Monday, May 2, 2011

खरा धर्म

पैं वासरूवाचा भोंकसा । गाईपुढे ठेवू जैसा ।
उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत ।।

हुशारमंडळी ही एखादे आमिष दाखवून आपला कार्यभाग साधण्यात पटाईत असतात. युद्धात शत्रूची चाल जाणून घेण्यासाठी हेरांना आमिषे देऊन बातम्या काढून घेतल्या जातात. सुरक्षा अधिकाऱ्यांनाही लाच देऊन फितूर केले जाते. पण हे कार्य सर्वांनाच साधता येते असे नाही. ही एक कला आहे. बोलण्याची ही पद्धत अवगत करून घ्यावी लागते. तसे अशी कामे करणारी माणसे ही वेगळ्याच पद्धतीची असतात. सर्वांनाच हे जमत नाही. काही माणसे ही सरळ मार्गी असतात. काही माणसे वाकड्या चालीची असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. सरळमार्गाने सर्वच गोष्टी साध्य करता येतात असे नाही. जीवनात काही गोष्टी साध्य करण्यासाठी वाकडे मार्ग सुद्धा स्वीकारावे लागतातच. लोण्याच्या गोळ्यातून लोणी काढताना बोट सरळ ठेऊन चालत नाही. ते वाकडे करावेच लागते. सरळ बोट ठेऊन लोणी काढण्याचा प्रयत्न असफलच होणार. बोट वाकडे केले तरच लोणी मिळू शकेल. यासाठीच वाकड्या वाटांचा वापर योग्य कामासाठी करायला हवा. तसे सर्वच वाकडे मार्ग योग्य असतात असे नाही. पण एखादे चांगले काम यशस्वी करण्यासाठी वाकड्या वाटेचा अवलंब केला तर, तो अधर्म होत नाही. खरे तर प्राप्त परिस्थिती जे आवश्‍यक कर्म केले जाते यालाच धर्म असे म्हटले जाते. चांगल्या गोष्टीसाठी एखादे वाईट कर्म करावे लागले तर तो अधर्म होत नाही. माणसाने परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करायला हवेत. हाच त्याचा धर्म आहे. एकदा एक शाकाहारी मनुष्य जंगलात वाट चुकला. त्याला रस्ता सापडेना. तो भटकत राहीला. खायला काहीही मिळाले नाही. शेवटी त्याला एक झोपडी दिसले. एक म्हातारी त्यामध्ये राहात होती. भूकने व्याकूळ झालेला हा शाकाहारी मनुष्य या म्हातारीच्या झोपडीत गेला आणि त्यांने ह्या म्हातारीकडे भोजनासाठी याचना केली. ही म्हातारी कोंबड्या पाळत होती व कोंबड्यांची अंडी खाऊन ती जीवन जगत होती. त्या मनुष्याला अंडी देण्याशिवाय तिच्याकडे काहीच नव्हते. अशा परिस्थितीत त्यांने त्याचे शाकाहारी व्रत तोडणे आवश्‍यक आहे. यामुळे त्याचा धर्म भ्रष्ट होत नाही. प्राप्त परिस्थितीत त्याने भोजन करणे हे महत्त्वाचे आहे. ते शाकाहारी आहे की मांसाहारी हे महत्त्वाचे नाही. स्वतःचे जीवन संपविण्याऐवजी त्यांने अंडी खाऊन स्वतःचे प्राण वाचविणे हाच त्याचा खरा धर्म आहे. प्राण्यांना हा धर्म समजतो, पण मनुष्यास समजत नाही. गाईजवळ मेलेले वासरू जरी नेऊन सोडले तरी तिच्यासाठी तिचा पान्हा फुडतो. तिला त्या वासरूची काळजी वाटते. त्याला पाजविणे, त्याची भूक शमविणे यातच त्या गाईला आनंद वाटतो. मनुष्य मात्र काही विचित्र नियमात अडकून स्वतःचा त्रागा करत बसतो. हे योग्य नाही. खरा धर्म माणसाने ओळखायला हवा. अहिंसेचा खरा धर्म ओळखायला हवा.

राजेंद्र घोरपडे 9011087406

No comments:

Post a Comment