Saturday, February 4, 2012

पसायदान

आतां विश्‍वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञे तोषावें ।
तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ।।

दान कोणाकडे मागावे? देवाकडे, सद्‌गुरूंकडे. पण आजकाल सर्वच देवळात, मंदिरात, मठात, आश्रमात परिस्थिती नेमकी उलटी आहे. मंदिरांना, मठांना दान दिले जात आहे. तसा प्रचारही केला जात आहे. गल्लोगल्ली हेच चित्र पाहायला मिळते. देवाला दान करा असे सल्लेही दिले जातात. यासाठीच अध्यात्माचा खरा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. याचा अभ्यास यासाठीच करायला हवा. संत ज्ञानेश्‍वरांनी मला दान करा असे कोठेही सांगितले नाही. किंवा सद्‌गुरू, भगवंत हे दानाचे भुकेले आहेत. असे कोठेही म्हटले नाही. भगवंतांना, सद्‌गुरूंना फक्त पान, फुल, फळ लागते. तेही शुद्ध अंतकणाने, देण्याची इच्छा असेल तरच ते स्विकारले जाते. या व्यतिरिक्त कोणत्याही दानाचा स्वीकार केला जात नाही. पण आजकाल मठांना देणगी देणाऱ्यांची संख्याच मोठी आहे. पैशाने देव विकत घेता येत नाही. सद्‌गुरूही विकत घेता येत नाहीत. देवांना, सद्‌गुरूंना असे दान देण्याची मुळात गरजच काय? संत तुकारामांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जडजवाहिरे, संपत्ती टोपली भरून पाठविली होती. पण संत तुकारांमांनी ती टोपली परत केली. त्याचा स्वीकार केला नाही. यातून संत तुकारांमांना हेच सांगायचे आहे की सद्‌गुरू फक्त पान, फुल, फळाचाच स्वीकार करतात. ते संपत्तीचे भुकेले नाहीत. सद्‌गुरू तर दान वाटायला बसले आहेत. घ्यायला नाही. कोल्हापूरच्या महालक्ष्मीलाही मोठ मोठ्या देणग्या देण्यात येतात. तिरुपतीलाही हाच प्रकार आहे. ही झाली मोठी देवस्थाने, छोट्या छोट्या देवस्थानातही हाच प्रकार चालतो. दान दिल्याने भरघोस संपत्ती मिळते अशी धारणा यामागे आहे. गणेश उत्सवासाठीही मोठ मोठ्या देणग्या मागण्याची पद्धत आहे. जैनधर्मामध्ये तर दानाचा लिलावच लागतो. हे कसले अध्यात्म? हा कसला धर्म? धर्मग्रंथात दान द्या असे कोठेही सांगितले नाही. मग हे कशासाठी? नेमके कोणते शास्त्र यामागे आहे? हा चुकीचा संदेश का दिला जात आहे? याचा विचार करायला हवा व दान द्यायला बसलेल्या, वाटायला बसलेल्या ज्ञानेश्‍वर माऊलीच्या तत्वज्ञानाचा अवलंब करायला हवा.

राजेंद्र घोरपडे, 9011087406

No comments:

Post a Comment