी काळात शेतीला महत्त्व येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेते टिकवून ठेवायला हवीत. पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी म्हणत असत या जगातील सर्व उद्योग संपू शकतील, बंद पडतील पण शेती हा असा व्यवसाय आहे जो कधीही बंद पडणार नाही किंवा तो बंद पडून चालणार नाही. कारण कृषी मुलश्‍च जीवनम. शेती शिवाय जीवन जगणेच अशक्‍य आहे. 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621



No comments:

Post a Comment