Sunday, August 7, 2016

साने गुरुजींचे स्वातंत्र्य विचार

सहज साधनाची वेबसाईट चाळताना मला साधनेच्या पहिल्या अंकातील साने गुरुजींचा लेख वाचनात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून एक वर्ष झाल्यानंतर साधना साप्ताहिकाचा जन्म झाला. पहिल्या स्वातंत्र्यदिनीच पहिलाच अंक प्रकाशित केल्यामुळे साहजिकच देशाच्या स्वातंत्र्यावर यामध्ये संपादकीय लेख आहे. साने गुरुजींनी स्वातंत्र्य म्हणजे काय याचा विचार यामध्ये मांडला आहे. पण भारताला स्वातंत्र्य मिळूण सत्तरी गाठली तरी आपण साने गुरुजींच्या विचारातील स्वातंत्र्य आणू शकलो नाही याची खंत वाटते.

स्वातंत्र्य म्हणजे संधी असे साने गुरुजी म्हणतात. विकासाची संधी प्रत्येकाला देण्यात यावी असे त्यांना वाटत होते. प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार द्यायला हवा. पण त्यांचा विचारातील संधी मिळू शकली नाही. सज्जन विचार नांदावेत असे त्यांना मनोमन वाटत होते. पण तसे घडले नाही. स्वातंत्र्य मिळाले फक्त इंग्रजी राजवट गेली आणि स्वकियांची राजवट आली. इतकाच बदल झाला. सत्ता बदलच झाला. फक्त व्यक्ती बदल झाला. असेच म्हणावे लागेल. लाच घेण्याचे प्रकार वाढले. राजकिय नेत्यांची मनमानी वाढली. कायदा सर्वांसाठी सारखा असायला हवा. पण तसे घडले नाही. राजकत्यांच्या अरेरावीने हळूहळू स्वकियांची राजवट परकिय वाटू लागली. साने गुरुजींनी रामराज्याचे स्वप्न पाहिले होते. सध्या देशात सत्तेत असणाऱ्या सरकारनेही रामराज्य आणण्याची स्वप्ने आपणास दाखवली होती. रामाचे राज्य आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरुही असतील. पण ते त्यांच्यासाठीच एक आव्हान उभे राहीले आहे. पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. त्यासाठी प्राणांची आहुती गेली तरी चालेल. विचार कधी मरत नाहीत. तो विचार जोपासणारे कोणी तरी उभे राहतेच. अखेर सत्याचाच विजय होतो. यासाठी लढत राहायला हवे. विचारांची चळवळ कधी संपत नाही. संधी देण्याचा विचार साने गुरुजींनी मांडला. पण संधीसाधूंचेच राज्य येथे आले. सध्या तर चांगल्या व्यक्तींनी राजकारणाची पायरीही चढू नये अशी स्थिती आहे. यावरुन संधी कोणाला मिळाली हे सांगण्याची मला येथे गरज वाटत नाही. पण स्वातंत्र्य म्हणजे संधी हा साने गुरुजींचा विचार लक्षात घेऊन मोदी सरकारने काम केल्यास रामराज्य आणणे शक्‍य आहे.

