Sunday, September 15, 2019

आत्मज्ञानाचे फळ





कोणतीही गोष्ट करायची म्हटले, की त्यासाठी असणारे नियम, हे पाळावेच लागतात. अन्यथा सर्व व्यर्थ जाते. अध्यात्मात प्रगती साधायची असेल तर गुरूंचा शोध घ्यावा लागतो. गुरू हा आत्मज्ञानी असावा लागतो. या देहाच्या क्षेत्रात आत्मज्ञानाचे पीक घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूकडूनच बीजाची (गुरुमंत्राची) पेरणी होणे आवश्‍यक आहे. तरच त्या पिकाला आत्मज्ञानाची फळे येतील.

नातरी विधीचिये वाफे । सत्क्रियाबीज आरोपे ।
तरी जन्मशत मापें । सुखचि मविजे ।। 32 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अथवा विधीची योग्य वाफ साधून जर सत्कर्मरूप बीज पेरले तर शेकडोच्या शेकडो जन्म सुख भोगावे, एवढे अचाट पीक येते.

शेतात कोणती पिके घ्यायची हे शेतकऱ्याला आधी ठरवावे लागते. योग्य वेळी योग्य पिके घेतली तरच भरपूर उत्पादन मिळते. बाजारभावानुसारही पिकांचे नियोजन करावे लागते. तरच नफा मिळतो. पुढील काळातील गरजा ओळखून पिकांची निवड करावी लागते. सध्या शेतीचे स्वरूप बदलले आहे. आधुनिक तंत्राने शेती केली जात आहे. अधिक उत्पादनासाठी नव्या सुधारित जातींची निवड केली जात आहे, पण योग्य जमिनीत योग्य तीच पिके घ्यावी लागतात. वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. हे जे ठरले आहेत त्यानुसारच शेती केली तर ती फायदेशीर ठरते. अन्यथा शेतीत मोठा फटका बसू शकतो. मेहनत करूनही ती व्यर्थ जाते. अध्यात्मातही तसेच आहे. येथेही नियमांचे पालन करावे लागते. कोणतीही गोष्ट करायची म्हटले, की त्यासाठी असणारे नियम, हे पाळावेच लागतात. अन्यथा सर्व व्यर्थ जाते. अध्यात्मात प्रगती साधायची असेल तर गुरूंचा शोध घ्यावा लागतो. गुरू हा आत्मज्ञानी असावा लागतो. या देहाच्या क्षेत्रात आत्मज्ञानाचे पीक घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूकडूनच बीजाची (गुरुमंत्राची) पेरणी होणे आवश्‍यक आहे. तरच त्या पिकाला आत्मज्ञानाची फळे येतील. पेरलेल्या गुरुमंत्राला साधनेचे खतपाणी द्यावे लागते. अहंकार, राग, द्वेष आदी तणे उगवणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. तरच आत्मज्ञानाची फळे चाखायला मिळतील. आत्मज्ञानासाठी आवश्‍यक गोष्टींचा अभ्यास करून त्याची अमंलबजावणी काटेकोरपणे करायला हवी. मुळात हेच होत नसल्याने आत्मज्ञानी होण्यात अडचणी येतात. तेथेपर्यंत पोहोचता येत नाही. आत्मज्ञानाचे फळ मिळवायचे असेल तर, त्या झाडाची योग्य वाढ कशी होईल, खताची मात्रा, पाण्याची मात्रा, तण, किडरोगापासून संरक्षण हे करायलाच हवे. अन्यथा फळे येऊ शकणार नाहीत. योग्य वाढीसाठी काय आवश्‍यक आहे हे ही अभ्यासावे लागेल. अभ्यासानेच आत्मज्ञानाचे फळ मिळवता येऊ शकते. निसर्गाची, गुरूंची कृपा असेल तर, फळ निश्‍चित मिळेल. यासाठी आशावादी राहायला हवे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment