Friday, May 6, 2011

झोत : बफर स्टॉक खुला करावा

झोत
.......................
बफर स्टॉक खुला करावा

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत खतांचा कार्यक्षम वापर वाढविण्यासाठी प्रत्येक गावात खत वापर, जमीन आरोग्यपत्रिका या संबंधीची माहिती देण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील 12.94 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे महाराष्ट्र दिनाच्या आयोजित कार्यक्रमात राज्यपालांनी सांगितले. नुकतीच खते आणि बियाणेसंदर्भातील राज्याचे खरीप नियोजन जाहीर करण्यात आले. यामध्ये यंदा खते आणि बियाण्यांचा मुबलक साठा असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील मंत्री खताबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असेही जाहीर करतात. हंगाम सुरू होण्याआधी ही स्थिती सर्वत्र असते; पण हंगाम सुरू झाल्यानंतर या सर्व घोषणा हवेत विरतात. खते मात्र शेतकऱ्यांना मिळत नाहीत. ही आजपर्यंतची स्थिती आहे. ही स्थिती कशामुळे उद्‌भवली याचा विचार करण्याची गरज आहे. पूर्वी खतांचा पुरवठा हा सहकारी सोसायट्यांमार्फत होत होता. आता या संस्था बंद अवस्थेत आहेत. यामुळे खरे तर खतांचे नियोजन कोलमडले आहे. सोसायट्यांप्रमाणे कृषी सेवा केंद्रे खतांचे नियोजन करू शकत नाहीत. सेवा केंद्रात लिंकिंगचीही सक्ती केली जाते. याचा विचार व्हायला हवा. सोसायट्यांप्रमाणे आता शासनाने अशी यंत्रणा उभी करायला हवी. साखर कारखाने, संस्था पातळीवर खतांचा पुरवठा केल्यास खतांचे नियोजन योग्य प्रकारे होऊ शकेल. खतांचा उपलब्ध साठा आणि आवश्‍यक साठा शासनाला मिळू शकेल. यंदा खरिपासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मागणीपेक्षा खतांचा पुरवठा जास्त आहे, तरीही खते वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी आहे. यंदा युरिया, डी.ए.पी, 10:26:26 या खतांची टंचाई भासण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. कृषी विभागाने शासकीय आदेशानुसार 19 हजार टन खतांचा बफर स्टॉक करण्याचे नियोजन केले आहे, त्यापैकी पाच हजार 600 टनांचा बफर स्टॉक आताच करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात फेब्रुवारीपासूनच खतांची मागणी असते. उसाचे क्षेत्र जास्त असल्याने या कालावधीत शेतकऱ्यांना खते लागतात. शासनाने खरिपाच्या उत्तरार्धात खतांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून या कालावधीतही बफर स्टॉक करण्याची सक्ती केली आहे. यामुळे सध्या खतांची टंचाई असूनही शासकीय आदेशानुसार विक्रीसाठी कमी प्रमाणात खते उपलब्ध असतानाही त्यातून बफर स्टॉक केला जात आहे. त्यामुळे ज्या वेळी सप्टेंबर, ऑक्‍टोबरच्या दरम्यान मागणी कमी असते, त्या वेळीच बफर स्टॉक करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. यंदाही कृषी विभागाने खते व बियाणे भेसळीबाबत भरारी पथकाची स्थापना केली आहे. जिल्हास्तरावरील भरारी पथकात जिल्ह्यातील प्रमुख कृषी अधिकारी व तंत्रज्ञ, तर तालुकास्तरावरील पथकांत तालुक्‍यातील अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. या पथकांचा फायदा शेतकऱ्यांनी करून घेण्याची गरज आहे. फसवणूक केली जात असलेल्या दुकानांची माहिती भरारी पथकांना देऊन योग्य ते सहकार्य वेळीच केल्यास खतांच्या साठेबाजीवर मात करता येणे शक्‍य होईल.

No comments:

Post a Comment