विकासाच्या संधी देऊन अहिंसक विचारांनी सरकारने काम केल्यास स्वातंत्र्यानंतर पाहिलेली स्वप्ने सत्यात आणणे शक्‍य आहे. सध्या आर्थिक दरी वाढली आहे. गरीब गरीबच होत आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होताना पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती सरकारने विचारात घेऊन पाऊले उचलायला हवीत. वाढती आर्थिक दरी देशासाठी घातक आहे याचा विचार करुन समानता आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी काय करता येईल याचा विचार आता सरकारने करायला हवा. त्यावर चिंतन करायला हवे.
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी असेही साने गुरुजी म्हणतात. सरकारने आर्थिक समानता आणण्यासाठी जबाबदारीने काम करायला हवे. लोकमानस ओळखून कामे करायला हवीत. भाषिक वाद वाढत आहेत. प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते. ती टिकवण्यासाठी त्याची धडपड सुरु असते. हा विचार करुन भाषेचे स्वातंत्र्य त्यांना द्यायला हवे. भाषेतून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलायला हवीत. विशेषतः सीमा भागात हा प्रश्‍न प्रकर्षाने जाणवत आहे. पण जनतेनेही संयम ठेऊन व्यवहार करायला हवेत. उगाच खोटी प्रतिष्ठा बाळगूण दुसऱ्यांना त्रास देणे योग्य होणार नाही. विकासासाठी राज्याचे तुकडे करणेही योग्य नाही. तुकडे केल्याने विकास साधता येईलही पण ते तुकडे एकमेकांशी भांडत राहतात याचाही विचार करायला हवा. एकत्र कुटूंब विभक्त झाले तर प्रत्येकाचा विकास होतो असे वाटते खरे पण विभक्त झाल्यानंतर विकासाच्या स्पर्धेतून वादही होतात. या वादातून नुकसानच अधिक होते याचाही विचार व्हायला हवा. भाऊ भावाचा खून करत आहे. राज्याचे तुकडे केल्यानंतर हे तुकडे एकमेकांशी भांडत राहणार याचाही विचार व्हायला हवा. सीमेचे वाद होतात, इंच इंच जमिनीसाठी वाद होतात. नोकरी, व्यवसायासाठी वाद होतात. लुट, हाणामाऱ्या वाढतात यातून विकास तो काय साधला जाणार हे ही विचारात घ्यायला हवे. यासाठी जबाबदारीने योग्य ती पाऊले उचलायला हवीत.

साने गुरुजींना स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वातंत्र्य म्हणजे उच्छृंखलपणा नव्हे; स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, नैतिक भावना. असे वाटते. पण असा सतविचार घेऊन आपल्या देशातील कोणतेच सरकार आत्तापर्यंत काम करताना दिसले नाही. इतका सज्जनपणा दाखवणेही कोणाला जमले नाही. सज्जनपणाचे ढोंग करुन लुटारुंचे राज्य आपल्या देशात आले. चंगळवादाने देशाला पोखरले. मग याला स्वराज्य कसे म्हणायचे हाच मोठा प्रश्‍न आहे. कायदा कोणासाठी आहे हेच समजत नाही. राजकर्त्ये कायदा हातात घेऊन कामे करत आहेत. अशाने देशात शांती नांदेल असे कधीही शक्‍य नाही. पण स्वराज्यात सुराज्य आणणे शक्‍य आहे. हा विचार ठेऊन कामे केल्यास विषमता दुर करणे शक्‍य आहे. दुरावलेली मनेही जवळ आणणे शक्‍य होणार आहे. हा बदल केवळ समाजच घडवू शकतो. समाज विघातक कृत्ये करणारे एक टक्केही लोक नाहीत. सर्वच राज्यकर्त्ये वाईट आहेत असेही नाही. यासाठी समाजातील दहा टक्के लोकांनी एकत्र येऊन या एक टक्के लोकांना ताब्यात ठेवल्यास देशात रामराज्य आणणे शक्‍य आहे. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. सरकार अशा संस्थांचा आवाज दाबत असेल तर त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही याचाही विचार व्हायला हवा. समाजाने अशांना धडा शिकवण्याची गरज आहे. पण आता कोण आवाज उठवणार. कोण चळवळ उभारणार. हे ही तिककेच महत्त्वाचे आहे. पण चांगल्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काम सुरु केल्यास हे अशक्‍य नाही हे ही तितकेच खरे आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने साने गुरुजींच्या विचारातील स्वातंत्र्य देशात कसे नांदवता येईल याचा आता विचार होण्याची गरज वाटते.

- राजेंद्र घोरपडे 

No comments:

Post a Comment