Monday, October 19, 2020

अलवार ( प्रतिमा इंगोले)

 


अलवार 

माये आजकाल 

असचं होतं बघ

मन सदा अलवार 

दाटून आलेल्या मेघागत..


कधीही झरतं आतल्या आत 

पापणीच्याही आत..

शिगोशिग पाणीच 

कधीही होतात ओले काठ...


कुणाशी सहज बोललं तरी

झरू लागतात 

डोळे अवचित 

मनही होत हळूवार...


चष्मा आहे हे बरं

नाही आजकाल

असं हळवं होणं

कुठं दिसतं साजरं...


आपण बोलावं 

मनाच्या गाभ्यातलं

तर समोरचा कोरडा ठक्क

सिंमेटच्या भिंतीगत

मन लिंपून बसलेला...


अशावेळी आपणच

हळवं मन झाकून 

होतो बेजार..

तसा तोही दुःख

झाकून, चेहरा 

पालटून तर आला नसावा...


म्हणूनच तुझ्या कुशीत 

फुटू लागतात मनाचे 

बांध,दुथडी वाहू

लागते पाणीच पाणी 

उगाचचं मन हेलावतं

आतल्या आत झरू लागतं...


प्रतिमा इंगोले.९८५०११७९६९.



 

.

No comments:

Post a Comment