जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ।।
नव्या पिढीवर तणाव अधिक जाणवतो आहे. वाढत्या तणावामुळे आत्महत्या, खून, मारामाऱ्या यांचे प्रमाण वाढले आहे. माणसा-माणसातील प्रेम, आपुलकी कमी होत चालली आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर, याचे गंभीर परिणाम आपणास सोसावे लागणार आहेत. यासाठी सुधारणा होण्याची गरज आहे. माणसांमधील कुटीलपणा नाहीसा झाला तर, समाजात एकोपा निर्माण होईल. समाजात सुख शांती वाढीस लागेल. याचा विचार व्हायला हवा. जग बदलते आहे. माणसे बदलत आहेत. जुने पारंपरिक विचार बदलायला हवेत. म्हणून आपणही बदलायला हवे. हे जरी खरे असले तरी, जो विचार आपण स्वीकारत आहोत. तो फायदेशीर आहे का? यातून कोणत्या समस्या उद्भवू शकतात? यातून समाधान मिळेल का? याचा विचार व्हायला नको का? स्पर्धेच्या युगात तग धरून राहण्यासाठी बदल जरूरी आहे. पण तो क्षणिक समाधान देणारा नसावा. त्यातून कायमस्वरुपी समाधान मिळत राहावे. त्यात दुरदृष्टीचा विचार हवा. क्षणिक समाधान देणारे विचार कालांतराने बदलावे लागतात. हे ही लक्षात घ्यायला हवे. स्पर्धेतून कपटीवृत्ती वाढत आहे. यातूनच अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एखाद्याचे चांगले झालेले इतरांना बघवत नाही. दुसऱ्याची प्रगती खटकते. समाधानी नसल्यानेच असा विचार उत्पन्न होतो. समाधान नसल्याने मानसिक संतूलन बिघडते. संपत्तीतून समाधान प्राप्त होत नाही. यासाठी कायमस्वरूपी समाधान कशात मिळते याचा विचार व्हायला हवा. मनालाच समाधानाची सवय लावली तर? स्वार्थी स्वभावाने कपटीवृत्ती वाढते. यासाठी स्वार्थ बाजूला ठेवायला हवा. त्यागीवृत्ती वाढावी यासाठी प्रयत्न करायला हवा. सात्विक विचार, त्यागीवृत्ती आजकाल मागे पडत आहेत. अशी माणसे सध्याच्या व्यवहारात तग धरू शकत नाहीत. पण खरे पाहता अशीच माणसे सध्या टिकून आहेत. फक्त ती प्रसिद्धीपासून दूर आहेत. या गोष्टीची फारशी चर्चाही होत नाही. अशांततेच्या या जगात शांती नांदायची असेल तर, सात्विक विचारांची बैठक व्हायला हवी. सात्विक विचार वाढावा, यासाठी स्वतःपासूनच बदल घडवायला हवा. स्वतः बदललो तर, जग आपोआप बदलते. स्वतः बदलून आपणास मिळालेले यश इतरांना सांगाल तर, ते इतरांना पटेल. अन्यथा नाही.
राजेंद्र घोरपडे, 9011087406
No comments:
Post a Comment