Friday, February 3, 2012

व्यक्तीमत्व विकास

म्हणौनि श्रवणें पापें जाती । आणि धर्म धरी उन्नती ।
तेणे स्वर्गराज्य संपत्ति । लाहेचि शेखीं ।।

पाप पुण्याची भाषा आता नव्या पिढीला न पटणारी आहे. अशानेच अध्यात्म हे थोथांड आहे असा विचार आता रुढ होत आहे. पण आध्यात्मिक ग्रंथातील शब्दांचा शब्दशा अर्थ लावणे चुकीचे आहे. त्या शब्दाचा भावार्थ समजून घेणे आवश्‍यक आहे. स्वर्ग नरक हा विचार चुकीचा आहे. कारण स्वर्ग आणि नरक हे सर्व काल्पनिक विश्‍व आहे. पण तसे काही नाही. स्वर्ग नरक आहे कोठे असा प्रश्‍न विचारला जाणे स्वाभाविक आहे. विज्ञानाच्या प्रगतीने अंधश्रद्धा कमी होत आहे. पण अध्यात्म हे थोथांड आहे असे म्हणणे मात्र चुकीचे आहे. हे काल्पनिक विश्‍व समजून घ्यायला हवे. त्याचा भावार्थ जाणून घ्यायला हवा. तरच आध्यात्मातील विचार समजू शकतील. यासाठी अध्यात्माचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. ज्ञानेश्‍वरीच्या नुसत्या श्रवनानेही पाप दूर होते. याचा अर्थ मनातील दुष्ट विचार नाहीशे होतात असा आहे. मनात उत्पन्न होणाऱ्या वाईट विचारांना ज्ञानेश्‍वरीच्या श्रवनाने फाटा फुटतो. हे विचार कमी कमी होतात. मनाला सत्कर्माची गोडी लागते. सत्कर्माची ओढ लागते. यातूनच हातून चांगली कामे होतात. चागली कामे करणे हाच तर धर्म आहे. यामध्येच प्रगती होते. मानवधर्माचा विचार मनात नांदतो. पाशवी विचार दूर जातात. नराचा नारायण होतो. त्याच्यात माणूसकी नांदते. या सुधारणेमुळेच अशा मानवामध्ये विकास घडतो. त्याला समाजात मानसन्मान प्राप्त होतो. त्याला सुख-शांती, संपत्तीचा लाभ होतो. हाच स्वर्ग त्याला मिळतो. त्याच्या वागण्यात झालेल्या बदलानेच त्याला हे ऐश्‍वर्य भेटते. यासाठीच ज्ञानेश्‍वरी वाचायला सवड जरी नाही मिळाली, तरी श्रवणाची सवय अवश्‍य लावून घ्यावी. व्यक्तीमत्व विकासासाठी अशा वाचनाची, श्रवणाची आज निश्‍चितच गरज आहे.

राजेंद्र घोरपडे, 9011087406

No comments:

Post a Comment