दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मेसूर्ये पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ।।
मनुष्य समाधानी केव्हा होईल? त्याला जर इच्छित फळ मिळाले, तर तो निश्चित समाधानी होईल. कामाच्या ठिकाणी मनाप्रमाणे काम असेल तर, त्यात निश्चितच समाधान भेटते. आवडीने ते काम केले जाते. त्यात सुधारणा करण्याची, प्रगती करण्याची इच्छा होते. आपोआपच कल्पना सुचत जातात. प्रगती सहजरित्या होते. समाधानी मन हे सुखी मानसाचे लक्षण आहे. असा मनुष्य इतरांनाही सुख देतो. अशा व्यक्तीतून आनंदाचा झरा वाहत असतो. अशांच्या सानिध्यात, सहवासात इतरही सुखी होतात. सद्गुरूंच्या सहवासात ही अनुभूती निश्चितच येते. सद्गुरू हे समाधानाचे सागर आहेत. या सागरात डुंबकी मारायला शिष्याने शिकायला हवे. पोहता येत नसेल तरी डुंबायला हवे. तारणारे सद्गुरू आहेत. मग बुडण्याची भीती कसली. उलट सद्गुरू पोहायला शिकवतात. फक्त शिष्याने धाडसाने यात उडी घ्यायला हवी. आध्यात्मिक विचाराने भारताची प्रगती खुटली आहे. असा आरोप वारंवार केला जातो. पण खरे तर अध्यात्माच्या विचारामुळेच भारत आज महासत्तेची स्वप्ने पाहात आहे. तमोगुणावर अध्यात्माच्या विचारानेच मात केली आहे. चंगळवादी संस्कृती वाढत आहे. पण अध्यात्माच्या विचारामुळेच ही संस्कृती आटोक्यात आहे. अन्यथा भारतही अमेरिकेप्रमाणे मंदीच्या लाटेत भरडला असता. अध्यात्माने दुरदृष्टी येते. एक चांगला विचार, संस्कार त्यामध्ये असतो. दुरदृष्टीच्या अभावामुळेच अमेरिकेला वारंवार मंदीचा सामना करावा लागत आहे. यासाठी अध्यात्माची कास भारताने सोडता कामा नये. साऱ्या विश्वात या अध्यात्माचा प्रसार करायला हवा. विश्वाला हा स्वधर्म सांगायला हवा. प्रत्येक जीवाला सुखी करणारा हा विचार पटवायला हवा. यासाठी तसा भारत प्रथम घडवायला हवा. स्वतःपासूनच याची तयारी करायला हवी. स्वतःमधील स्व, अंहकार सोडायला हवा. मीपणा सोडायला हवा. मी कोण आहे? याची ओळख करुन घ्यायला हवी. मी आत्मा आहे. आत्मा अमर आहे. ही अमरत्वाची अनुभूती घ्यायला हवी. हा आत्मा सर्वामध्ये आहे. सर्वप्राणीमात्रामध्ये तो आहे. तो एकच आहे. देह वेगवगळा आहे. पण सर्वांठायी असणारा आत्मा एकच आहे. त्यात फरक नाही. त्याला रंग नाही. त्याला वास नाही. आणि त्यात भेदही नाही. हा भेदाभेद दूर करायला हवा. देहात आत्मा अडकल्यानेच हा भेद दिसतो आहे. ही दृष्टी आत्मसात करायला हवी. विश्वामध्ये या स्वधर्माच्या सूर्याचा उदय व्हायला हवा.
राजेंद्र घोरपडे, 9011087406
No comments:
Post a Comment