Tuesday, March 27, 2018

हो मी सायकल वापरतो...



आज काल सायकल वापरतो असे म्हटले तर थोडे आश्‍चर्य वाटण्यासारखे आहे. त्यात रोज ऑफिसला सायकल घेऊन येतो, असे सांगितले तर काय म्हटले जात असेल हे इथे न सांगितलेलेच बरे. पण हो मी रोज ऑफिसला सायकलने जातो. त्यात मला कधी लाज वाटली नाही. कोण काय म्हणेल याची मी कधीही फिकिर केली नाही. मला जे वाटते, माझ्या मनाला जे पटते तो विचार मी मनापासून जोपासतो. तो मी माझा छंदच समजतो. माझ्या मनाला वाटते मी सायकल वापरावी, म्हणून मी रोज सायकलने ऑफिसला जातो. तसे याला कोणी विरोध केल्याचे मला तरी आठवत नाही. तसे टिंगलही कोणी केल्याचे मला आठवत नाही. माझ्या पाठीमागे बोलत असतील, पण ते मला ऐकू येत नाही. त्यामुळे त्यापासून दुःखी होण्याचा काही प्रश्‍नच येत नाही. ऑफिसला सायकल घेऊन आल्याने स्वतःची पत कमी होते असे मला तर कधी वाटले नाही. कदाचित ऑफिसमध्ये याबाबत वेगळा विचार केलाही जातही असेल पण माझ्या निदर्शनास तरी कधी आले नाही. त्यामुळे यावर न बोललेलच बरे..

गेली सात आठ वर्षे रोज सायकल वापरतो. पण आजच हे सांगावे का वाटले असा प्रश्‍न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. कारण ही तसेच आहे. पर्वा रविवारी नेहमीप्रमाणे सकाळी आठच्या सुमारास ऑफिसला निघालो होतो. वाटेत आयटीआय संभाजीनगर दरम्यान एक सद्‌गृहस्थ भेटले. तेही सायकलवर होते. आयटीआयपासून संभाजीनगरकडे येताना थोडी चढण आहे. साहजिकच त्यांच्या व माझ्या सायकलचा वेग थोडा मंदावला. त्यांनी माझ्याकडे आश्‍चर्याने पाहात विचारले, "रोज सायकल चालवता.' मी म्हटले "हो' ही सायकल घेऊन सात-आठ वर्षे होत आली. तेव्हापासून रोज मी सायकल चालवतो.

त्यांना थोडे आश्‍चर्य वाटले. पण मी रोज सायकलने ऑफिसला जातो म्हटल्यावर ते थोडे थांबले व त्यांनीही मला थांबायला सांगितले. मी ही थांबलो. ऑफिसला आणि सायकल म्हटल्यावर कोणालाही आश्‍चर्य वाटणार यात मला फारसं काही वाटले नाही. कारण आत्तापर्यंत हा प्रश्‍न मला कित्येकदा अनेकांनी विचारला आहे. यामुळे मलाही त्यात फारसं काही वाटले नाही. पण त्यांना माझी चौकशी करावी वाटली म्हणून मी ही थांबलो, कारण तेही सायकलवर होते. त्यांनी सांगितले आमचा एक सायकल चालवणाऱ्यांचा गट आहे. आम्ही दर रविवारी एखादे ठिकाण शोधतो व तेथे सायकलने जातो. त्यांनी मलाही या गटात सामिल होण्याचे निमंत्रण दिले. मी ही ते स्वीकारले. पण इतक्‍या वर्षात आत्तापर्यंत असे कोणी भेटले नव्हते. इतक्‍या आत्मियतेने त्यांनी माझी चौकशी केली, याचे मला समाधानही वाटले. म्हणून मला आज हे लिहावेसे वाटले. अशी चौकशी करणारी माणसे फारच थोडी आहेत. त्यात सायकल वापरणाऱ्या माणसांची चौकशी म्हणजे विरळच. पण मला एक समाधान वाटले.

व्यायामासाठी सायकल चालवणारे अनेकजण आहेत. दररोज सकाळी भेटत असतात. त्यामुळे सायकलचे महत्त्व काय आहे, हे मला सांगावेसे वाटत नाही. ज्याची त्याची आवड असते. मला सायकल चालवायला आवडते. तो मला छंद आहे. अगदी लहानपणापासून मला सायकल चालवण्याचा छंद आहे. लहानपणी पाचवी-सहावीला असताना मी सायकल शिकलो. तेव्हा आमच्याकडे सायकल नव्हती. रूकडीमध्ये आम्ही राहायला होतो. तेव्हा सायकली भाड्याने मिळत असत. वीस पैसे अर्धा तास व तीस पैसे तास असा दर होता. आम्ही एक तास सायकल चालवत होतो. लहान सायकली होत्या. त्यावर बसता येत नव्हते. मग नळीच्या खालून दुसऱ्या बाजूच्या पायंडलवर पाय टाकून सायकल पळवत होतो. मागे एकजण धरायला असायचा. वेग वाढला की मागच्याचा हात सुटायचा, तसा आमचा बॅलन्सही सुटायचा. बऱ्याचदा पडायचो. पण सायकल शिकलो. रुकडी ग्रामपंचायतीच्या आवारात मोकळे पटांगण होते. या पटांगणात गोल गोल फेऱ्या मारून सायकल शिकलो. आजही ते दिवस आठवतात. कारण सायकल हे तेव्हाचे प्रिय वाहन होते. गाडी फारशी कोणाकडे नसायची. तेव्हा सायकल हेच लोकप्रिय वाहन होते. दुचाकी असणे हे त्या काळात प्रतिष्ठेचे समजले जायचे.

