Tuesday, September 17, 2019

देईल गुरुसेवा । इया बुद्धी पांडवा ।


आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरूसेवा हाच सोपा मार्ग आहे. पूर्वीच्या काळी गुरूंच्या घरी राहून गुरूंची सर्व कामे करून त्यांची सेवा केली जात होती. गुरूंच्या घरी राहूनच ज्ञान प्राप्त केले जात होते.

देईल गुरुसेवा । इया बुद्धी पांडवा ।
जन्माचा सांडोवा । टाकित जे ।। 167 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, गुरूसेवेने तें ज्ञान मिळेल, या बुद्धींने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात.

प्रत्येक भक्त आत्मज्ञानी व्हावा, हीच सद्‌गुरूंची इच्छा असते. या दृष्टीने ते सतत भक्तांना मार्गदर्शन करीत असतात. भक्तांच्या साधनेत येणारे अडथळे ते दूर करत असतात. अनेक समस्यांत गुरफटलेल्या भक्ताला ते आत्मज्ञानाची गोडी लावतात. भक्ताचीही तशी दृढ भक्ती असते. अनेक भक्त गुरुकृपेसाठी सतत सद्‌गुरूंची सेवा करत असतात. गुरूंनी दिलेल्या नियमांचे पालन करून दिलेल्या गुरुमंत्राची साधना ते करत असतात. काही भक्त तर यासाठी संसाराचाही त्याग करतात. सतत त्यांना सद्‌गुरू सेवेचाच ध्यास असतो. ते ज्ञान गुरुकृपेने प्राप्त होते, असा त्यांचा दृढ विश्‍वास असतो. यासाठी गुरूसेवेत ते त्यांचा जन्म ओवाळून टाकतात. जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते, बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्य्र नाहीसे करते अशा या आत्मज्ञानाची ओढ त्यांना सतत लागलेली असते. काही जण संसारात राहूनही गुरूसेवा हीच खरी सेवा मानून आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. संसारातील प्रत्येक गोष्ट ही गुरूंच्या कृपेने मिळते, अशी त्यांची धारणा असते. इतकी दृढ श्रद्धा, भक्ती त्यांची गुरूप्रती असते. आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरूसेवा हाच सोपा मार्ग आहे. पूर्वीच्या काळी गुरूंच्या घरी राहून गुरूंची सर्व कामे करून त्यांची सेवा केली जात होती. गुरूंच्या घरी राहूनच ज्ञान प्राप्त केले जात होते. सध्याच्या आधुनिक युगात असे आश्रम आणि असे गुरू फारच क्वचित पाहायला मिळतात. अशी गुरूसेवा आता दुर्मिळ झाली आहे. कारण तसे योग्य आत्मज्ञानी गुरूही भेटणे आवश्‍यक आहे; पण यामुळे नाराज होण्याचे काही कारण नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षणी गुरूंचे स्मरण ठेवणे ही सुद्धा एक प्रकारे सेवाच आहे. कारण चराचरांत गुरूंचे अस्तित्व आहे. त्यांच्या नित्य स्मरणानेही, नित्य भक्तीनेही आत्मज्ञान प्राप्ती होऊ शकते. सद्‌गुरूंचे नित्य स्मरण हीच खरी गुरूसेवा आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment