Thursday, February 23, 2017

कृषी पंढरी - व्हिजन 2050

वाढती लोकसंख्या आणि बदलते जागतिक हवामान यामुळे पुढील काळातील शेतीचा आढावा कृषी संशोधकांना नेहमीच घ्यावा लागतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेने व्हिजन 2050 पर्यंतचा आढावा घेत शेतीतील आव्हाने आणि संधी याचा शोध घेतला आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार शेतीचे उत्पादन वाढविणे ही काळाची गरज असते. तसेच बदलत्या जागतिक हवामानाचा परिणाम शेतीवर होतो, याचाही विचार मांडणे गरजेचे असते. त्यानुसार संशोधनाच्या पद्धतीही विकसित कराव्या लागतात. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1.2246 अब्ज इतकी आहे. 2050 पर्यंत ही लोकसंख्या 24 टक्‍क्‍यांनी वाढेल म्हणजे ती 1.650 अब्ज इतकी असेल. सध्या 31 टक्के जनता शहरात राहते. 2050 पर्यंत हे प्रमाण 55 टक्के इतके होईल. यामुळे पुढील काळात शेतीसमोर अन्नसुरक्षा, अन्नधान्य उत्पादनवाढ, बदलते तपमान, जमिनीचा पोत टिकवणे, जमिनीचे पडणारे तुकडे, पाण्याची टंचाई आणि पाण्याची गुणवत्ता, जैवविविधता, कीड-रोगांचा प्रादुर्भाव ही मोठी आव्हाने आहेत. सध्याच्या स्थितीत उत्पादित मालाची साठवणूक व वाहतूक योग्य प्रकारे होत नसल्याने नासाडी होण्याचे प्रमाण अधिक आहे. भावी काळात ही नासाडी रोखण्यावर भर द्यावाच लागेल. त्यासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर करावा लागेल. बदलत्या हवामानाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. भावी काळात देशाच्या उत्तर भागात व द्वीपकल्पावर पाण्याची टंचाई व पाण्याची गुणवत्ता ही समस्या भेडसावणार आहे. समुद्रातील पाण्यात वाढते क्षारांचे प्रमाण आणि नदी-तलावातील पाण्याच्या वाढत्या तापमानाचा परिणाम माशांचे प्रजनन आणि उत्पादनावर होणार आहे. 2050 पर्यंत गहू आणि मक्‍याचे उत्पादन पाच ते दहा टक्‍क्‍यांनी घटणार आहे. जवळपास देशात 60 टक्‍क्‍यावर कोरडवाहू शेती केली जाते, यालाही मोठा फटका बसू शकतो. असे असले तरी हवामानातील बदल नियंत्रणात ठेवण्यासाठी शेती हा एक घटक असल्याने त्यानुसार शेतीमध्ये बदल करण्याचे आव्हान संशोधकांसमोर असणार आहे. वाढत्या हवा व पाणी प्रदूषणामुळे जमिनीची गुणवत्ताही घसरणार आहे. दरवर्षी भारतात 0.8 मे. टन नायट्रोजन, 1.8 मे. टन स्फुरद, 26.3 मे. टन पालाशची घट होते. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उत्पादनात होणारी घट याचेही आव्हान संशोधकांसमोर आहे. भावी काळातील 1498 अब्ज घन मीटर इतकी पाण्याची मागणी राहणार आहे. पण केवळ 1121 अब्ज घन मीटर इतकेच पाणी उपलब्ध आहे. साहजिकच भूजल आणि नदीतील पाण्याचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे आव्हान देशासमोर असणार आहे. जैवविविधता जपली नाही तर उत्पादनावर दूरगामी परिणाम दिसून येणार आहे. केवळ चारच पिकांपासून जगातील 60 टक्के अन्न पुरवले जाते. पण या पिकांची घसरणारी जनुकीय विविधता ही मोठी धोक्‍याची घंटा आहे. 1900 पासून शेतकऱ्यांच्या शेतीतील जवळपास 75 टक्के पीक विविधता नष्ट झाली आहे. यासह रोग प्रतिकारकक्षमता असणाऱ्या पाळीव देशी जनावरांच्या जातीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या जनावरांच्या जातींचे संवर्धन हा विषय नेहमीच संशोधन परिषदेच्या अजेंड्यावर राहिला आहे. आशिया आणि आफ्रिकेतील गव्हाच्या 80 टक्के जाती हवेतून पसरणाऱ्या नव्या बुरशीला बळी पडत आहेत, असा अहवाल अन्न आणि कृषी संघटनेने दिला आहे; तर जनावरांमध्येही श्‍वसनाचे विकार, एव्हीअन फ्लू यासारखे आजार झपाट्याने वाढत असल्याचे म्हटले आहे. एकंदरीत विचार करता भावी काळात हवामान, पाणी, जमीन आणि जैवविविधता हे शेतीच्या उत्पादनावर परिणाम करणारे घटक कृषी संशोधकांसाठी आव्हान असणार आहेत.

- राजेंद्र घोरपडे 

No comments:

Post a Comment