सायकलचे किस्से खूप सांगता येतील. तसे या विषयावर पुस्तकही होऊ शकते. कधी वेळ मिळालच तर नक्कीत हे पुस्तक लिहता येईल. एकदा तर मी कोल्हापूरातील साळोखेनगरमधून रूकडीला सायकलवरून गेलो होतो. त्यावेळी सर्वानीच आश्‍चर्य व्यक्त केले होते. जवळपास 20 किलोमीटरचे हे अंतर पण सायकलने प्रवास. घरात समल्यावर तर आईचा पाराच चढला होता. कारण वय अवघे पंधरा-सोळा वर्षे होते. इतक्‍या लहान वयात सायकलने प्रवास करणे योग्य वाटत नव्हते. त्याकाळात सायकल हेच एकमेव साधन असल्याने आम्ही बऱ्याचदा शेजारच्या गावात जाताना सायकल वापरत असू.
दिपावली-उन्हाळ्याच्या सुट्टीत सांगवडे येथील नृसिंहाच्या दर्शनाला रूकडीतून सायकलने जाणे हा तर नेहमीचा उपक्रम होता. वाटेत नदी आहे. उन्हाळ्यात नदीत पाणी नसते. त्यामुळे पात्रातून सायकल न्यायला काही अडचण येत नसे आणि पाणी असलेच तरी नदीत नावही असायची. त्यावरून नदी पार करता येणे शक्‍य होत असे. बऱ्याचदा सांगवडे येथील नृसिंहाच्या दर्शनाला सायकलने जाण्याचा योग आला. कधी रूईच्या धरणावरून तर कधी चिंचवडमार्गे नावेतून किंवा पंचगंगा नदीवरील रेल्वेपुलावरून सायकल घेऊ गेलो. रेल्वे पुलावरून एका पतऱ्यावरून चालत जावे लागते. तो अनुभव खूपच रोमांच आणणारा आहे. खाली पाहीले तर खोल पाणी, आजूबाजूला पाहीले तर हिरवेगार रान. पण नजर फिरवायचेही धाडस व्हायचे नाही. पाय थरथरत कसाबसा पुल पार करायचा. त्यात रेल्वे येण्याचीही भीती असते. असे लहानपणीचे सायकलचे किस्से सांगता येण्यासारखे आहेत. पण त्याकाळात सायकल व्यतिरिक्त अन्य साधन फारसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे सायकल हाच प्राधान्यक्रम होता.
आता काळ बदलला आहे. अहो दुचाकी काय आता चार चाकीशिवाय ऑफिसला जाता असे सांगणे म्हणजे स्वतःची अब्रु घालवून घेण्यासारखे आहे. पण पर्यावरणाचाही विचार आता करण्याची गरज आहे. आपण गाड्या वापरतो. किती प्रदुषण करतो. याचा कधी विचार केला नसेलही, पण पर्यावरण संवर्धनासाठी आज त्याची गरज आहे. यासाठी गाडीचा वापर किती करायचा, कधी करायचा याचा ज्याचा त्याने विचार करायला हवा. केवळ प्रतिष्ठेपोटी गाडी वापरणे हे काही शहाणपणाचे लक्षण आहे. असे मला कदापी वाटत नाही. पर्यावरणाच्या नुसत्या गप्पा मारणे वेगळे, पण पर्यावरण संवर्धनाचा वसा घेऊन प्रदुषण कसे कमी करता येईल, याचा जास्तीत जास्त विचार स्वतःपासूनच करायला हवा. इतरांना पटो न पटो पण आपण सायकल चालवून प्रदुषण कमी करू शकतो. यासाठी सायकल वापरण्यास प्राधान्य द्या, असे मला मनापासून सांगावेसे वाटते. कसली आली चंगळवादाची प्रतिष्ठा. सायकल चालवणे हेच खरे प्रतिष्ठेचे लक्षण आहे. पृथ्वीच्या संवर्धनासाठी आज त्याची गरज आहे. वाढत्या तापमानावर आता सायकल चालवणे हाच उपाय ठरू शकतो. एक दिवस सायकलने प्रवास करून बघा, तुम्हाला रोज सायकल चालवावी असे वाटेल. हा प्रयोग करून तरी पाहा. केवळ सायकल डे चे निमित्त नको किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी सायकल चालवणे नको, सायकल चालवण्याचा आनंद मनापासून घ्यायला हवा. तो आनंद आपल्यामध्ये साठवायला हवा. त्यातूनच मनाला खरे समाधान मिळू शकेल.

आज मला काही सायकल चालवणारे सवंगडी भेटले आहेत. तुम्हालाही असे सवंगडी भेटतील. आज मी ताठ मानेने सांगू शकतो. मी एकटा नाही. सायकलने चालवणारा आता गट मला भेटला आहे. गेली सातवर्षे सायकल चालवून पेट्रोलची बचत केल्याचे समाधान काही वेगळेच आहे. पर्यावरण संवर्धनाचा, प्रदुषण मुक्तीचा केलेला हा खटाटोपही मनाला मोठे समाधान देणारा आहे. सायकल चालवल्याने आरोग्य आपोआप सांभाळले जाते. न कळत व्यायाम होतो. कसरत होते, पण यापेक्षा मनाला मोठे समाधान मिळते. म्हणूनच मी सांगेन मोटार गाड्या सोडा आणि आता सायकल चालवा..हो मी सायकल वापरतो असे ताठ मानेने सांगा...

No comments:

Post a Comment