Saturday, February 25, 2012

ईश्‍वर निष्ठांची मांदियाळी

वर्षत सकळमंगळी । ईश्‍वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ।।

जगामध्ये अनेक जाती, पंथ, धर्म आहेत. प्रत्येकाच्या चालीरिती वेगळ्या आहेत. मंदीराच्या रचनाही वेगवेगळ्या आहेत. एकाच हाताची पाचही बोटे जशी वेगवेगळ्या आकाराची असतात. तसा हा प्रकार आहे. पण सर्वांचे ध्येय एकच आहे. उद्दिष्ट एकच आहे. आत्मज्ञान प्राप्तीचे मार्ग वेगवेगळे असले तरी ते सर्व एकाच माळेचे मणी आहेत. हे वेगवेगळे पंथ एकत्र येणे फारच क्वचित प्रसंगीच पाहायला मिळते. पण वारकरी संप्रदाय याला अपवाद आहे. यामध्ये अनेक थोर संत होऊन गेले. यापुढेही होत राहतील. पण त्यांच्यामध्ये ऐक्‍य आहे. परंपरेचा उद्दिष्ठ महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे सर्व आज एकत्र आहेत. आदिनाथांपासून सुरू झालेल्या या परंपरेत अनेक महान संत झाले. त्यांनी वेगवेगळे पंथ तयार केले. पण हे सर्व संत एकत्र असलेले आपणाला पाहायला मिळते. ईश्‍वर निष्ठांची ही मांदियाळी नेहमी अशीच राहावी. सर्वावर सुखाचा वर्षत करत राहावी. असेच ज्ञानेश्‍वर महाराज सद्‌गुरूंकडे मागत आहेत. सध्या धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण केली जात आहे. धार्मिक विचार दुषित केला जात आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी ही मंडळी धर्मामध्ये दुषण करीत आहेत. त्यांचा हा उद्देश फार काळ टिकणारा नाही. सात्विक विचारांची बैठक भक्कम आहे. या बैठकीत हे दुषण दूर करण्याचे सामर्थ आहे. ईश्‍वराकृपेच्या या सात्विक व्यक्ती एकत्र आल्यातर निश्‍चितच त्यांच्या प्रेमामुळे जगातील दुष्टांचा नाश होईल. दुष्टांच्या मनातील दुष्टपणा दूर जाईल. यासाठी या मंडळीनी नेहमी एकत्र येऊन हा आनंदाचा, आत्मज्ञानाचा वर्षाव सतत भक्तावर करत राहावे.


राजेंद्र घोरपडे, 9011087406

No comments:

Post a Comment