पुणे येथे उद्या ( 1 फेब्रुवारी) पाणीप्रश्नावर "जल आशय' चर्चासत्र होत आहे. याचे आयोजन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि जलबिरादरी यांनी केले आहे. यामध्ये जलबिरादरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह, आंतरराष्ट्रीय संगणक संशोधक डॉ. विजय भटकर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये कोकणच्या पाणीप्रश्नावरही चर्चा होणार आहे. हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोणते उपाय योजता येणे शक्य आहे यावर तज्ज्ञांनी मांडलेली मते.
राजेंद्र घोरपडे
महाराष्ट्रात तुलनेत कोकणात 42 टक्के पावसाचे पाणी पडते. राज्याच्या तुलनेत कोकणचे क्षेत्र हे 10 टक्केच आहे. इतक्या कमी क्षेत्रावर विपुल प्रमाणात पाणी पडूनही उन्हाळ्यात पाण्याची टंचाईही भासतेच. कोकणचा भौगोलिक विचार करता येथे डोंगरउतार असल्याने पावसाचे पडणारे थेट समुद्रात मिसळते. पाण्याचा वेग जोराचा असल्याने बंधारेही बांधणे येथे शक्य होत नाही. यासाठी कोकणचा पाणी प्रश्न सोडविताना वेगळा विचार करण्याची गरज आहे. असे कोकणचा अभ्यास करणाऱ्या अनेक अभ्यासकांना वाटते. येथील जमिनीची जलधारणाशक्तीही कमी आहे. डोंगरउतारात उगमापासूनच बंधारे येथे बांधण्याची गरज आहे. "पाणी अडवा, पाणी जिरवा' हा उपक्रम येथे राबवायला हवेत असेही अभ्यासकांचे मत आहे.
सायफन पद्धतीची गरज
कोकणचा विचार करता येथे अनेक वाड्या वस्त्या मिळून गावे झाली आहेत. दोन वाड्यातील अंतरही तीन-चार किलोमीटरचे असल्याने एकाच योजनेत हे सर्व होणे शक्य होत नाही. वाड्यावस्त्यात नळपाणी योजना स्वतंत्रपणे राबविण्याची गरज भासते. डोंगरकपारीत वसलेल्या या वाड्यावस्त्यांना पूर आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकंती ही नित्याचीच आहे. अशा या वाड्यावस्त्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सायफन पद्धत उपयुक्त ठरू शकेल.
सायफन पद्धत काय आहे?
डोंगरमाथ्यावर असणाऱ्या नैसर्गिक जलस्त्रोत्रांची पाहणी करून येथून थेट पाईपलाईने सायफन पद्धतीने पाणी थेट वाड्यावस्त्यांत आणायचे. हे जलस्त्रोत उन्हाळ्यातही आटत नसल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. पाईपलाईने पाणी थेट वाडी वस्तीत येत असल्याने दारातच नळाला बारमाही पाणी उपलब्ध होऊ शकते. पाण्यासाठी, कुपनलीका उपसण्यासाठी करावे लागणारे श्रम वाचणार आहेत. उन्हाळ्यातील पाण्याची भटकंती थांबू शकणार आहे.
स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराची गरज
कोकणात अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या सहकार्याने तसेच जिल्ह्यातील कृषी विभागाच्या सहकार्याने श्रमदानातून या योजना राबविता येणे शक्य आहे. यासाठी खरी गरज आहे ती लोक सहभागाची. लोकांनी मनात आणले तर ते हा प्रश्न सहज सोडवू शकतात. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन वाड्यावस्त्यांचा पाणी प्रश्न सोडवायला हवा. यामुळे डोंगरमाथ्यावरील नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन होऊ शकेल.
शासनाने पाण्याचे नियोजन करताना विपुल पाणी आणि दुर्मिक्ष्य पाणी असे वेगवेगळ्या प्रकारे नियोजन करून धोरण ठरवायला हवे. कोकणात पावसाचे विपुल पाणी पडते पण उन्हाळ्यात टंचाई भासतेच. यासाठी कोकण व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या उर्वरित महाराष्ट्रात पाण्यासाठी लावले जाणारे निकष कोकणला लावून चालणार नाही. यासाठी वेगळे धोरण ठरवायला हवे. तरच कोकणचा पाणी प्रश्न सुटू शकेल. डोंगरकपारीतील नैसर्गिक जलस्त्रोत्रांचे संवर्धन करून कमी खर्चात पाणीटंचाईवर मात करता येत असेल व शाहूवाडी, चंदगडमधील डोंगरकपारीतील गावात सायफनने पाणी प्रश्न सुटला असेल तर कोकणातील गावांसाठी अशा योजनांचा विचार व्हायला हवा. डोंगरकपारीतील नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन हे करायलाच हवे.
- डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी कुलगुरू
...........
चेरापुंजीच्या खालोखाल अंदाजे सरासरी चार हजार सेंटिमीटर इतका पाऊस पडतो. तरीही पावसाळ्यात पूरस्थिती आणि उन्हाळ्यात दुर्भिक्ष्य अशी स्थितीच आहे. पाण्याची समस्या कोकणात निर्माण होण्याचे महत्त्वाचे आणि तितकेच गंभीर कारण म्हणजे मायनिंग प्रकल्प. रेडी येथील बेसुमार उत्खननामुळे या परिसरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. खोलवर उत्खनन झाल्याने आसपासच्या विहिरीतील, जलस्त्रोतातील पाणीही दूषित झाले आहे. असाच प्रकार दोडामार्ग तालुक्यात कळणे येथेही पाहायला मिळतो. आता असनिये, घारपी, तांबुळी येथेही मायनिंग प्रकल्प प्रस्तावित आहेत. भविष्यात कोकणात असे प्रकल्प वाढल्यास छोट्या नद्या, नैसर्गिक जलस्त्रोतांचे अस्तित्वच नष्ट होण्याचा धोका आहे.
- नकुल पार्सेकर, अध्यक्ष, अटल प्रतिष्ठान
No comments:
Post a Comment